Home > Uncategorized > लढवय्या सिंहाची चिरविश्रांती

लढवय्या सिंहाची चिरविश्रांती

लढवय्या सिंहाची चिरविश्रांती
X

विदर्भवीर भाऊ जांबुवंतराव धोटे यांचे शनिवारी पहाटे यवतमाळमध्ये हृदयघाताने निधन झाले. एक लढवय्या नेता, 'विदर्भाचा सिंह' काळाच्या पडद्याआड गेला. एकेकाळी 'सिंहगर्जना' म्हणजे जांबुवंतराव धोटे हे समीकरण देशाला परिचित होते. 'फॉरवर्ड ब्लॉक ते (दरम्यान काँग्रेस, शिवसेना, विदर्भ जनता काँग्रेस असे अनेक पक्षबदल करीत) फॉरवर्ड ब्लॉक असा 83 वर्षीय भाऊंचा राजकीय प्रवास. राजकीय नेते लोकप्रियतेच्या ज्या परमोच्च क्षणांसाठी आसुसलेले असतात ते लोकप्रियतेचे शिखर भाऊंनी कधीकाळी गाठले होते. 'विदर्भ का शेर' म्हणून लौकीक मिळविलेले जांबुंवतभाऊ चतुरस्त्र, अष्टपैलू या विशेषणांपलिकडचे व्यक्ती होते. राजकारणासोबतच सामाजिक, साहित्यिक, सांस्कृतिक जाण असलेला लोकनेता म्हणूनच भाऊंच्या व्यक्तिमत्वाकडे बघावे लागेल.

महाराष्ट्रातील राजकारण व समाजकारणात १९६० ते ८० चे दशक जांबुवंतरावमय होते. नियमित व्यायामाने मिळविलेली धिप्पाड शरीरयष्टी, मनगटातील भारदस्त कडं, शुभ्र पंचा, कुर्ता, खांद्यावर नेटकी घडी केलेले उपरणे, रखरखीत दाढी, खर्जातला आवाज, कोणाशीही थेट भिडण्याची तयारी त्यामुळे जांबुवंतभाऊ त्या काळातील तरूणाईचे आयकॉन झाले होते. नेताजी सुभाषचंद्र बोस यांचा प्रचंड प्रभाव अखेरपर्यंत त्यांच्या व्यक्तिमत्वावर होता. त्यातूनच फॉरवर्ड ब्लॉकची स्थापना करून तब्बल १९ आमदार निवडून आणण्याची किमया त्यांनी साधली होती. त्यांच्या सहवासात राहिलेले लोक सांगतात की, भाऊंची विनंतीही त्या काळात आज्ञा मानली जायची. वसंतदादा पाटील मुख्यमंत्री झाल्यानंतर त्यांनी जांबुवंतभाऊंना अल्टिमेटम देऊन सत्तेत सहभागी करून घेतले. फॉरवर्ड ब्लॉकच्या तीन आमदारांची मंत्री म्हणून वसंतदादांच्या मंत्रिमंडळात वर्णी लागली होती. राजकीय उंची गाठलेले नेते म्हणून भाऊंचा दरारा निर्माण झाला होता. आचार्य अत्रे हे त्यांचे जवळचे स्नेही. त्यावेळी शिवसेनेचा जन्मही व्हायचा होता, तेव्हा बाळासाहेब ठाकरे, आचार्य अत्रे आणि जांबुवंतभाऊंच्या सहवासात राहायचे, असे त्यांचे स्नेही सांगतात. मुंबईत 'मराठा'मधील आर्चाय अत्रे आणि भाऊंची मैफल म्हणजे महाराष्ट्राच्या समाज व राजकारणाला अनेक अंगांनी कलाटणी देणारे क्षण राहायचे. संयुक्त महाराष्ट्राची चळवळही त्याचाच भाग. प्रांरभी संयुक्त महाराष्ट्राचे पुरस्कर्ते असलेले जांबुवंतभाऊ कालांतराने 'स्वतंत्र विदर्भ' चळवळीचे प्रणेते बनले. राजकारणात कोणतीही तडजोड न करता स्वतंत्र विदर्भाचा मुद्दा त्यांनी अखेरपर्यंत लावून धरला. 'मला स्वतंत्र विदर्भ राज्यात मृत्यू यावा', असे ते नेहमीच म्हणत, परंतु त्यांची ही इच्छा काँग्रेस, शिवसेना, भाजप आदी कोणाच्याही सत्तेत पूर्ण झाली नाही. स्वंतत्र विदर्भाच्या मुद्यावरून काँग्रेस, शिवसेना अशा पक्षांसोबत भाऊंनी फारकतही घेतली.

