संकटकाळी निवडणुकांचा मुद्दा डोक्यात तरी कसा येतो : उद्धव ठाकरे

संकटकाळी निवडणुकांचा मुद्दा डोक्यात तरी कसा येतो : उद्धव ठाकरे

पूरग्रस्त बांधवांसाठी आपण पूर्ण ताकदीनिशी उभे राहायला हवे, असे आवाहन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज पत्रकार परिषदेत केले. संकटकाळी निवडणुकांचा विचार तरी कसा येतो, असा सवाल करत उद्धव यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यावर निशाणा साधला. पुराच्या पार्श्वभूमीवर विधानसभा निवडणुका पुढे ढकलण्याची मागणी राज यांनी केली होती त्यावर उद्धव यांनी टोला लगावला.
“कोल्हापूर, सांगली, सातारामध्ये सध्या पूर ओसरतं आहे. कोल्हापूरमध्ये आलेल्या पूराला कारणीभूत कोण आहे?, कोणती यत्रंणा कमी पडली आहे? कोणती यत्रंणा सक्षम नाही यासारखे वाद घालण्यात काही अर्थ नाही, आणि वाद घालण्याची वेळ नाही. पूराच्या पाण्यात अजूनही काहीजण अडकले आहेत. त्यामुळे या परिस्थितीतून तातडीने मार्ग काढण्याची गरज आहे” असं मत शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांनी व्यक्त केलं.
शिवसेनेकडून जीवनावश्यक वस्तू, वैद्यकीय सेवा, औषधे, पशूवैद्य पाठवण्यात आले आहे. डॉक्टरांचे पथकही रवाना करण्यात आले आहे. पूर ओसरण्यास अजून काही काळ लागण्याची शक्यता आहे. पूर ओसरल्यावर पसरणारी रोगराई रोखण्याचे आवाहन आपल्या समोर आहे. आम्ही तयारी करत आहोत. संकटात पशूधन वाचवण्याकडेही लक्ष द्यायला हवे, यासाठी शिवसेनेकडून पशूवैद्यांचे पथक पाठवण्यात आले आहे. आता सगळ्यांनी संकटाचा मुकाबला करण्याची गरज असल्याचे उध्दव ठाकरे यांनी सांगितले.
पूरग्रस्तांना शिवसेनेकडून सर्वतोपरी मदत करण्यात येत आहे. एकनाथ शिंदे, दिवाकर रावते, शिवसेनेचे खासदार, आमदार यांच्यासह शिवसैनिक पूरग्रस्त भागात मदत कार्य करत आहे.
शिवसेना नेते सुभाष देसाई यांनी पूरग्रस्त भागात पाठवण्यात आलेल्या मदतीची माहिती दिली. पूरग्रस्त भागात मदत पोहचणे गरजेचे आहे. पूरग्रस्तांना मदतीची गरज असून शिवसेना त्यांच्या पाठिशी उभी असल्याचे त्यांनी सांगितले. पूर ओसरल्यावर मार्ग खुले होतील, त्याप्रमाणे शिवसेनेचे मदत कार्य करणारे पथक त्या भागात जाणार आहे. असे आदित्य ठाकरे यांनी सांगितलं.