पुरात वाचवणारे गावोगावचे तारयामामा…

पुरात वाचवणारे गावोगावचे तारयामामा…

महाराष्ट्रातल्या महापूरात उध्वस्त झालेलं जनजीवन पाहून, त्यांच्या दुर्दैवी कहाण्या ऐकून प्रत्येक संवेदनशील सजीवाचं मन आज दु:खी आहे. लाखो मदतीचे हात आता पुढे येउ लागले आहेत. पैसा म्हणजे सर्वकाही झालेल्या काळात पैसा म्हणजेच सर्वकाही नाही हे दाखवून देणाऱ्या माणुसकीचा अनुभवही लाखो पिडीत घेत आहेत. कुठलीच शाश्वती नसतानाही आपले प्राण ज्यानी वाचवले त्यांच्या पायावर डोकं ठेवून माणसं आपल्या अशृंना याच महापुरात वाट मोकळी करून देतायत. NDRF ज्या जवानांनी दिवस रात्र केलेलं बचावकार्य हे तर अतुलनीयच आहे. दीड महिन्याच्या बाळापासून ते ऐशी वर्षाच्या आजोबांपर्यंत जीव या जवानांनी न थकता वाचवलेयत .
सर्वस्व गमावलेले लाखो लोक आज निवारा कॅम्प मध्ये पाणी ओसरायची वाट पाहतायत. पण NDRF पोहोचायच्या आधीही शेकडो स्थानिकानी स्वत:चा जीव धोक्यात घालून माण्सं वाचवली आहेत. पंचगंगा, दूधगंगा, वेदगंगा, घटप्रभा, हिरण्यकेशी, ताम्रपर्णी या नद्यांच्या किनाऱ्यांवरचं स्थानिकांनी केलेलं बचावकार्य तुम्हा-आम्हाला पडद्यावर पाहता येणार नाही. ही सगळी तरुण मंडळी म्हणजे त्या त्या भागातलं NDRF आहे. केवळ पुरात अडकलेल्या माणसांसाठीच नाही तर शक्य होईल तितक्या जनावरांनाही आपला जीव धोक्यात घालून या तरुणांनी वाचवलय. मला या स्थानिकांचं आधी कौतूक करायचय. त्याना कडकडीत सॅल्यूट आहे माझा!
हे सगळं आवर्जून लिहिण्याचं कारण म्हणजे याच काळात कोकणातही मोठा पूर आला होता. आणि इथेही स्थानिकच पुराच्या पाण्यात आपला जीव झोकून देत अडकलेल्यांची सुटका करत होते, महाड शहरात तीन दिवस दहा फूट पाणी भरलं होतं. तिथली आसनपुळी बिडवाडी गावं पाण्याने तुडुंब झाली होती. काल गांधारी आणि सावित्री नद्यांच्या पुराचा अजगरी विळखा या गावांना पडला होता. तिथे कोलाड रिव्हर राफ्टींगच्या महेश सानप यानी आपल्या सहकाऱ्यांसह दहा होड्या पुरात लोटल्या आणि बचावकार्य केलं. पेण, गोरेगावलाही पोहोचून ही टीम काळ वेळेची पर्वा न करता लोकांना वाचवत राहिली.
वशिष्ठीच्या पुराने चिपळूणला तीन दिवस बुडवलं. गाड्यांच्या टपाचे तराफे करुन तिथल्या माणसांनी अडकलेल्यांना बाहेर काढलं. जगबुडी, नारंगी नद्यांनी खेड आणि आसपासच्या साठ-सत्तर गावांना घेरलं. अर्जूना नदीच्या पुरात राजापूर शहर तर सलग तीन रात्र गळाभर बुडून होतं. राजापूरात दरवर्षी पाणी भरतं. पण यावेळेसारखा पूर गेल्या वीस वर्षात आला नव्हता. इथेही लोकच लोकांच्या मदतीला धावले.
सिंधुदुर्गात तर पुराचा कहर होता. कर्ली खाडीच्या पुराने अख्ख्या काळसे बागवाडीला कवेत घेतलं होतं. मालवण मधल्या मसुरे, हडी, बांदिवडे, आचरा, खोतजुवा या गावांमध्ये जमीनच दिसत नव्हती. म्हातारी कोतारी, महिला, पोरं-टोरं जसं जसं पाणी वाढेल तशी तशी पुढच्या घरात जाउन आसरा घेत होती. त्यात तिलारी धरणांचं बाहेर सोडण्यात येणारं पाणी वाढलं आणि निम्म्या दोडामार्ग तालुक्याला तिलारी नदीच्या अक्राळ-विक्राळ पुराने घेरलं. कुडासे , मणेरी कोनाळकट्टा गावातले लोक छातीभर पाण्यातून रातोरात बाहेर पडले. अख्खं बांदा शहर बुडालं. इन्सुली गावात पुराने वेढलेल्या घरातच माणसं अडकून पडली. अशा वेळी धावून आले ते या सगळ्यांचे गाववालेच.
