Home > Uncategorized > महाराज, आम्हाला माफ करा...!!!

महाराज, आम्हाला माफ करा...!!!

गेल्या अनेक दिवसांपासून महाराज आपण स्वत: अन् आपल्या मावळ्यांनी मिळून कमावलेलं हे स्वराज्य जळतंय. आरक्षणाच्या नावाखाली संपूर्ण महाराष्ट्र पेटलाय. तुमचं नावं घेऊन आज तुमचे अनेक मावळे आरक्षणासाठी आत्महत्या करतायेत. राजे खरचं तुम्ही असता तर असं स्वराज्यात घडलं असतं का ? राजे आम्हाला माफ करा पण खऱ्या अर्थाने आम्हाला नाही समजलं तुमचं स्वराज्य आणि तुमचा इतिहास.

राजे तुमच्या काळात ना जात होती ना धर्म फक्त होतं स्वराज्य...!! आणि याच स्वराज्यासाठी रक्त सांडलं आमच्या मावळ्यांनी. राजे तुम्ही मराठा होता हे आम्ही आज लोकांना ओरडून ओरडून सांगतोय, जय भवानी जय शिवाजी करत तुम्हीच निर्माण केलेल्या या स्वराज्यात जाळपोळ, हिंसाचार करतोय. राजे एवढचं नाही तर ज्या मावळ्यांच्या जीवावर तुम्ही दिल्लीही पालथी घातली तेच मावळे आज जातीजाती विखुरले गेले आहेत. राजे तुम्ही बाजी प्रभू देशपांडे यांची जात का नाही पाहिली. राजे तुम्ही जीवा काशीदची जात का नाही पाहिली. अवघ्या साठ मावळ्यांच्या जीवावर पन्हाळा मुघलांच्या तावडीतून पुन्हा स्वराज्यात आणला त्या फर्जंदची जात तुम्ही कधी विचारली का राजे ?

राजे तुमच्यावर अनेक संकटं आली, मुघलशाही, आदिलशाही, कुतुबशाही इतकंच काय आपले राजपुतही तुमच्यावर चाल करून आले. राजे तुम्ही कधी खचला नाही हताश झाला नाही तर पुन्हा जोमाने चाल करून शत्रुंचा फडशा तुम्ही पाडला. राजे आपण हताश, निराश झालेले असतानाही का तुम्ही आत्महत्या केली नाही ? आपले एक एक मावळे स्वराज्यासाठी प्रसंगी प्राण देऊनही लढत राहिले. आपण न्यायनिवाडा करतानाही कोणाची जात पाहिली नाही. पण माफ करा महाराज आज आम्ही तुमच्या नावावर हे सगळं करतोय. शेतकऱ्यांच्या पिकांच्या देठालाही हात लावला तर याद राखा अशी ताकीद तुम्ही मावळ्यांना दिली. स्वराज्यातील एकाही माणसाला त्रास झाला तर राजे तुम्ही दुखी: होत असे. पण आज राजे आम्ही तुमच्या नावावर सार्वजनिक मालमत्तेचं नुकसान करतोय. जाळपोळ, दगडफेक हे आमच्यासाठी नवीन नाही.

महाराज, आरक्षणाच्या नावावर तुमचं स्वराज्य पेटलंय, तुमचा प्रत्येक मावळा एकमेकांकडे जातीच्या नजरेतून पाहायला लागलाय. राजे तुम्ही फक्त मराठ्यांचे असं चित्र राज्यात निर्माण केलं जातं आहे. महाराज, स्वराज्याची आजची ही परिस्थिती पाहिली तर तुम्ही पुन्हा परत यावं हेच सतत वाटतंय. मागासलेल्यांना बाहेर काढण्यासाठी आरक्षण नव्हे तर उपाय तुम्ही नक्कीच शोधले असते. आरक्षण ही किड तुमच्या स्वराज्याला लागली आहे किंबहुना तुमच्या नावावर राज्य करणाऱ्या राज्यकर्त्यांनी ती जाणूनबुजून लावली आहे. प्रतिकुल परिस्थितीमध्ये निर्माण झालेली आरक्षण संकल्पना आज समाजात असंतोष निर्माण करण्याचं काम करू लागली. राजे आम्हाला माफ करा पण आम्ही विखुरले गेलो आहोत या राज्यकर्त्यांमुळे. तुमचं स्वराज्य राजे आम्हीच जाळतोय ते पण तुमचं नावं घेऊन..आज तुमचा मावळा आत्महत्या करतोय ते पण तुमचं नाव घेऊन...हातातला भगवा राजे शत्रुंवर चाल करून दिल्लीवरही धडक मारणारा होता. मात्र आज हातात भगवा घेऊन राजे आम्ही तुमचं स्वराज्य पेटवत आहोत. महाराज आम्हाला माफ करा...!!!

प्रविण नामदेव मरगळे

पत्रकार, टीव्ही 9 मराठी

Updated : 1 Aug 2018 2:11 PM GMT
Next Story
Share it
Top