Home मॅक्स ब्लॉग्ज समाजसेवेची भूक भागवणाऱ्या जेवणाची गोष्ट

समाजसेवेची भूक भागवणाऱ्या जेवणाची गोष्ट

228
0
Support MaxMaharashtra

अभिलाष गोजे(Abhilash Goje) हा यवतमाळ मधील संतोषी बिर्जे यांच्या सहारा बालग्राम मध्ये राहून तेथेच शिक्षण घेत मोठा झालेला युवक. अभिलाष सध्या औरंगाबाद मध्ये असतो. औरंगाबाद मध्ये त्याने एक खानावळ सुरू केली आहे. ही खानावळ हा त्याच्या पोटापाण्याचा व्यवसाय नाही, तर ती सामाजिक कार्याचाच एक भाग आहे.

स्पर्धात्मक परीक्षांच्या तयारीसाठी मराठवाड्यातील विविध ग्रामीण भागातून औरंगाबादमध्ये येऊन राहिलेल्या युवक-युवतींना या खानावळीचा मोठा आधार झालाय आणि त्यातून मिळणारा नफा पुन्हा शाश्वत फाउंडेशनच्या माध्यमातून सामाजिक कार्यात वरच खर्च होतोय. समाजसेवेची भूक भागवणाऱ्या जेवणाची ही गोष्ट.

एका अपरिहार्य परिस्थितीत सहारा बालग्राममध्ये अभिलाषचं बालपण गेलंय. बालकांपासून ते वयोवृध्दांपर्यंतची माणसं तिथे असतात. यवतमाळमधील सामाजिक कार्यकर्ते संतोष बिर्जे आणि प्रीती बिर्जे यांच्या संकल्पनेतून सहारा बालग्राम साकार झालंय. अशा प्रकारचं कुठलंही सामाजिक कार्य करताना मोठी अडचण असते ती आर्थिक पाठबळाची. आपल्याकडे सामाजिक क्षेत्र प्रामुख्याने देणग्यांवरच अवलंबून असतं. पण एकूणच देणग्यांच्या बाबतीत असलेली समाजाची उदासिंता सामाजिक कार्याच्या वेगाला खेळ घालणारी ठरली आहे. अशावेळी आपल्याला समाजकार्य करायचं असेल तर स्वतःचा आर्थिक स्त्रोत उभा करणं गरजेचं आहे, ही भावना अभिलाषच्या मनात घर करून होती. त्यातूनच सहारा भोजनालय उभं राहिलं.

व्यवसायसुध्दा सामाजिक बांधिलकी जपणारा हवा, हे सूत्र अभिलाषच्या डोक्यात होतं. औरंगाबादेत सद्या स्पर्धात्मक परीक्षांची तयारी करून घेणाऱ्या खाजगी क्लासेसचं मोठं पेव फुटलं आहे. पुण्यानंतर हा व्यवसाय आता औरंगाबादेत येऊन स्थिरावला आहे. औरंगापुरा या भागात आपल्याला अशा खूप साऱ्या क्लासेसचे फलक दिसतात. मराठवाड्यात अशा क्लासेसची वानवा आहे. त्यामुळे विद्यार्थी औरंगाबादमध्ये येऊन राहतात आणि परीक्षांची तयारी करतात. मोठा प्रश्न असतो, निवारा आणि भोजनाचा. पुण्याच्या धर्तीवर इथेही आता काॅट बेसीसवर राहण्याची व्यवस्था आहे. महिना दीड ते दोन हजारांत ती होते. पुढची सोय जेवणाची हवी असते. तिथे खानावळी काही येतात. पण घरची चव मिळत नाही. शिवाय व्यवसायिकता दर्जाशी तडजोड करते. अशावेळी अभिलाषचं सहारा भोजनालय विशेषत: आर्थिक दुर्बल कुटुंबातील विद्यार्थ्यांसाठी त्यातही मुलींसाठी मोठा आधार बनलं आहे.

धुळे, कोपरगाव, वाशिम, भंडारा अशा विविध भागातून आलेल्या मुलींसोबतच्या गप्पांतून ही गरज अधोरेखित होते. एकतर हाॅस्टेलसारखं राहणं असल्याने वेळेचं बंधन असतं. शिवाय, औरंगाबाद सुरक्षिततेच्या दृष्टीने फारसं पूरक शहर नसल्याचं या मुलींचा अनुभव आहे. त्यामुळे मुलांना जसा अर्धवेळ नोकरी करून शिक्षणाचा खर्च भागवता येतो, ती सोय मुलींना नाही. त्यांना खर्चासाठी कुटुंबियांवर अवलंबून राहावं लागतं. साधारण वार्षिक एक लाखापर्यंत हा खर्च जातो. तो सगळ्यांनाच परवडणारा नसतो. त्यामुळे माफक दरातील निवारा आणि भोजन ही या विद्यार्थ्यांसाठी दिलासा ठरतो. अभिलाषने याच वर्गाला डोळ्यासमोर ठेवून खानावळीचं नियोजन केलंय.

सहारा बालग्राम चे पालक संतोष गर्जे आणि प्रीती गर्जे यांच्या हस्ते या खानावळीचं उद्घाटन झालं. बालग्राम परिवारातील, मुंबईतील ऊद्योजिका शुभा बेनुरवार यांनी यात पुढाकार घेत, स्वतः आर्थिक पाठबळ दिलं. वैष्णवी सावंत आणि त्यांच्या टीमच्या सहकार्यातून मासिक खानावळ सुरू करण्याचा निर्णय झाला. सद्या ७० विद्यार्थी या खानावळीत नियमित भोजनाचा आनंद घेताहेत. शाश्वत फाऊंडेशन च्या वतीने ही खानावळ सुरू आहे. त्यातून मिळणारा नफा शाश्वतच्या माध्यमातून सुरू असलेल्या इतर सामाजिक उपक्रमांसाठी वापरला जातोय. अभिलाष याला सामाजिक उद्योजकता म्हणतो. यातून समाजसेवेची भूक सांगते आणि स्पर्धात्मक परीक्षांत सफल होण्यासाठी धडपडणाऱ्या ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या जेवणाचीही. त्यांच्या शैक्षणिक धडपडीत माझं हे लहानसं योगदान आहे आणि शाश्वतच्या सामाजिक कार्यात त्यांचं !!! असं अभिलाष म्हणतो. अभिलाषच्या या कामात त्याची आईसुध्दा त्याच्या पाठीशी आहे. खऱ्या कमाईतून केलेल्या सामाजिक कार्याचं मानसिक समाधान काही औरच असतं, असं तो आवर्जून सांगतो.

चांगल्या पत्रकारितेसाठी तुमचं योगदान आवश्यक आहे.

सहभाग निधी साठी इथे क्लिक करा


Warning: A non-numeric value encountered in /home/maxmaharashtra/public_html/wp-content/themes/Newsmag2/includes/wp_booster/td_block.php on line 997