कृष्णामाई काठ सोडून गावात घुसली अन् सारा संसारच बुडवून गेली…

कृष्णामाई काठ सोडून गावात घुसली अन् सारा संसारच बुडवून गेली…

207
0
एकेकाळी इथल्या शिवारातून ट्रॅक्टरची घरघर चालायची. बैलगाड्या रस्त्यावरून धावायच्या. गाईगुरांच्या हबंरण्याच्या आवाजाने कृष्णाकाठ दणाणून जायचा. त्याच जागी आज बोटी तरंगू लागल्या. जिथे पाखरांचे ताटवे ऊसांच्या शिवारात घुसायचे तिथे अन्नाची पाकिटे पडू लागली. ज्या गल्लीतून कुत्र्यांच्या भुंकण्याचा आवाज गाव दणाणून सोडायचा. त्याच गल्लीत मेलेली कुत्री तरंगू लागली. यात्रा जत्रांच्या काळात ज्या कायलीत भंडाऱ्याची खीर शिजायची. त्या कायलीत चिमकल्यांची प्रेतं आणावी लागली. कुणाचं घर खाली बसलंय म्हणून कोणी टाहो फोडतय. कुणाचा सारा संसारच वाहून गेला म्हणून कोणी टाहो फोडतय. तर लाखमोलाचं पाटी दप्तर वाहून गेलं म्हणून एखादं चिमुकलं पोर ढसाढसा रडतय. तर एखादा चिमुकला आपलं कुत्र्याचं पिल्लू गेलं म्हणून. तर कुणाचं आणखी काही होत्याचं नव्हतं झालं म्हणून…
कृष्णामाई काठ सोडून गावात घुसली अन सारा संसारच बुडवून गेली. फुटाफूटवर मरण दिसू लागलं. कुणाची आई गेली. कुणाचा बाबा गेला. कुणाचं तान्हं बाळ गेलं. पण मरतानाही त्यानं हात नाही सोडला आईचा. आईनही निभावलंच की आईपण. त्याला शेवटपर्यंत बिलगून राहण्याचं. ढासळत होतं घर पण नाही फोडला हंबरडा. घेतली उचलून बायका पोरं खांद्यावर. तेवढाच उरला होता संसार. गळ्यापर्यंत लागलं होतं पाणी पण नाही सोडला धीर. बुडायलाच लागल्यावर मात्र कोलमडून गेला मालक. डोळ्यादेखत धरडपडणाऱ्या गाई म्हैशी बघणं आलंच त्याच्या जीवावर. कापल्या दोऱ्या लटलटत गळ्यांच्या. आपलाच गळा कापतोय असा झाला भास. पण केलं मुक्त त्यांना कायमचं नात्यातून. लावली धारेला. सोडली अखेरच्या प्रवासाला. निघाली होती ज्या पाण्यातून तडफडत. त्याच पाण्यात सोबत वाहत होते. जीवापाड जपलेल्या त्यांच्या मालकाचे सांडलेले अश्रू. एखादा मालक जात होता होडीत बसून. त्याला बघून हंबरडा फोडीत बुडत होती एखादी गाई म्हैस. ढसाढसा रडत मालक बघत होता शेवटचा तिच्या देखण्या रूपाकडं. मालक बघत होता शेवटचा तिच्या गळ्यातील कापलेल्या दाव्याकडं. मालक बघत होता शेवटचा तिच्या बुडालेल्या स्तनाकडं. त्यांनीच जगवली पोरं बाळं. त्यांनीच जगवलं घरदार. त्यांनीच वर काढलं घरदार. त्यांनीच फेडलं घरादाराचं पांग…
आता बाहेर येतील जाकीटे चढवलेले इथल्या संस्कृतीचे पांढरे रक्षक-भक्षक. करतील सुरू हेच बगळे श्रेयवादाची लढाई. काढतील खचाखच फोटो गाळात रुतलेल्या माणसांचे. चिकटवतील घरातल्या अल्बम मध्ये नेऊन. देतील नाव “महापुराच्या कटू आठवणी.” माणसं, गुरं ढोरं मरून पडलेल्या काळ्या कुट्ट गाळात काठ्या खुपसवून उभे करतील पांढरे शुभ्र बॅनर. झळकवतील संस्कृती रक्षणाच्या गोष्टी. ज्या अदृश्य हातांनी केली खरी मदत राहतील ते पडद्यामागेच. ज्या अदृश्य हातांनी पुसले अश्रू ते नाहीत कधीच येणार पुढे. ज्या अदृश्य हातांनी दाखवली माणुसकी तेच होते खरे संस्कृतीचे रक्षक. तेच असतील संस्कृतीचे रक्षक. त्यांनीच राखली माणुसकी. त्यांनीच जागवली माणुसकी. त्यांनीच जिवंत ठेवली माणुसकी. आता येतील गावागावात गव्हाची पाकिटे. पण नेवून दळायची कुणाच्या जात्यावर. जातंच रुतून बसलंय गाळात. पडणार तरी कसं पीठ बाहेर…
पण उगवेल नवी पहाट… उगवेल नवा सूर्य… राहील नव्याने पुन्हा उभा कृष्णाकाठ… राहतील उभ्या नव्याने भिंती… राहतील उभे नव्याने संसार… राहिल पुन्हा उभा मोडलेला माणूस… पुन्हा हंबरतील नव्याने इथली नवी गाईगुरे… जगवेल मातीच पुन्हा…
कारण,
“मोडून पडला संसार तरी मोडला नाही कणा
पाठीवरती हात ठेऊन, फक्त लढ म्हणा…”
© ज्ञानदेव पोळ