Home > मॅक्स ब्लॉग्ज > "उपेक्षित राहिलेला नामा सोंगाड्या"

"उपेक्षित राहिलेला नामा सोंगाड्या"

उपेक्षित राहिलेला नामा सोंगाड्या
X

गरीबाच्या घरी जन्माला आल्यानंतर आयुष्याची सुरुवातच संघर्षाने होते. त्यातच दलितांच्या घरी दोन वेळचा पोटाला घास मिळण्याची पंचायत असते. अशा वेळी नामाने तमाशामध्ये पोटासाठी पडेल ते काम हाती घेतलं. मग नशिबानं कधी हातात तुणतुण दिलं तर कधी झिलकरी, तर कधी गण गवळणीमधील गणराया चं वदंन. पुढे नामानं आपल्या हजर - जबाबी स्वभावाच्या जोरावर 'बतावणी' मध्ये त्याने स्वत:चं नाव कमावलं.

हाच नामा पुढं नामदेव नावानं ओळखला जाऊ लागला. मात्र, त्याला ओळखणारी आणि कलेची जाण ठेवणारी लोक त्याला "नामा सोंगाड्या " असं म्हणत असतं.

धोतराचा धडपा कमरेला गुंडाळून डोक्यावर पदर काढून तो मावशीची भूमिका निभावयाचा, त्यांचा रंग म्हणजे काळा जरात... टकलावरती चार पांढऱ्या केसांची बट होती, ती बट तो मिश्किल पणं उडवायचा, ती बट म्हणजे निसर्गानं त्याच्यासाठी दिलेलं एक वरदानच. खरं तर त्याची देहबोलीच लोकांना पोटभरुन हसवायची. ग्रामीण शेतकरी देखील आपलं सर्व दु:ख विसरून नामाला ऐकायला दूर दूर वरुन यायचे.

नामा जेव्हा रंगमंचावर एन्ट्री करायचा तेव्हा एखाद्या महिला कलाकाप्रमाणे नामाच्या नावानं टाळ्या, शिट्ट्या, आणि आरोळ्यांनी आसमंत भरून जायचा.

प्रत्येक शब्दाला पोट धरून हसायला लावणारा विनोद, ग्रामीण बोली भाषेतील चपखल शब्द, त्याची मांडणी करणारा नामा सोंगाड्या म्हणजे माणदेशातील दादा कोंडके होता.

त्या काळात गॅस बत्तीच्या उजेडात तमाशा चालायचा, सुगी सगायची कामं संपलेली असायची आणि गावोगाव च्या जत्रेत तमाशाचे फड रंगायचे.

एकदम कमी मोबदल्यात नामा इरळी करांचा तमाशा उपलब्ध व्हायचा, मी माझ्या लहानपणी डोरली जात असे. डोरली माझं आजोळ. माझं शिक्षण आजोळी इथंच झालं होतं. ब्रह्मनाथच्या देवळाच्या जवळच इरळी गाव होतं.

नामाच्या तमाशातील विषय हे नेहमी ग्रामीण बाज असलेलेच होते. भोवतालच्या शेतकऱ्यांच्या जीवनातील, वगनाट्यातील राजा अथवा राणी ही नामा इरळी करच्या तमाशात बघायला मिळायचे.

"नामा सोंगाड्या" सारखे लोक कलावंत हे नेहमी उपेक्षित राहिले. जन्माला आल्यापासून जगण्यासाठीचा संघर्ष वयाच्या 98 व्या वर्षापर्यंत त्यांच्या नशिबी आला.

हजारो तमाशा रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवणारा नामदेव इरळीकर ला वयाच्या 98 व्या वर्षी शासनाचे वसंत घरकुल योजनेतील घरकुल निधीअभावी मिळू शकले नाही.

उपेक्षित राहिलेल्या "नामा सोंगाड्या" नं आता आपल्यातून एक्झीट घेतली आहे. मात्र, नामाची कला इथल्या माणदेशी माणसाच्या मनात कायमची घर करुन गेली.

प्रा. लक्ष्मण हाके

Updated : 6 Nov 2019 8:06 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top