तत्कालीन एकलव्यापेक्षा आजच्या एकलव्यापुढची परिस्थिती ही अधिक प्रतिकुल

तत्कालीन एकलव्यापेक्षा आजच्या एकलव्यापुढची परिस्थिती ही अधिक प्रतिकुल

काल खूप वर्षांनंतर मेधा पाटकर यांना ऐकण्याची संधी ठाणेकरांना मिळाली. प्रामाणिकपणे सांगायचं तर मीही पहिल्यांदाच प्रत्यक्षपणे मेधाताईंना ऐकलं. टीव्हीवर बोलताना ऐकलं होतं.‌ पण प्रत्यक्षातला अनुभव भारावून टाकणारा आहे. त्यांच़ं भाषण आपल्याला समृध्द करतं. नागरिकांच्या मूलभूत प्रश्नांवर मेधाताई खूप तळमळीने बोलतात.
काल समता विचार प्रसारक संस्थेच्या कार्यक्रमात आणखी एका वक्त्याने उपस्थितांना अंतर्मुख केलं, ते म्हणजे कायद्याने वागा लोकचळवळीचे प्रणेते राज असरोंडकर यांनी. शिक्षण आणि आरोग्य या क्षेत्रांबाबतच्या सरकारी अनास्थेवर मेधा पाटकर आणि राज असरोंडकर या दोघांनीही कोरडे ओढले. संयमी भाषेत आक्रमक कसं बोलावं, ते अशा वक्त्यांकडून शिकावं. कसलाही बडेजाव नाही की विद्वत्तेचा आव नाही. सहजसोपी भाषा, वर्तमानातले संदर्भ, ओघवती शैली काल अनुभवायला मिळाली.
‘बीज अंकुरे अंकुरे ओल्या मातीच्या कुशीत कसे रूजावे बियाणे माळरानी खडकात.’
कवी मधुकर आरकडे यांच्या या ओळी. प्रतिकुल परिस्थितीवर मात करत शिक्षण घेणा-या ख-या एकलव्यांसाठी या ओळी समर्पक वाटतात या उद्गारांनी समता विचार प्रसारक संस्थेच्या एकलव्य पुरस्कार कार्यक्रमात मार्गदर्शक कायद्याने वागा लोकचळवळीचे प्रणेते राज असरोंडकर यांनी मनोगतारंभीच विद्यार्थ्यांची मने जिंकली.
एकलव्यापुढे तत्कालीन परिस्थितीत धर्मसत्तेसोबतच गुरुंचा वर्चस्ववाद होता. आजच्या एकलव्याला मात्र धर्मसत्तेसोबतच, आर्थिक, राजकीय सत्तेचाही सामना करावा लागत आहे. किंबहुना तत्कालीन एकलव्यापेक्षा आजच्या एकलव्यापुढची परिस्थिती ही अधिक प्रतिकुल आहे. शिक्षण, आरोग्य, स्त्रीसक्षमीकरण, समाज व्यवस्था, कुटुंब व्यवस्था अशा मुद्द्यांना राज असरोंडकर यांनी आपल्या मनोगतात स्पर्श केला.
शिकण्यासाठी लागणारं मनमोकळं वातावरण हे केवळ शिक्षण हक्क कायद्यात वाचायला मिळतं. प्रत्यक्षात मात्र कष्टकरी वर्ग शैक्षणिक सोयी सुविधांपासून वंचित असल्याचं दिसतं. अशा परिस्थितीत चव्वेचाळीस टक्के मिळवणारा सामाजिकदृष्ट्या दुर्बल असणारा विद्यार्थी चौ-याण्णव टक्क्यांच्या बरोबरीचा वाटतो. अशा एकलव्यांसाठी काम करणा-या समता विचार प्रसारक संस्थेचं हे फलित आहे. एकलव्य पुरस्कार प्राप्त विद्यार्थ्यांच्या ओळखीत ‘स्पष्ट बोलणारा’ ही ओळखही सद्य परिस्थितीत फार महत्त्वाची आहे. कारण आज विद्याविभूषित लोकांनाही बोलण्याची विनंती करावी लागते. लोकांनी बोलावं यासाठी काम करावं लागतं. अशा परिस्थितीत आपल्या प्रश्नांवर बोलणारा माणूस घडवण्याचं काम समता विचार प्रसारक संस्था करतेय. देशाची लोकसंख्या खूप वाढतेय, पण माणसं कमी होत चाललीत. समता विचार प्रसारक संस्थेचे एकलव्य ही माणसं जोडतील अशी आशाही राज असरोंडकर यांनी व्यक्त केली.