Home मॅक्स ब्लॉग्ज बातम्या घडवणाऱ्यांची गोष्ट…

बातम्या घडवणाऱ्यांची गोष्ट…

टीव्ही न्यूज चॅनल्समध्ये मुक्त पत्रकार अर्थात स्ट्रिंगर फार महत्त्वाची भूमिका बजावतात. आजही सर्वच न्यूज चॅनलमध्ये ५० टक्क्याहून अधिक कंटेन्ट स्ट्रिंगर्स तयार करतात.
सध्या जवळपास सर्वच न्यूज चॅनल्सची आर्थिक स्थिती वाईट आहे. यामुळं जिल्हावार पगारी बातमीदार नेमणं परवडणारं नाही. हे फक्त भारतातलं चित्र नाही तर जगभरात हाच ट्रेन्ड सुरु आहे. स्ट्रिंगर्सची जबाबदारी घ्यावी लागत नाही, शिवाय त्याचं काम कधीही थांबवता येतं. असा मतलबी हेतू ही मॅनेजमेन्टचा असतो.
टीव्ही न्यूज चॅनल जेव्हा मशरुमसारखे वाढीला लागले होते. तेव्हा स्ट्रिंगर्स न्यूज चॅनलला हव्या तशाच बातम्या देत असत. किंबहुना चॅनलवाले त्यांचा आपल्याला हवा तसा वापर करत होते. हे म्हणजे “जाकी रही भावना जैसी, प्रभु मूरत देखी तिन तैसी” असंच होतं. एक स्पर्धाच सुरु झाली.
न्यूज चॅनल लोकांच्या बेडरुममध्ये घुसले. चार भिंतीतल्या जूली-मटुकनाथ प्रेमकथेचं महाभारत घडलं. बोअरवेलमध्ये पडलेला प्रिन्स वाचला. केमिकल लोच्यामुळं युपीतले आयजी डी के पांडा राधा बनले. नाचायला लागले. त्याची ही बातमी झाली. अगदी हेडलाईनमध्ये.
मुस्लिम समाजातल्या क्लिष्ट रुढीं संदर्भात ‘गुडीया किसकी’ असा रिएलिटी कार्यक्रम झाला. त्याचा निवाडा न्यूज चॅनलवर झाला. या सर्व बातम्या स्ट्रिंगर्सच्या होत्या. काही आपसूक घडलेल्या तर काही मुद्दाम घडवून आणलेल्या. यातून न्यूज चॅनल्सवर किती विश्वास ठेवायचा असा प्रश्न निर्माण झाला. न्यूज एंटरटेन्मेट झाली आणि पार वाट लागली.
इंडिया टीव्ही सारख्या तेव्हा चांगल्या बातम्या देणाऱ्या न्यूज चॅनलनं अशी काय कात टाकली की सर्व न्यूज चॅनल्सचा खाना खराबा करुन टाकला. यात जास्तीत जास्त स्ट्रिंगर्सच्या बातम्यांचा भर होता . २०११ च्या अण्णा हजारेंच्या आंदोलनानं बातम्यांमधली ही साप बिच्छूची विकृती संपली. त्यानंतरही आजपर्यंत बहुतांश स्ट्रिंगरच्या बातम्या न्यूज व्हिल फिरवत ठेवतायत.
परदेशात विशेषत‌: अमेरिकेत ही स्ट्रिंगर जमात वेगळ्या पध्दतीची आहेत. तिथं स्ट्रिंगरच्या माध्यमातून बातम्या घडवण्याची विकृती आली होती. मध्यंतरी तिथंही ही विकृती वाढली. न्यूज म्हणजे सेन्सेशन असं विचित्र गणित जगभरात झालं होतं. यावरच सणसणीत वार करणारा नाईट क्रॉलर (२०१४) हा सिनेमा भन्नाट आहे. विडंबनात्मक आहे पण कमालीचा डार्क आणि बातम्या तसंच पैश्यासाठी विकृत बनणाऱ्या माणसांची ही गोष्ट आहे. बेरोजगार ते स्ट्रिंगर आणि त्यानंतर स्ट्रिंगरचं कॉर्पोरेटीकपण असा सिनेमातल्या मुख्य पात्राचा प्रवास आहे. जॅक गॅलियानचा अभिनय मस्त आहे. शिवाय सर्वात महत्त्वाची म्हणजे अमेरिकेतल्या चॅनलची विकृत स्पर्धा आहे.
नाईट क्रॉलर पाहताना गेल्या अनेक वर्षांमध्ये मुंबईच्या काही भागातल्या घटना आठवल्या. या घटना घडवल्या गेल्या होत्या. बातम्यांसाठी त्या घडवणारे अजूनही याच इंडस्ट्रीत आहेत. त्यांचं काम तसंच सुरु आहे. ही खेदाची बाब आहे. आहे हे सर्व असं आहे.

चांगल्या पत्रकारितेसाठी तुमचं योगदान आवश्यक आहे.

सहभाग निधी साठी इथे क्लिक करा


Warning: A non-numeric value encountered in /home/maxmaharashtra/public_html/wp-content/themes/Newsmag2/includes/wp_booster/td_block.php on line 997