‘वंचित’ला मिळालं हक्काचं चिन्ह; गॅस सिलेंडरच्या चिन्हावर लढवणार विधानसभा

‘वंचित’ला मिळालं हक्काचं चिन्ह; गॅस सिलेंडरच्या चिन्हावर लढवणार विधानसभा

निवडणूक आयोगाने विधानसभा २०१९ निवडणुकीसाठी वंचित बहुजन आघाडीला गॅस सिलेंडर हे चिन्ह प्रदान केले आहे. आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी याबाबत घोषणा केली. महाराष्ट्रातील सर्व २८८ जागांवर आघाडीसाठी हे अधिकृत चिन्ह असेल. मागील काही दिवसांपासून वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्ते, समर्थकांमध्ये विधानसभा निवडणूक चिन्हाविषयी चर्चा सुरू होती.
लोकसभा निवडणुकीत आघाडी कपबशीच्या चिन्हावर लढली होती. विधानसभेसाठी हे चिन्ह बच्चू कडू यांच्याकडे आहे. लोकसभेप्रमाणे विधानसभेतही या चिन्हाचा फायदा होईल या अनुषंगाने निवडणुकीत एकत्र येण्यासाठी आंबेडकर आणि बच्चू कडू यांच्यात चर्चाही झाली होती.
मात्र, आता वंचित बहुजन आघाडीला हक्काचं निवडणूक चिन्ह मिळालं आहे. त्यामुळं गॅस सिलेंडरचं चिन्ह मिळालेली आघाडी येत्या निवडणुकीत कोणाकोणाला गॅसवर ठेवणार हे बघणं औत्सुक्याचं असणारंय.