खाडीकिनारी राहणाऱ्यांनी माडभर उंचीच्या पुरात आपल्या होड्या लोटल्या. ना कुठली लाईफ जॅकेट्स ना कुठल्या हवेने भरलेल्या ट्यूब्स. कोणतीही जीवरक्षक साधनं नसताना आपल्या साध्या होड्यांनी या जिगरबाज नावाड्यांनी व्हलवत – व्हलवत पूरग्रस्तांना नदी पार केली. इथेही नजर पोहोचेल तिथपर्यंत पाणीच पाणी होतं. शेकडो एकर शेती, बागायती पुराच्या पाण्याने गिळंकृत केली होती. जिथे जिथे पोहोचता येईल तिथे तिथे मी पोहोचत होतो. आमचे त्या त्या भागातले कोकणातले प्रतिनिधीही तहान भूक विसरून पाण्यात राहून बातम्या पाठवत होते.
आता विषय आलाय म्हणून या सगळ्या भागातल्या कव्हरेज मधला एक छोटासाच अनुभव सांगतो. सिंधुदुर्गातल्या काळसे बागवाडीतली साठ सत्तर घरं पाण्याने वेढलेली आहेत हे कळाल्यावर मी आणि माझा कॅमेरामन निघालो. दुपारचे बारा वाजले होते. आम्ही कट्टा पेंडूर मार्गावरून कुडाळ नेरूरपार रस्त्यावरच्या हुबळीच्या माळावर आलो. तिथल्या देवळात काही मंडळी बसली होती. ते बागवाडीतलेच पूरग्रस्त होते. पाणी कमी असताना आदल्या रात्री आपली गुरं घेउन मंदिराच्या आश्रयाला आले होते. मी त्यांना म्हटलं, तुमच्या वाडीत जायचंय. त्यातला एकजण मला ओळखत होता. तो म्हणाला, “खुळावलात काय केळुसकर? समोर बघा तरी व्हयता काय दिसताहा ता! मी त्याला विचारलं, “म्हणजे? इथूनच जावं लागणार की काय?” तर तो म्हणाला, “अवो दुसरो मार्गच नाय हा. रस्त्यावर पुरुषभर पानी भरलाहा. आनी हयसर तर दीड माड पानी हा. व्हयता काय ता बगताहाच तुमी. वारा बगा काय सुटलाहा! ह्या पानयात होडीवालो काय होडी घालीत असा वाटना नायहा. आताच गेलोहा वाडीत. तो येवचो नाय. वगीच डेरींग नुको करु ” (तळकोकणातली माणसं पाण्याची उंची फुटात, मीटरात मोजत नाहीत. इथलं माप म्हणजे एक पुरुष, दोन पुरुष, एक माड, दीड माड असं असतं. मच्छीमार तर समुद्राच्या पाण्याची उंची नॉटिकल माईल्स ऐवजी वाव मध्ये मोजतात.) त्याचं खरंच होतं. आमच्या समोरची परिस्थिती अत्यंत भयावह होती. या पाण्यातून कव्हरेजला जायचं हा विचारही मनात आणणं म्हणजे संकट ओढवून घेण्यासारखं होतं. जाता येणार नाही हे ऐकताच आम्ही थोडे हिरमुसलो. आमची ही घालमेल एका कॉलेज कुमाराच्या लक्षात आली.
तो म्हणाला, ” काका, थांबा. होडिवाल्याला फोन लागतो काय बघतो तो येत असेल तर” पाच सहा वेळा ट्राय केल्यावर त्याचा एकदाचा फोन लागला. होडिवाल्याशी मी बोललो. माझी तगमग त्याच्या लक्षात आली. तो म्हणाला येतो. यायला वीस मिनिटं लागतील. आणि परत गावात यायला पस्तीस मिनिटं. मी म्हटलं या तुम्ही लगेच. होडीवाला आम्हाला गावात न्यायला येणार हे कळाल्यावर आम्ही सज्ज झालो. सज्जता कसली? आमच्या दोघांकडे दोन छत्र्या! रेनकोटही नव्हता! फक्त कॅमेऱ्याला कव्हर घातलं आणि वाट पाहत बसलो . वीस मिनिटात होडीवाला आला. त्याच्यासोबत आणखी एक जण आणि गावातलीच दोन तरणी मुलं होती. होडी बघून तर आमच्या काळजाचा थरकापच झाला! त्या होडीला ना कुठला बॅलन्स रॉड. ना त्यात लाईफ जॅकेट, ना कुठली एअर ट्युब, ना दोरी ना काय… तरीही आम्ही होडीत बसलो. ती ही सर्व मंडळी होडीत बसली.
