Home मॅक्स ब्लॉग्ज महिला सुरक्षेला प्राधान्य, पण सत्तेत सहभाग कुठाय?

महिला सुरक्षेला प्राधान्य, पण सत्तेत सहभाग कुठाय?

628
0
Support MaxMaharashtra

स्वतंत्र महिला धोरण असलेलं भारतातलं पहिलं राज्य म्हणजे महाराष्ट्र.(Maharashtra)  १९९४ मध्ये शरद पवार(Sharad Pawar) मुख्यमंत्री (CM)असताना महाराष्ट्राने आपलं महिला धोरण तयार केलं होतं. शरद पवारांच्या पुरोगामी प्रतिमेत ते धोरण मानाचा तुरा रोवणारं ठरलं होतं. तेच शरद पवार जे आजच्या महाराष्ट्रातील महाआघाडीच्या सरकार स्थापनेचे शिल्पकार आहेत. आताही किमान सामाईक कार्यक्रमात महिला सुरक्षेला प्राधान्य आहे, पण सत्तेत सहभाग मात्र नाही.

२८ नोव्हेंबरला या सरकारचा शपथग्रहण सोहळा मुंबईत (Mumbai) शिवाजी पार्कवर(Shivaji Park) संपन्न झाला. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्यासोबत शिवसेना,(Shivsena) काँग्रेस (Congress)आणि राष्ट्रवादी ह्या राजकीय पक्षांच्या सहा मंत्र्यांनी शपथ घेतली. मात्र त्या ऐतिहासिक सोहळ्यात एखाद्या महिला मंत्र्याची शपथ घडवून आणण्याची सुवर्णसंधी महाआघाडीने गमावली. अगदी शरद पवार हे ह्या सगळ्या घडामोडींचे कर्तेकरविता असतानासुद्धा.

महाराष्ट्र विधानसभेतील महिला आमदारांची आजवरची सर्वाधिक संख्या २०१४ मधील होती. मावळत्या विधानसभेत २८८ आमदारात २० आमदार महिला होत्या. २७७ महिलांनी आमदारकीसाठी निवडणुकीत टक्कर दिली खरी, पण त्यातल्या २३७ जणींची अनामत रक्कम जप्त झाली होती. ८५ ला १६, ९० ला ६, ९५ ला ११, ९९ ला १२, २००४ ला १२, २००९ ला ११ आणि २०१४ ला २० असं विधानसभेतलं महिलांचं प्रतिनिधित्व राहिलेलं आहे. यंदाच्या निवडणुकीत हा आकडा अवघ्या ४ ने वाढून २४ झाला आहे. हे प्रमाण महाराष्ट्र विधानसभेतील एकूण सदस्यसंख्येच्या ८.३३ % इतकं आहे.

हे ही वाचा…

ठाकरे सरकार बहुमत चाचणीत पास!
अधिवेशन बेकायदेशीर असल्याचा देवेंद्र फडणवीसांचा आरोप विधानसभा अध्यक्षांनी फेटाळला
सभागृहात रिमोट चालला नाही

महाराष्ट्रात ८.९७ कोटी मतदार असून त्यात ४.३८ कोटी महिला मतदार आहेत. महिला मतदारांची संख्या लक्षणीय असली तरी प्रत्यक्ष निवडणूक प्रक्रियेतील त्यांचा सहभाग खूपच कमी आहे. यंदाच्या विधानसभा निवडणुकीत महाराष्ट्रात एकूण ३,२३७ उमेदवार रिंगणात होते. त्यात २३५ म्हणजे फक्त ७.३ टक्के महिला उमेदवार होत्या. महाराष्ट्रात एकूण २८८ विधानसभा मतदारसंघ आहेत. त्यातील फक्त १५२ मतदारसंघातून महिला उमेदवारांनी निवडणूक लढवली. त्यातल्या २४ जागांवर महिलांना यश मिळालं.

महाराष्ट्रातलं राजकारण ज्या पाच प्रमुख राजकीय पक्षांभोवती फिरतंय, त्या शिवसेना, भाजपा, काँग्रेस, राष्ट्रवादी आणि वंचित आघाडीने मिळून विधानसभेला ५० स्त्री उमेदवारही दिले नव्हते. ज्या २४ स्त्री आमदार निवडून आल्यात त्यात, २ जणी अपक्ष आहेत. उर्वरित २२ मध्ये भाजपाच्या १२ आमदार आहेत. त्याखालोखाल काँग्रेसच्या ६ आमदार आहेत. काॅंग्रेसकडून सुलभा खोडके, यशोमती ठाकूर, सरोज अहिरे, वर्षा गायकवाड, प्रणिती शिंदे आणि प्रतिभा धानोरकर निवडून आल्या आहेत.

आश्चर्यकारक स्थिती शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसची आहे. पवारांसारखा पुरोगामी ओळख असलेल्या नेत्याच्या पक्षाच्या २८८ सदस्यांत केवळ २ आमदार आहेत, ज्यांना राजकीय कौटुंबिक पार्श्वभूमी आहे. एक सुमन पाटील आणि दुसऱ्या आदिती तटकरे. मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या शिवसेनेत लताबाई सोनावणे आणि यामिनी जाधव या २ स्त्री आमदार आहेत.‌ याशिवाय, विधानपरिषदेत स्मिता वाघ, डाॅ. मनिषा कायंदे, डाॅ. नीलम गोऱ्हे, हुस्नबानू खलिफे आणि विद्या चव्हाण या सदस्या आहेत. याचा अर्थ, विधिमंडळात महाराष्ट्र विकास आघाडीकडे १५ स्त्री आमदार आहेत.

कायदेशीर तरतूदीनुसार, २८८ संख्याबळाच्या विधानसभेत कमाल ४३ जणांचं मंत्रिमंडळ बनू शकतं. अगदीच ५० टक्के नव्हे, पण सत्तेतला २५ टक्के वाटा धरला तर किमान १० तरी महिला मंत्री सरकारात असतील काय?


Warning: A non-numeric value encountered in /home/maxmaharashtra/public_html/wp-content/themes/Newsmag2/includes/wp_booster/td_block.php on line 997