Home > Uncategorized > साखर कारखान्याची चिमणी आभाळात धूर ओकताना......

साखर कारखान्याची चिमणी आभाळात धूर ओकताना......

साखर कारखान्याची चिमणी आभाळात धूर ओकताना......
X

परवा वर्धनगडाचा घाट उतरताना डावीकडं सहज नजर गेली आणि एका साखर कारखान्याची चिमणी आभाळात धूर ओकताना दिसली. अशा जुन्या डोंगरांच्या पायथ्याला महाराष्ट्रात आता कितीतरी चिमण्या दिवस रात्र ऊसाच्या चुया पिऊन धुराडी जाळत राहताना दिसतात. पण यावेळी त्या उंच आभाळातल्या ढगात काळ्याभोर धुरांची वर्तुळे मिसळत जाताना त्यात अचानकच एक मानवी चेहरा तयार होताना दिसला. काही क्षणात त्या चेहऱ्याला अंग फुटलं. हातात कोयता घेतलेला एक मानवी सांगाडा क्षणात नजरेला दिसू लागला. मला खुणावू लागला. हाका मारू लागला. हसू लागला. तो चेहरा होता मुर्गाप्पा मुकादमाचा. होय! मुर्गाप्पा मुकादम. तो नेमका इतक्या वर्षानंतर या धुराच्या वलयातून नजरेसमोर आत्ताच का आला असेल? त्याचा आणि माझा नेमका ऋणानुबंध तरी काय? मला काहीच माहित नाही. पण हा मुर्गाप्पा मुकादम एका क्षणात डोक्यात कोयत्याचा घाव बसावा आणि रक्ताच्या चिळखांडया फुटाव्यात तसा डोक्यातून फुटून उडू लागला. सोबत मुर्गाप्पा मुकादमाच्या शेकडो आठवणी डोक्यातून उडू लागल्या.

मुर्गाप्पा मुकादम. काळा रापलेला देह. पायात धोतर. अंगात बंडी. नाकाच्या खाली झुबकेदार मिशा. कानात बाळी. पायात करकर वाजणारं चामडी पायताण. आणि हातात धारदार चकाकी कोयता. असा हा मुर्गाप्पा मुकादम बारा कोयत्याच्या टोळीचा मालक. जणू त्याच्या दृष्टीने हि राजाची पदवी. दिवाळी संपली की गावच्या बाहेर आमच्या वस्तीजवळ मुर्गाप्पा मुकादम त्याच्या बारा कोयत्यासह उतरायचा. वस्तीच्या जवळच विहीर होती. तिथं मुबलक पाणी असायचं. शिवाय खालच्या बाजूला वाहता ओढा असल्यानं तिथं बायका दिवस उगवायला धुणी बडवायच्या. त्यामुळे अशा जागी ऊस तोडणी मजुरांच्या टोळ्या दिवाळीच्या आसपास हमखास उतरायच्या. पण नेहमी प्रमाणे ओळखीची पहिली टोळी उतरायची ती मुर्गाप्पा मुकादमाची.

मुर्गाप्पाची टोळी उतरली कि खोपटं उभी करण्यासाठी धरपड सुरु व्हायची. एखाद्या फडमालकाच्या ऊसातल्या शेवऱ्या तोडल्या जायच्या. दोन खोपटांच्या मध्ये ठराविक अंतर सोडून खोपटं उभी राहायची. कारखाण्याकडून मिळालेला बाबूंच्या चाब्याचा तट्या त्यावर गुंडाळला जायचा. त्याच्यावर ऊसाचा पाला पसरून बाहेरून पुन्हा शेवऱ्या बांधून खोपटं तयार व्हायची. खोपटा बाहेर तीन दगडांच्या चुली पेटायच्या. अंधारातून खोपटावर येणा जाणाऱ्यांची नजर पडली तर फक्त चुलीतून पसरलेला पेटलेला लाल पिवळसर जाळ दिसायचा. त्यावर ठेवलेल्या पण लांबून न दिसणाऱ्या तव्यावर भाकरी बडवण्याचा आवाज यायचा. सर्व खोपटांच्या मधोमध शेरडा करडांचा आणि पोरांचा आवाज. एखाद्या खोपटात मिणमिणती घासलेटची चिमणी अगरबत्ती सारखा धूर सोडताना दिसायची. काही महिन्यासाठी इथे एक नवी वस्तीच तयार व्हायची. आणि या टोळीचा मुख्य मुकादम असायचा मुर्गाप्पा मुकादम.

