राष्ट्रवादीच्या घरात उजळणार ‘पवारांचा दिपक’?

राष्ट्रवादीच्या घरात उजळणार ‘पवारांचा दिपक’?

162
0

सातारा विधानसभा मतदारसंघातील भाजपचे नेते आणि पश्चिम महाराष्ट्र विकास महामंडळाचे अध्यक्ष दिपक पवार हे येत्या २२ सप्टेंबरला शरद पवारांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश करणार आहेत.यावर आता कायमस्वरूपी शिक्कामोर्तब झालं असून हजारो कार्यकर्त्यांच्या लवा जमा घेऊन हातातलं कमळ बाजूला ठेवून हातात घड्याळ बांधणार असल्यानं सातारा जावळी या राष्ट्रवादीच्या बालेकिल्ल्यात राष्ट्रवादीच्या घरात आता पवारांचा

‘दीपक उजळणार’

असल्याची चर्चा सध्या जोर धरू लागली आहे.

शिवेंद्रराजे यांच्या विरोधात दिपक पवार यांची ही तिसरी लढाई असल्यानं पहिल्या लढाईत दिपक पवार शिवेंद्रराजे यांच्याविरोधात अयशस्वी ठरले, दुसऱ्याही लढाईत पराभव झाला, तिसऱ्या लढाईत मात्र, 50 हजारहून अधिक मताने पराभव झालेल्या दिपक पवार यांना आता विजयाचा कॉन्फिडन्स आल्यानं राष्ट्रवादीच्या बालेकिल्ल्यात राष्ट्रवादीच्या घरात ‘दिपक उजळू’ शकतो असा विश्वास दिपक पवारांना आला आहे. महाजनादेश यात्रेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी दिपक पवार यांच्यासमोरच शिवेंद्रसिंहराजेंची उमेदवारी जाहीर केल्यामुळे ते नाराज आहेत. व्यासपीठावरच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आमदार शिवेंद्रराजे भोसले यांची घोषणा केली. मंत्रीमहोदयांच्या बाजूला बसलेले दिपक पवार यांनी व्यासपीठावरच आपली मान खाली घातली.

ज्या राष्ट्रवादीच्या बालेकिल्ल्यात भाजपचा कुठंही कमळ उमललं नव्हतं. त्या राष्ट्रवादीच्या बालेकिल्ल्यात राष्ट्रवादीच्या अनेक गावागावात खिंडार पाडत कमळ फुलवण्याचं काम आजपर्य़ंत दिपक पवार यांनी केलं होतं. मात्र, अचानक राष्ट्रवादीतून भाजपमध्ये दाखल झालेल्या उमेदवाराचे नाव घोषित झाल्यामुळे दिपक पवार यांच्या भाजपा मधल्या उमेदवारीच्या आशा धूसर झाल्या. त्यामुळं आता दिपक पवार राष्ट्रवादीत प्रवेश करणार असून शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या विरोधात त्यांची उमेदवारी जवळजवळ निश्चित समजलं जात आहे. तसंच दिपक पवार यांच्यासाठी राष्ट्रवादीचे कार्यकर्ते सातारा जावळीतून आता प्रत्यक्षरित्या कामालाही लागले आहेत.

येत्या 22 तारखेला राष्ट्रवादी कार्यकर्त्यांचे जोरदार शक्तिप्रदर्शन करत त्याच दिवशी उमेदवारी जाहीर होणार हे जवळजवळ निश्चित मानलं जात आहे.त्यामुळे हजारो कार्यकर्त्यांच्या व राष्ट्रवादीच्या जयघोषामध्ये शरद पवार यांना राष्ट्रवादीचा बालेकिल्ला आहे असं दाखवण्याचा प्रयत्न राष्ट्रवादीचा सातारा जिल्ह्याच्या उर्वरित आमदारांकडून होणार आहे.

त्यासाठी यंत्रणा जोरदार कामाला लागली आहे. दरम्यान ज्या दिवशी मुख्यमंत्र्यांनी व्यासपीठावर आमदार शिवेंद्रराजे भोसले यांची उमेदवारी जाहीर केली. त्याच्या दुसऱ्याच दिवशी दिपक पवार यांनी थेट शरद पवार यांची भेट घेतली. पुण्यात शरद पवारांच्या उपस्थितीत ही बैठक झाली. शरद पवार यांची भेट घेण्याआधीच दिपक पवार यांनी सातारा जिल्ह्यातील तमाम राष्ट्रवादीच्या आमदार व मुख्य कार्यकर्त्यांना विश्वासात घेत मी राष्ट्रवादीचं घड्याळ हातात बांधायला तयार असल्याचं कळवलं होतं.

दिपक पवार, आमदार शशिकांत शिंदे व मकरंद पाटील यांच्या उपस्थितीत झालेल्या पुण्यामधील बैठकीत नुकत्याच भाजप मय झालेल्या शिवेंद्रराजे यांच्याविरोधातील उमेदवार म्हणून दिपक पवार यांचं नाव फायनल करण्यात आल्याचं समजतंय.

लोकसभा आणि विधानसभा या आता एकत्रित लढल्या जात असल्याने सातारा जिल्हा हा राष्ट्रवादीचा बालेकिल्ला म्हणून आजही ओळखला जातो. या राष्ट्रवादीच्या बालेकिल्ल्याला कुठंही धक्का न लागावा म्हणून शरद पवार यांनी आता मोठा खेळ करण्यास सुरुवात केली आहे.
लोकसभेसाठी उदयनराजे यांच्या विरोधामध्ये श्रीनिवास पाटील किंवा त्यांचे चिरंजीव सारंग पाटील यांना मैदानात उतरण्याची तयारी सुरू केली आहे. त्यामुळे विधानसभेसाठी दिपक पवार यांच्या बरोबर लोकसभेच्या पोटनिवडणुकीत सातारा जिल्हा भर लोकप्रियता असणारे श्रीनिवास पाटील व त्यांचे चिरंजीव सारंग पाटील यापैकी कोणीही एक उमेदवार शरद पवार घोषित करण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
लोकसभेला श्रीनिवास पाटलांच्या घराण्यातील कोणताही उमेदवार जर या पोटनिवडणुकीत घोषित करण्यात आला तर दिपक पवार यांच्या उमेदवारीला चार चाँद लागण्याची शक्यताही राष्ट्रवादीकडून वर्तवण्यात येत आहे. त्यामुळे भाजप आणि राष्ट्रवादीचा चुरशी चा सामना उभ्या महाराष्ट्राला पहावयास मिळणार आहे .

सध्या तरी राष्ट्रवादीच्या घरात ‘पवारांचा दिपक उजळणार’ याची चर्चा सध्या जिल्ह्यात सुरू झाली आहे.