आणीबाणीच्या काळात इंदिरा गांधींची सर्वस्तरातून कोंडी सुरू असताना, विदर्भाचा सिंह भाऊ जांबुवंतराव इंदिरा गांधींच्या मदतीला धाऊन गेले. अट एकच घातली की, केंद्रात काँग्रेस सत्तेत आल्यानंतर स्वतंत्र विदर्भ राज्य झाले पाहिजे. त्या संकटाच्या काळात इंदिरा गांधींनीही भाऊंना शब्द दिला होता, असे सांगितले जाते. इंदिरा गांधी व भाऊंचा झंझावात विदर्भ, महाराष्ट्रातच नव्हे तर देशात सक्रीय झाला. त्यावेळी भाऊ इंदिरा गांधींच्या 'किचन कॅबिनेट'चे सक्रिय सदस्य होते. त्यानंतर इंदिरा गांधींनी 'गरीबी हटाव' चा नारा दिला आणि नंतर त्या बहुमतात सत्तेत आल्या. मात्र स्वंतत्र विदर्भाचा मुद्दा विसरल्या, म्हणून भाऊंनी काँग्रेसला सोडचिठ्ठी दिल्याचे सांगितले जाते. शिवसेनेचा सुरूवातीचा काळ. मुंबईत परप्रांतीयांना हुसकवून लावण्यावरून शिवसेनेवर गुन्हे दाखल झाले होते. राजकारणात त्याकाळी जांबुवंतराव बाळासाहेबांपेक्षा उंचीवर होते. त्यावेळी मुंबईत एका कार्यक्रमात जांबुवंतराव धोटे, बाळासाहेब ठाकरे, नामदेव ढसाळ एकत्र आले होते. तेव्हा एका इंग्रजी दैनिकाने 'लॉयन, टायगर अँड पँथर ऑन वन स्टेज' ही मुख्य बातमी केली होती. 'लॉयन (जांबुवंतराव धोटे), टायगर (बाळासाहेब ठाकरे) आणि पँथर (नामदेव ढसाळ)' एकत्र आल्याने महाराष्ट्राच्या राजकारणात मोठा बदल घडेल, अशा आशयाचे वृत्त छायाचित्रासह दिले हाते. लढाऊ बाणा हा जांबुवंतराव धोटे आणि बाळासाहेब ठाकरे यांच्यातील समान धागा होता. कालांतराने बाळासाहेब आणि जांबुवंतराव धोटे एकत्र आले. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंसोबतचा हा घरोबा मात्र फार काळ टिकला नाही. आपल्याला योग्य ते स्थान नसल्याची भावना झाल्याने जांबुवंतरावांनी बाळासाहेबांना एक दीर्घ पत्र लिहून, 'शिवसेनेला माझी अडचण होत आहे असे दिसते', अशी भावना व्यक्त करून हे पत्रच शिवसेनेचा राजीनामा समजावे, असे त्यात लिहिले होते. स्वतंत्र विदर्भाच्या मुद्यावर काँग्रेस, शिवसेना सर्वच पक्ष भेदभाव करतात हे लक्षात आल्याने त्यांनी 'विदर्भ जनता काँग्रेस' पक्षाची स्थापन केली.

आमदार असताना विधानसभा अध्यक्षांना पेपरवेट फेकून मारल्याने जांबुवंतराव धोटे यांची आमदारकी रद्द करण्यात आली होती. भारतात एखाद्या आमदाराची आमदारकी रद्द होण्याची ती पहिली घटना होती. त्यावेळी विदर्भातील यवतमाळ जिल्ह्याचेच वसंतराव नाईक हे मुख्यमंत्री होते. बाळासाहेब भारदेी विधानसभा अध्यक्ष होते. त्यांच्या अनुपस्थितीत पिंटो हे विधासभाध्यक्षाच्या खुर्चीत विराजमान होते. सभागृहात चर्चेचे घमासान सुरू असताना, अध्यक्षांच्या उत्तराने कोपलेल्या जांबुवंतरावांनी टेबलवरचे पेपरवेट विधानसभाध्यक्ष पिंटोंच्या दिशेने भिरकावले. सभागृहात एकच हलकल्लोळ झाला. खुद्द मुख्यमंत्री वसंतराव नाईकांनी धोटेंचे सभासदत्व रद्द करण्याचा ठराव मांडला. परंतु, विधानसभाध्यक्ष पिंटो धोटेंना इतकी कठोर शिक्षा द्यायला तयार नव्हते. मात्र मुख्यमंत्र्यांच्या आग्रहापुढे नमते घेत सभागृहाने धोटेंची आमदारकी रद्द केली. त्यानंतर झालेल्या पोटनिवडणुकीत जांबुवंतराव प्रचंड मतांनी निवडून परत सभागृहात गेलेच. जांबुवंतराव पाच वेळा आमदार तर दोन वेळा खासदार म्हणून प्रचंड मताधिक्क्याने निवडून आले होते. एकदा तर तुरूंगात असताना निवडणूक लढवूनही ते विजयी झाले होते. परंतु अलिकडच्या काही वर्षात त्यांना सातत्याने पराभवाचा सामना करावा लागला.