तांबडं फुटलं कि खोपटावर मुर्गाप्पा मुकादम "गडी होss उठाss" म्हणत आवाज टाकायचा. गडी माणसांची आवरा आवर सुरु व्हायची. ज्या फड मालकाचा तोडणीचा नंबर आला असेल त्याच्याकडून मुर्गाप्पा नारळ घ्यायचा. वाड्याच्या बदली ठराविक मोबदला. नरसगोंडा या टोळीत गाणी म्हणायचा. त्याला एकूण मिळून पोरं पोरी सात. तो म्हणायचा, एक दिवस माझ्या घरची टोळी तयार करणार. त्याच्या एकट्याची सात पोरं फडात हिंडायची. त्याच्या गाण्याला मागून सारे जण ऊस तोडता तोडता साथ द्यायचे. दिवस उगवून वर येईपर्यंत मुर्गाप्पा मुकदमाची टोळी अर्ध्या गाडीचा माल तयार करायची. न्याहरी घेऊन बायका मागून यायच्या. त्यांना मोळी बांधण्याचे काम. जणू त्यांच्या पाचवीलाच पुजलेले. मुकादमानं आवाज टाकला कि जागा मिळेल तिथं गडी दाताखाली भाकरी तोडायला बसत. बायका मोळ्या बांधायला फडात उतरत. चिलिपिलीचा ऊसाच्या फडात खेळ सुरू होई. मुर्गाप्पाची बायको-यल्लमाला एक पोरगा आणि एक पोरगी. तरीही यल्लमा तिसऱ्या वेळी गरोदर होती. तिला सतत वाकण्याने त्रास व्हायचा. पण त्याही अवस्थेत ती मोळ्या बांधायला फडात उतरे. त्यामुळे तिला मदत म्हणून मुर्गाप्पाला मोळ्या बांधायची डबल ड्युटी करावी लागायची.

कधी कधी मध्यरात्री ट्रकाच्या हॉर्नचा "पोमss पोमss" आवाज खोपटावर आला की हाडं गोठवणाऱ्या थंडीत मुर्गाप्पा बायका माणसांना उठवून ऊस भरायला फडावर जायचा. सात महिन्याची गरोदर यलम्मा वाकून मोळ्या डोक्यावर घेऊन ट्रकात चढवायची.

एखदा अप्पा मोहित्याच्या फडात तोडणी चाललेली. अर्धा फड तोडून झालेला. फडाच्या मधोमध ऊस तुटलेल्या जागी तीन चार ऊस रोवून त्यावर धोतर टाकून मुर्गाप्पानं सावली केलेली. त्या सावलीत मुर्गाप्पानं धाकट पोरगं झोपवलेलं. भर उन्हाचा कडाका. ट्रॅकात ऊस भरायचं काम चाललेलं. याचवेळी धोतर टाकून सावली केलेल्या जागेकडून अचानक किंचाळण्याचा आवाज उठला. फडात हिंडणारी बारकी पोरं घाबरून आई बापाच्या दिशेने पळू लागली. गाडीत वाकडा तिकडा वळलेला ऊस कोयत्यानं खपलत असलेला मुर्गाप्पाचा कोयता जागचा थांबला. बायका माणसांच्या अंगाखांद्यावरून ट्रकमध्ये बसायला निघालेल्या मोळ्या जागेवरून तशाच माना वाकड्या करून आवाजाच्या दिशेने वळाल्या. मगापासून बंधावरच्या लिंबावर ओरडणाऱ्या भोरड्या जास्तच कोकलू लागल्या. फडात पोरांचा हसण्या रडण्याचा आवाज रोजचाच. पण यावेळी काहीतरी विचित्र घडल्याची जाणीव सगळ्यांना झाली. मुर्गाप्पानं ट्रॅकातून पहिली उडी खालच्या बैलगाडीत तर दुसरी उडी फडात टाकली. यल्लमा दोन चार ढेंगात त्या जागेवर पोहचली. ऊस भरणी थांबली. मुर्गाप्पानं पोरंग कवळ्यात उचललं. चिमुकला डावा पाय रक्तबंबाळ झालेला. नरसगोंडाकडं बघून तो "हाणss हाणss" मोठ्यानं म्हणाला. नरसगोंडांनं पाल्याच्या पाचटीत शिरणाऱ्या घोणस सापाचं कोयत्याच्या एकाच घावात दोन तुकडं पाडलं.