मी होडीवाल्याला विचारलं, एव्हढे सगळे जाऊ आपण? तर तो हसला. म्हणाला, “ओ ह्या कायचं नाय. धा पंद्रा मानसांका व्हरतय मीया ह्या होडक्यातसून ” आम्ही होडीत बसलो आणि सोसाट्याचा वारा आणि प्रचंड पाउस सुरु झाला. आम्ही छत्र्या उघडून धरल्या. भीतीने गाळण उडाली आमची! खरं तर मी कव्हरेजसाठी शेकडो वेळा खोल समुद्रात होडीने गेलोय. रात्र रात्रभर समुद्रात राहिलोय. मच्छीमारांसोबत अजस्त्र लाटांचे हेलकावे खाल्लेत. अनेकवेळा छातीभर पाण्यात उतरुन पीटूसी/वॉकथृ केलेयत. पण ही परिस्थिती खरंच डेंजर होती. कॅमेरामनचा माझ्यावर पूर्ण विश्वास होता. रिपोर्टर चाललाय म्हणजे आपण कच खाता कामा नये हे एक सूत्र त्याने आजवर सांभाळलं होतं. म्हणुनच आम्ही निघालो. आमच्या दशदिशांना कर्ली नदीच्या पुराचं पाणी, पाणी आणि पाणीच होतं. अर्ध्यावर गेल्यावर पुन्हा सोसाट्याचा वारा सुटला. पाउस सुरु झाला. सोबत आलेल्या कॉलेज च्या मुलांपैकी एका मुलाने कॅमेऱ्यावर छत्री धरली होती. दुसरी मुलगी होडीत भरणारं पावसाचं पाणी एका छोट्या भांड्याने पटापट उपसत होती. होडीवाला वाऱ्याचा विरुध्द दिशेने नेटाने व्हलवत होता. “तुमी काय्येक भीया नुको, हला नुको असं बजावत आम्हाला धीर देत होता” शेवटी अर्ध्या तासाने कसेबसे आम्ही जीव मुठीत घेउन काळसे बागवाडीत पोहोचलो. आणि
तिथले लोक कसे पाण्यात आहेत हे पाहिल्यावर आम्ही म्हणजे किस झाड की पत्ती असंच आम्हाला वाटलं.
तिथला सगळा भाग आम्ही चित्रीत केला. “पानी भरता वो दरवर्साक हय. पन ह्या येळचा पानी गेल्या वीस बावीस वर्षात असा येवक नाय ” प्रशासन येणं सोडाच, पूरग्रस्तांची मदत करायला एखादी मोठी होडीही इथे पाठवण्यात आलेली नव्हती. त्यात हा भाग शासनाने पूर्वीच ब्ल्यू झोन म्हणून घोषित केला असल्यामुळे यांना नुकसान भरपाई ही मिळणार नाही हे ऐकल्यावर मला सरकार नावाच्या कागदी व्यवस्थेचा संतापच आला. नैसर्गिक आपत्तीत माणसं मरत असतील तर कशाला निकष आणि कसले नियम आणते ही व्यवस्था? कव्हरेज झाल्यावर एक तासाने होडीवाल्याने पुन्हा त्याच परिस्थितीत आम्हाला रस्त्यावरच्या देवळाकडे सुखरूप आणुन उतरवलं. आम्ही चिंब भिजून थंडीवाऱ्याने कुडकुडत होतो. आणि या सगळ्यात माझ्या कॅमेरामनने कॅमेरा जिवापाड जपून सुरक्षित आणला होता.
असो. सांगायचा मुद्दा हा की आम्ही इतक्या भीषण पुरात कव्हरेज करु शकलो ते या होडीवाल्यामुळे. सिंधुदुर्गात नदी पार करणाऱ्या होडीवाल्याला तारया मामा म्हणतात. तारया म्हणजे तारून नेणारा! या पुराच्या काळात अशा अनेक तारया मामांनी आपले जीव धोक्यात घालून माणसं वाचवलीयत. घाबरलेल्या, भेदरलेल्या लोकाना धीर दिलाय. पुराच्या काळात सिंधुदुर्गात तर NDRF आलीच नाही. नाही म्हणायला NDRF ची एक तुकडी तिलारीत आली ती तिथली रेस्क्यूची गरज कमी झाल्यावर. त्यामुळे या काळात गावोगावच्या तारयामामांचीच NDRF कार्यरत राहिली. आमचे मालवणी कवी दादा मडकईकरांची एक कविता आहे.
तारया मामा तारया मामा
होडी हाड रे sss
बेगीन पोचय माका पैलाडी रे ..
पाळण्यात माजो झील निजलोहा
बापूस तेचो कट्यार गेलोहा ( कट्टा गाव )
घरात म्हातारी शीक आसा रे ssss
बेगीन पोचय माका पैलाडी रे …
दिनेश केळुसकर
(लेखक न्यूज18 लोकमतचे पत्रकार आहेत)