Home > गोष्ट पैशांची > बॉण्ड्स : गुंतवणुकीचा उत्तम पर्याय

बॉण्ड्स : गुंतवणुकीचा उत्तम पर्याय

बॉण्ड्स : गुंतवणुकीचा उत्तम पर्याय
X

आपल्यापैकी बहुतेकांसाठी स्थिर उत्पन्न देणाऱ्या डेट, कंपनी ठेवी, फिक्स्ड इन्कम प्लॅन, मुदत ठेवी (एफडी) वगैरे प्रकारच्या गुंतवणुकीचे उद्दिष्ट्य एकतर नियमित उत्पन्न मिळवणे हे असते किंवा भांडवल वृद्धी साधणे हे असते. परंतु मध्यवर्ती बँक अर्थव्यवस्थेच्या आवश्यकतेप्रमाणे व्याजदर कमी-जास्त करत असते, तेव्हा स्थिर उत्पन्नाच्या गुंतवणुकीसाठी योग्य वेळ साधणे म्हणजे सामान्यांसाठी कठीण काम बनते. शिवाय या गुंतवणुकीतील मोठा अडथळा असतो तो महागाईचा. तुमच्या बचत खात्यावरील व्याजदर जर चार टक्के असेल आणि चलनवाढीचा दर जर चार टक्क्यांपेक्षा अधिक असेल तर प्रत्यक्षात तुमच्या पैैश्यांचे मूल्य कमी होते. भारतात सर्वसाधारपणे महागाईचा दर जास्त म्हणजे टक्क्यांच्या आसपास असतो. भाववाढीच्या अनिश्चित स्वरूपामुळे अनेक गुंतवणूकदार कोणत्याही प्रचलित व्याजदरात दिर्घकालीन गुंतवणूक करीत नाहीत. सध्याचीच परिस्थिती घेऊ. जेथे भाववाढीचा दर अनेक वर्षांच्या निच्चांकाला आहे आणि प्रचलित एफडी दर ८ टक्क्यांच्या जवळपास आहे. येथे गुंतवणूकदाराला प्रत्यक्ष व्याज परतावा ३-४ टक्के मिळत आहे, जो चांगला समजला जातो. पण जर बँकांनी ठेवींवरील व्याजदर कमी करण्याचे ठरवले किंवा GST मुळे महागाईचा दर वाढला तर परिस्थिती उलट होईल. २०१५ च्या अर्थसंकल्पात सरकारनं प्रचलित महागाई दराचा मागोवा घेणाऱ्या निर्देशांकाशी निगडित बाँड सादर करण्याचा आणि भाववाढीमुळे गुंतवणूकदाराला होणारे नुकसान भरून काढण्याचा प्रस्ताव मांडला होता. अशा बाँडना ‘इन्फ्लेशन इंडेक्सड बाँड (आयआयबी)’ म्हणतात. स्थिर उत्पन्न गुंतवणुकीत पैसा घालणाऱ्यांची प्राथमिकता भांडवलाचे संरक्षण करणे ही असते. कमी वृद्धी झालेली त्यांना चालते, पण भांडवलाच्या मूल्यातील घट ते अजिबात सहन करू शकत नाहीत. आयआयबी मुदतपूर्तीला किमान गुंतवलेले भांडवल परत मिळण्याची खात्री देतात. हे भाववाढीच्या विरोधात संरक्षण देईल आणि त्याच्यावर परतावा देईल अशा इतर कोणत्याही गुंतवणूक पर्यायात तुम्हाला कदाचित आढळणार नाही.

इन्फ्लेशन इंडेक्सड बाँड कसे काम करतात?

इन्फ्लेशन इंडेक्सड् बाँड (आयआयबी) हे सामान्यत: दीर्घकालीन, समजा १० वर्षांसाठी, बाँड असतात. आयआयबी दरवर्षी प्रचलित भाववाढ दरानुसार गुंतवलेल्या रकमेची जुळवणूक करण्याच्या सोप्या गणितावर काम करतात. यामुळे भाववाढीचा गुंतवणुकीवरील विपरीत परिणाम काढून टाकला जातो आणि प्रचलित व्याजदरानुसार तुमच्या मुद्दल रकमेचे पुर्नगणित मांडून अशा प्रतिकात्मक रकमेवर व्याज मिळते. भाववाढीशी जुळवणूक केलेल्या भांडवलाचे गणित करण्यासाठी दर वर्षी हीच पद्धत वापरली जाते आणि त्या रकमेवर व्याज काढून ते दिले जाते. मात्र जर भाववाढ दर गुंतवणूक केल्या वेळेपेक्षा कमी झाला तर भाववाढीशी जुळवणूक केलेली मुद्दलाची रक्कम मूळ गुंतवणूक केलेल्या मुद्दलापेक्षा कमी येते आणि मग मुदतपूर्तीला भाववाढीशी जुळवणूक केलेले मूल्य न देता भांडवल तुम्हाला परत दिले जाते.

सोन्याला पर्याय

अनेक गुंतवणूकदार त्यांच्या गुंतवणूक संचयाचा काही भाग सोन्यात गुंतवतात, जेणेकरून त्यांच्या एकंदर गुंतवणूक संचयाचे भाववाढीपासून संरक्षण होईल आणि गुंतवणूक संचयाची एकंदर अस्थिरता घटेल. सोने हे भाववाढीपासून बचाव करण्याचे व मूल्याची साठवणूक करण्याचे साधन आहे हे आज सर्वानाच माहीत आहे. पण सोने ही आता कमी जोखमीची गुंतवणूक राहिलेली नाही. अलीकडे सोन्याच्या किमतीत चढउतार दिसून आला आहे.

या उच्च अस्थिरतेमुळे अनेक गुंतवणूकदारांनी सोन्याकडे पाठ फिरवून स्थिर गुंतवणुकीचा शोध सुरू केला आहे. अशा गुंतवणूकदारांसाठी आयआयबी हा स्थिर उत्पन्न देणारा उत्तम पर्याय ठरतो, जो भाववाढीपासून बचाव करून घेण्यासाठी सोन्याची जागा घेऊ शकेल. भारतीय बाजारात हे बाँड सादर करण्याचा सरकारचा मूळ हेतू भारतीय रुपयाला आधार देऊन भारतीय अर्थव्यवस्थेला मदत करणे आणि चालू खात्यावरील (सीएडी) घाटा कमी करणे हा होता असे मानले जाते. कारण सोन्यासाठीची मागणी या दोन्हींवर परिणाम करते. आयआयबीमधील गुंतवणुकीमुळे गुंतवणुकीचा प्रवाह सोन्याकडून या बाँडकडे वळेल आणि अशा प्रकारे उद्देशित कारणांना मदत होईल

कमलेश भगत

Updated : 15 Jun 2017 7:13 PM GMT
Next Story
Share it
Top