ऊसाने भरलेला अर्धा ट्रक तसाच फडातून रस्त्याला लागला. तालुक्याच्या सरकारी दवाखाण्याचा प्रवास सुरु झाला. पण रक्तबंबाळ झालेला पाय ज्या वेगाने ट्रक घेऊन गेला होता, त्याच वेगाने तो तासाभरात खोपटावर परत आला. सरकारी दवाखान्यात पोहचण्याआधीच फेस येऊन पोरंग संपलं होतं. खोपटावर एकच कल्लोळ उठला. यलम्मा हाणून बडवून घेऊ लागली. कालव्याने बाजूच्या वस्तीवरची लोकं जमा झाली. दिवस मावळतीला गेलेला. अखेर धीर देऊन टोळीतल्या गड्यानी मुर्गाप्पाला उठवला. कपड्यात गुंडाळलेला बिन हवेचा कोवळा जीव त्याने उचलून छातीशी धरला. पुन्हा एकच कल्लोळ माजला. मुर्गाप्पा ओढयाची वाट कमी करू लागला.

गावाबाहेरच्या ओढ्यात मेलेली गुरं ढोरं टाकली जायची. तिथं सतत गिधाडे फिरत असायची. त्या जागी एका उतारावर नरसगोंडाने एक मोठा खड्डा काढलेला. या खड्याभोवती आता गडी माणसे जमा झाली. खाली घमेलंभर मीठ ओतलं गेलं. भुसभुसीत केलेल्या मातीवर पोरगं हळूच निजवलं. खड्ड्यात उतरलेल्या मुर्गाप्पाने चिमुकल्या ओठावर आंब्याच्या पानातून पाण्याचे दोन थेंब सोडले. मुर्गाप्पा डोळ्यातलं पाणी सांडत वर आला. पहिलं मातीचं खोरं पोराच्या अंगावर पडल्यावर मुर्गाप्पानं मोठ्यानं टाहो फोडला. घरट्याकडं परतणारी ओढ्यातली पाखरं बिथरली. ओढ्यात पाण्यावर आलेली गाई गुरं हंबरु लागली. कोवळा जीव आत आत गुडुप्त होत गेला. मुर्गाप्पा जुन्या आठवणीत बुडत गेला. पश्चिमीकडे सूर्याचा लाल गोळा ढगाआड बुडत गेला. पूर्वेकडे मुर्गाप्पाचा पोटचा गोळा मातीआड मुजत गेला.

हळूहळू खोपटावरचं दुःख कमी होत गेलं. मुर्गाप्पा आणि यलमानं दोन दिवसात पुन्हा ऊस तोडणीला जुंपून घेतलं. दिवस सुरू लागले. यल्लमा कधी कधी आमच्या घराकडं यायची. आज्जीकडून दिव्यासाठी घासलेट घेऊन जायची. कधी मधी चार दोन अंडी मागायची. मुर्गाप्पा बैलांसनी न चुकता एखादं वाड्याचं ओझं आणून टाकायचा. चार दोन शेलकं ऊस खायला आणून द्यायचा. काही लागलं सावरलं तर हक्कानं मागायचा. आज्ज्याकडून त्याला पान खायला मिळायचं. मिळालेलं पान तो बराच वेळ चघळत बसायचा.