अकोला येथे कृषी विद्यापीठ स्थापन करण्यासाठी झालेल्या आंदोलनाचे प्रणेतेही भाऊ जांबुवंतराव धोटे होते. त्यावेळी प्रत्येक राज्यात केवळ एकच कृ विद्यापीठ असे केंद्र सरकारचे धोरण होते. पंरतु, विदर्भातील शेतकऱ्यांना कृषीतंत्रज्ञान अवगत व्हावे, येथील शेतकऱ्यांची मुले कृषी विषयक पदवीधर व्हावीत म्हणून भाऊंनी महाराष्ट्रात कृषी विद्यापीठ अकोला येथेच झाले पाहिजे, यासाठी जनआंदोलन उभारले. बघता बघता या आंदोलनाने संपूर्ण वऱ्हाड प्रांत ढवळून निघाला. या आंदोलनात अकोला येथे चार व अमरावती येथे पाच आंदोलक शहीद झालेत. अखेर शासनाला आंदोलनापुढे नमते घेऊन अकोला येथे कृषी विद्यापीठाची स्थापना करावी लागली. या कृषी विद्यापीठाचा मंगल कलश अकोला व नंतर अमरावती येथे आला तेव्हा 'न भूतो' अशी मिरवणूक निघाली होती. अमरावती येथे राजापेठ चौकात सकाळी ९ वाजता सुरू झालेल्या मिरवणुकीचे जोग चौकात रात्री १० वाजता विसर्जन झाल्याचा इतिहास आहे. जांबुवंतरावांच्या हाकेला ओ देऊन हजारो लोक कोणत्याही अपेक्षेशिवाय त्यांच्या सोबत घराबाहेर पडायचे. 'वा रे शेर, आया शेर' या घोषणांनी आसमंत दणाणून जायचा. जणू भाऊंच्या आयुष्यातील ते मंतरलेले दिवस होते. दक्षिणेत नेत्यांना आताही जी लोकप्रियता लाभते ती ६० ते ८० च्या दशकात विदर्भात जांबुवंतराव धोटेंच्या वाट्याला आली होती.

जांबुवंतराव वैयक्तिक आयुष्यही इतरांपेक्षा हटके जगले. विचारांची त्यांची स्वत:ची शैली होती. मात्र भूमिकेबाबत त्यांची संदिग्धता राहायची. राजकारणात त्यांचे अनेकांशी मतभेद झाले, मात्र त्यांनी मनभेद कधीच होऊ दिले नाहीत, हे त्यांचे स्वभाववैशिष्ट्यं. संकटात असलेल्या व्यक्तिची कधीच चिकित्सा करायची नाही, पहिले त्यांची मदत करायची, असा त्यांचा स्वभाव. देशात एकही नेता असा नाही की त्यांचा भाऊंशी संबंध नाही. नेता कितीही मोठा असो, भाऊ त्याला एकेरी नावानेच हाक मारणार, हे त्यांचे आणखी एक वैशिष्ट्य. त्यांचा आणि विजयाताईंच्या विवाहाचा किस्सा त्यांच्या स्वभावाचे वेगळेपण दर्शविणारा आहे. 'आकाशाच्या मंडपाखाली, समुद्राच्या साक्षीने आम्ही जन्मगाठी बांधल्या', असे ते नेहमी सांगायचे. त्यांना दोन कन्या आहेत. त्यांचीही नावे भाऊंचे वेगळेपण दर्शविते. ज्वाला आणि क्रांती अशी त्यांच्या मुलींची नावे आहेत. आमदार, खासदार राहूनही त्यांनी आयुष्यभर शासकीय रूग्णालयाचीच आरोग्य सेवा घेतली. ते कधीच खासगी दवाखान्यात उपचारासाठी जात नव्हते. शासनाच्या आरोग्य सेवेवर माझा भरवसा आहे. मीच खासगी दवाखान्यात गेलो तर माझे गरीब बांधव काय समजतील? त्यांनी उपचारासाठी कुठे जावे, असा प्रतिप्रश्न ते करायचे.

संगीत, चित्रपट, नाटक या क्षेत्रातही भाऊंनी मुशाफिरी केलेली. त्यांची निर्मिती व मुख्य भूमिका असलेला 'जागो' हा चित्रपट त्यावेळी बराच गाजला. लेखक शरदचंद्र टोंगो लिखित 'नव्या डहाळ्या नवे खोपे' या नाटकातही त्यांनी भूमिका केली होती. 'बलिदान' नावाचे वर्तमानपत्रही त्यांनी काढले होते. 'विदर्भ जनता काँग्रेस पक्षाची प्रबोधनगाथा' या ग्रंथाचे लेखन, संपादनही त्यांनी केले होते. या ग्रंथात त्यांचे जीवनविषयक तत्वज्ञान आणि राजकीय, सामाजिक चढ, उतारांवर भाष्य आहे.

गरीबांचा तारणहार असलेला हा लढवय्या सिंह गेल्या काही वर्षात मात्र निराश होता. परंतु ते नाउमेद झाले नव्हते. एक दिवस येथील व्यवस्था जनताभिमूख होईल, स्वतंत्र विदर्भ राज्य अस्तित्वात येईलच, हा आशावाद त्यांना शेवटपर्यंत होता. एका लढवय्या नेत्याची ही सिंहगर्जना आता विदर्भाच्या भूमीत कधीच ऐकू येणार नाही. एका सिंहाची ही चिरविश्रांती अस्वस्थ करणारी आहे.

नितीन पखाले, यवतमाळ

9403402401

Updated : 18 Feb 2017 8:42 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top