विदर्भ, मराठवाड्यात पाऊस लांबणीवर

विदर्भ, मराठवाड्यात पाऊस लांबणीवर

498
0
मुंबई : ‘वायू’ चक्रीवादळ गुरुवारी गुजरात सीमेवर थडकणार आहे. या चक्रीवादळामुळे नैऋत्य मोसमी वारे महाराष्ट्रात दाखल होण्यास विलंब होत आहे. परिणामी दुष्काळाने होरपळत असलेल्या विदर्भ, मराठवाडय़ासह राज्याच्या इतर भागांत मोसमी पावसाचे आगमन लांबणीवर पडणार आहे.
अरबी समुद्रावर कमी दाबाचा पट्टा
अरबी समुद्रावर कमी दाबाचा पट्टा तयार झाल्यानंतर आता त्याचे रूपांतर ‘वायू’ या चक्रीवादळात झाले असून त्याची तीव्रता दोन दिवसांत वाढली आहे. हे वादळ १३ जूनला गुजरातच्या किनाऱ्यावर धडकण्याची शक्यता आहे. या वादळामुळे नैऋत्य मोसमी वारे महाराष्ट्रात दाखल होण्यास विलंब होत आहे. मुंबई, नवी मुंबई, ठाण्यासह राज्याच्या काही भागात गेले दोन दिवस पूर्व मोसमी पाऊस चांगला झाला. त्यामुळे मोसमी पाऊस विलंबाने होणार असल्याने उष्मा वाढणार आहे.
वादळाची दिशा
‘वायू’ चक्रीवादळाची तीव्रता पुढील २४ तासांत आणखी वाढणार आहे. हे वादळ आता उत्तरेकडे सरकत जाऊन पोरबंदर आणि महुआ दरम्यान गुजरातचा किनारा ओलांडून वेरावळ आणि दिव येथे धडकेल, तेथे वादळाचा ताशी वेग १३५ कि.मी राहील.
कच्छपासून दक्षिण गुजरातपर्यंत अतिदक्षतेचा इशारा
कच्छपासून दक्षिण गुजरातपर्यंत सर्व किनारपट्टीवर अतिदक्षतेचा इशारा देण्यात आला आहे. कच्छ, भावनगर, गिर-सोमनाथ, पोरबंदर, अमरेली, जुनागड या भागांना वादळाचा फटका बसण्याची शक्यता असून दक्षिण गुजरातसह अनेक भागांत पावसाची शक्यता आहे. वादळाचा प्रभाव १२ ते १४ जूनपर्यंत कायम राहणार आहे.