दोन महिने उलटले. ऊसाचा हंगाम सपंत आलेला. जो तो कारखान्याचा पट्टा कधी पडतोय याची वाट पाहू लागलेला. गावात अजून पाच सहा फड शिल्लक राहिलेलं. किश्या सावंताच्या मळ्यात ऊस तोडणी चाललेली. भर दुपारची वेळ. उन्हानं नुसती अंगाची काहिली उठलेली. आणि अचानकच फडाच्या एका कोपऱ्यातून पुन्हा पहिल्या सारखाच किंचाळण्याचा आवाज उठला. किंचाळी फडभर घुमली. ऊस भरणी थांबली. गडी माणसं आवाजाच्या दिशेने पुन्हा धावली.

त्या वेदनेने भरलेल्या आवाजाभोवती बायका माणसांनी गोल रिंगण केलं. थरथर कापणाऱ्या त्या देहावरच्या हाताच्या मुठी दाबल्या गेल्या. बायकांनी पाताळ आडवं धरलं. "अजून दाबss अजून दाबss" आवाज निघू लागले. अखेर एक मोठी किंकाळी सुटली. उसाच्या सरीत पाचटीवर निस्तेज आडवा पडलेला देह वळवाच्या पावसाने गळून गेलेल्या आभाळासारखा मोकळा मोकळा होत गेला. आडदांड देहाचा नारसगोंडा कोयता घेऊन पुढे झाला. धिप्पाड देहाच्या मुर्गाप्पानं नरसगोंडाचा कोयता यावेळी मागे सारला. आता मुर्गाप्पाचा कोयता पुढे आला. शांत होत निघालेल्या वेदनेच्या दिशेने कोयता पुढे वाकू लागला. कोयत्याचं अंग शहारलं. अखेर मुर्गाप्पाच्या कोयत्याने बाळाची नाळ कापली गेली. फडात यल्लमाच्या पोटी नवा चिमुकला मुकादम जन्माला आला. घामाने भिजलेल्या आणि श्वास रोखलेल्या चेहऱ्यांना भर उन्हात हिरवी पालवी फुटली. फडाच्या पाचटीवरून आनंदाची लाट उसळत राहिली.

पुढे कितीतरी वर्षे मुर्गाप्पा मुकादम गावात बारा कोयत्याची टोळी घेऊन यायचा. कारखाना बदलायचा. पण टोळी तीच राहायची. नंतर नंतर कोयते बदलत गेले. कारखान्याचे हंगाम दुष्काळाच्या झळानी अधे मध्ये बंद पडू लागले. सलग दोन तीन वर्षे मुर्गाप्पाची टोळी वस्तीवर उतरली नाही. नंतर शिक्षणासाठी गाव सुटलं. आपलीच माणसं लांब होत गेली. तिथं मुर्गाप्पा सारख्या माणसांना काळजात कुठं जागा मिळणार. आणि त्यांच्या आठवणी तरी कोण ठेवणार. सगळी जगण्याची भ्रांत. पोटाचा आपलाच संघर्ष सुरू.

कधी सुट्टीला गावाकडं गेलं की वस्तीच्या बाजूला चार पाच टोळ्या दिसायच्या. नवनवीन कारखाने कुत्र्याच्या छत्रीगत जागोजागी उगवलेलं. खऱ्या अर्थाने साखर सम्राटांचा उदय झालेला. खाजगी कारखान्याचं घास गवता सारखं सगळीकडं पिक फैलावलेलं. पूर्वी मजुरापासून मालकापर्यंत सगळ्यांचं एक अतूट नातं या कारखान्याशी जोडलेलं असायचं. या टोळ्या ज्या जागी उतरायच्या तिथल्या माणसाशी त्या जोडल्या जायच्या. हंगाम संपून परत त्यांच्या मुलखाकडे जाताना काळजात हुरहूर वाटायची. त्यांना निरोप देताना आठवणी दाटून यायच्या. हे सारं आता हद्दपार झालेलं. काळानुसार मागं पडलेलं.

