Home > Uncategorized > ईव्हीएम हॅक होऊ शकतात का?

ईव्हीएम हॅक होऊ शकतात का?

ईव्हीएम हॅक होऊ शकतात का?
X

वर्षभर निवडणूकांचा सीझन आहे. या वर्षात नायजेरिया ते इस्त्रायल ते युरोपियन युनियन अशा विविध देशांमध्ये निवडणूका होणार आहेत, पण या उन्हाळ्यात होणाऱ्या भारतातील निवडणूका या महत्वपूर्ण ठरणार आहेत. जगातल्या सगळ्यात मोठ्या लोकशाही देशातल्या निवडणूकांकडे निश्चितच जगाचं लक्ष लागलेलं असतं, आणि या ही निवडणूकीत परिस्थिती काही वेगळी नसणार आहे.

एका केबल द्वारे जोडलेलं मतदान आणि मतमोजणी यंत्र असं साधंसं मशीन म्हणजे ईव्हीएम. या मशीनला अल्कलाइन बॅटरीने विद्युत पुरवठा होतो. मतदार त्यांच्या पसंतीच्या उमेदवाराच्या नावासमोरचं बटन दाबून मत देतात, जे सोबतच्या बॅलट युनिट मध्ये नोंदवलं जातं. अशी ही साधी सोप्पी प्रक्रिया आहे. पण ही प्रक्रिया 1999 पासून अधिकाधिक वादग्रस्त बनत चाललीय. या वेळीही निवडणूकांच्या केंद्रस्थानी मतदानासठी वापरण्यात येणारं हे यंत्र म्हणजेच ईव्हीएम मशीन असणार आहे.

संशय आणि प्रश्न

2014 च्या निवडणूकांमध्ये ईव्हीएम बरोबर छेडछाड झाल्याच्या बातम्यांमुळे ईव्हीएम बाबत साशंकता निर्माण झाली आहे. निकाल लागला न लागला तोच राजकीय पक्ष आपापल्या सोयीप्रमाणे ईव्हीएम बाबत बोंब ठोकायला सुरूवात करतात. सततच्या आरोप प्रत्यारोपामुळे मतदान आणि नवमतदारांवर विपरित परिणाम होताना दिसत आहे. एकूणच मतदान प्रक्रियेच्या विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे.

आरोपांमध्ये सत्य किती?

ईव्हीएम मधील छेडछाड आणि हॅकिंगच्या दाव्यांना निवडणूक आयोगाने वारंवार फेटाळून लावलं आहे. निवडणूक आयोगानं स्पष्टपणे सांगितलंय की, ईव्हीएम मध्ये छेडछाड करता येऊ शकत नाही. निवडणूक आयोगाने ईव्हीएम मशीनची काही वैशिष्ट्ये सांगितली आहेत, त्यावर एक नजर टाकूया.

- एका वेळी बटण दाबल्यावर एका व्यक्तिला एकच मत देता येतं. खूप वेळा बटण दाबलं तरी जास्त मतं पडत नाहीत.

- ईव्हीएमच्या ऑपरेटींग युनिट मध्ये सिलिकॉनचा वापर करण्यात आलेला आहे. या प्रोग्राम मध्ये कुणालाच, म्हणजे उत्पादकाला-बनवणाऱ्यालाही बदल करता येत नाही.

- पोलिंग अधिकाऱ्यांकडे मतदान यंत्राचं कंट्रोल असतं. जर त्यांना काही प्रॉब्लेम जाणवला तर ते क्लोज बटण दाबू शकतात जेणेकरून मशीन मतं स्वीकारणं थांबवू शकते.

- ईव्हीएम मध्ये मतांची नोंदणी रँडमाइज्ड म्हणजे स्वैर पद्धतीने होते, त्यामुळे ईव्हीएम मध्ये केवळ एखाद्या उमेदवारालाच मत मिळायला हवं असं प्रोग्रामिंग करणं अशक्य आहे.

- ईव्हीएम साठी सुरक्षेचे अनेक स्तर निर्माण केलेले आहेत, जे तोडणं शक्य नाही.

अतिरिक्त उपाययोजना

सुरक्षेची इतकी काळजी घेतल्यानंतरही ईव्हीएमच्या सुरक्षे संदर्भात अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत. त्यामुळे सुरक्षेच्या स्तरात वाढ करताना निवडणूक आयोगाने आता व्हीव्हीपॅट म्हणजेच व्होटर व्हेरिफाइड पेपर ऑडीट ट्रेल चा वापर 2010 पासून करायला सुरूवात केली आहे. मतदारांनी कुणाला मत दिलंय याची पावती देण्याचं काम व्हीव्हीपॅट करतं. यामुळे मतदारांनी आपण कुणाला मत दिलंय हे लगेच कळतं आणि मतदानाच्या प्रक्रियेच्या शेवटी या पावत्या गोळ्या करून त्याचा हिशोब ठेवला जाऊ शकतो.

भारतासारख्या देशात निवडणूकांच्या काळात लाखों ईव्हीएमचा वापर होतो, त्यामुळे काही ईव्हीएम न चालणं किंवा त्यात गडबड होणं स्वाभाविकच आहे, पण त्याला ईव्हीएम सोबत छेडछाड म्हणता येणार नाही. मशीन नीट काम करत नसेल तर निवडणूक आयोग ती बदलून तिथे दुसरी मशीन पाठवते. ईव्हीएम हॅकींगचे दावे वारंवार होत असले तरी त्यात सत्यता आढळून आलेली नाही.

ईव्हीएम मध्ये कुठलीच वायरलेस टेक्लॉलॉजी वापरण्यात आलेली नसल्याने ( वायफाय, ब्लूटूथ इ. ) ती दूरून हॅक करणे कठीण आहे. त्यामुळे दूरून हॅकींगची शक्यताच खोडून काढली पाहिजे. एखाद्याच्या हातात ईव्हीएम आल्यास त्यातील प्रोग्राम-संरचना बदलता येण्याची शक्यता आहे. किंवा मतदान केंद्राबाहेर जर पुरेशी सुरक्षा व्यवस्था नसेल तर गडबड होऊ शकते, त्यामुळे मतदान केंद्रांची आणि ईव्हीएमची प्रत्यक्ष सुरक्षा व्यवस्था ही अत्यंत महत्वाची आहे. ईव्हीएम हॅकच होऊ शकत नाही असं आपण जरी म्हणू शकत नसलो तरी सध्या तरी ईव्हीएम हेच सध्यातरी सर्वांत बेस्ट मतदानयंत्रं आहेत हे आपल्याला मान्य करावं लागेल. त्यामध्ये काही त्रुटी असूही शकतील, मात्र हॅक होऊ शकतील इतकीही ती कमकुवत नाहीयत.

- संजय काटकर, चीफ टेक्नॉलॉजी ऑफिसर आणि कार्यकारी सह-संचालक क्वीक हील टेक्नॉलॉजीज्

Updated : 5 Feb 2019 1:28 PM GMT
Next Story
Share it
Top