एखदा दिवाळीत सुट्टीला गेलो. बाजूला चार दोन टोळ्यांची खोपटं दिसली. पण बिनओळखीची. ऊस खाण्याची तल्लफ झाली. ओढ्याकडेला एका फडात ऊसाची तोड चाललेली. फडाची वाट चालू लागली. फडात गेलो. दहा कोयत्याची टोळी. सगळे बिन ओळखीचे चेहरे. नऊ गडी आणि एक बाई दिसली. विचित्र वाटलं. बाई गड्यागत कोयता बनलेली. वाटलं नवऱ्याच्या बदली ऊस तोडत असेल. ऊस खात खात जवळ गेलो. बाई ओळखीची वाटली. पुन्हा पुन्हा चेहरा पाहू लागलो. ती आपल्याच नादात ऊस तोडत होती. तिच्यामागे सहा सात वर्षाचं एक सावळ्या रंगाचं पोरंग आणि तारुण्याच्या पायथ्याला उभी असलेली व छातीला कोवळी स्तनं फुटू लागलेली एक पोरगी ऊसाच्या मोळ्या बांधीत होती. विश्वासच बसेना. बाईचा चेहरा बघून हादरलोच. होय! ती होती मुर्गाप्पा मुकादमाची बायको यल्लमा? मग मुर्गाप्पा मुकादम गेला कुठं? कि गेलाच खरोखर? असा कसा गडी अकाली जाईल? जाण्यासारखा नव्हताच? आणखी जवळ गेलो. तर समोर भुंडं कपाळ. घामानं भिजलेलं. म्हणजे? खरोखरच मुर्गाप्पा मुकादम गेला? पण केव्हा? कसा? आणि कधी??? हि "क" नावाची अक्षरंच मला फडात जास्त छळू लागली. डोक्यात प्रश्नांची राख. नुसता धुरळा. खाली बसायलाच तयार नाही. डोक्यात हाणून घ्यावं वाटलं. ठुss ठुss बोबलावं वाटलं. पेकटात लाथ बसलेल्या नरसगोंडाच्या बायकोसारखं. पण पडलो पुरुष. यातलं काहीच केलं नाही. आवरलं स्वतःला. जवळ गेलो.

बऱ्याच वेळानं यल्लमा कडून मुर्गाप्पा जाण्याचं खरं कारण समजलं. मुर्गाप्पानं एका खाजगी कारखान्याकडून तीन टोळ्यासाठी उचल घेतलेली. या तिन्ही टोळ्या खाजगी कारखान्याला लावल्या. पण तिन्ही टोळ्या पैसे घेऊन हंगाम अर्धवट सोडून पळून गेल्या. कष्टाचं कमावून खायची सवय असलेला मुर्गाप्पा खोपटावर बायका पोरासोबत एकटा मागे उरला. घेतलेली उचल देऊ न शकल्याने कारखान्याने पाळलेल्या गुंडांच्या तावडीत तो आयता सापडला. एका रात्री अंधारात त्याला जीप मध्ये घालून त्यांनी उचलला. दूर माळावर नेऊन त्याचं हातपाय बांधलं. तोंडात बोळा कोंबून त्याच्याच धारदार कोयत्याने कचा कचा मुरगप्पाचं हातपाय ऊसासारखं छाटलं गेलं.

ऐकून उडालोच. चालू लागलो. पण पाऊल पुढं जाईनाच. तसाच फडाच्या शेवटाला आलो. खायला घेतलेलं ऊसाचं कांडकं बांधावर फेकून दिलं. मागे वळून बघण्याचं धाडसच होईना. पण धाडस करून वळालोच. तर दूर फडात कासोटा घातलेली यल्लमा खालून कचा कचा ऊसाचं पाय तोडत होती. कोयत्याच्या एका कचक्यात वरून ऊसाचं मुंडकं छाटत होती. पण खरंच ती ऊसाच्या रूपाने कुणाचं पाय तोडत असेल? कुणाचं मुंडकं छाटत असेल?

तुमचं...?

माझं...?

कि भ्रष्ट साखर सम्राटांचं...?

कुणास ठाऊक.

याचं उत्तर ना मला माहित. ना तुम्हाला माहित. कारण आपण सगळे एकाच माळेचे मणी. एकसारखेच. नाही का???

Updated : 8 Jan 2019 9:47 AM GMT
Next Story
Share it
Top