Home > मॅक्स वूमन > स्पेन डायरी > स्पेन डायरी भाग  - १३

स्पेन डायरी भाग  - १३

स्पेन डायरी भाग  - १३
X

व्यालेंशीयाचे स्थानिक इतके स्वच्छ होते ना की आपला चेहरा जमिनीवर टिपून घ्यावा. आम्ही गेलो, आधी टोकन मिळते मग जाऊन तिकिटं काढायची. सगळे कसे शिस्तीत मर्से, जाउमा आणि डिक तिघेही आमच्या तीकीटाचा सोपस्कार होईतोवर थांबले होते. अंमळ उशीरा पोहोचल्याने पुढील ट्रेन तीनला होती आणि आमच्या हातात तब्बल दीड तास होता; पण करता काय अडला हरी! मग तिथंच स्थानकावर काही दुकाने होती, त्यात स्पॅनिश खासियत नेचुरा हे दुकान, आम्ही आत गेलो, खुप छान छान वस्तु होत्या, आणि गंमत म्हणजे चपला, कपडे तर चक्क भारतीय होते. मला भारी मौज वाटली. माझे डोकं गरम म्हणून मी शेकायची एक बॅग घेतली. मग स्थानकात असलेल्या प्रसाधन गृहात गेले, तिथं एक युरो इतके शुल्क होते, त्यावर एक स्पॅनिश माणूस इतका भांडत होता, मी इथेच पी करणार, किती महाग आहे ईत्यादी ईत्यादी... मला जरा ऐकून बरं वाटलं म्हटल क्या बात हैं भारता बाहेरही असे होते तर; त्याच्या शिव्या काही कळल्या नाहीत म्हणून थोडी उदासही झाले, पण मी मात्र पर्याय नसल्याने आत गेले.

आहाहा ! काय रमणीय प्रसाधनग्रुह, आयुष्यात इतकी फिरले पण असं सुंदर, स्वच्छ, कलासक्त बाथरूम प्रथमच पहिलं. सगळीकडे मंद तरीपण मन प्रसन्न करणारे आकर्षक दिवे, सुंदर भिंतीवर रंगेबेरंगी चित्रे, वातावरणlत मंद सुवास, मॅन्यूअल काहीच नाही. वेगवेगळ्या सुवासिक शॅम्पू व साबण वड्या. तरीच इतके महाग शुल्क होते तर आणि कितीही वेळ घ्या, आत वेळेचे बंधन बिल्कुल नाही. पाहिजे तर मेकप करत बसा. वाह दिल बाग बाग हुआ. चिक्कार वेळ होता म्हणून मग बारकाईने निरीक्षण करत बसले; गोलाकार बसायला बाकं, ठिकठिकाणी कचरा कुंड, येणारे सहप्रवासी, माणसांचे जणु क्षनिक धावते जग! इथं बस, ट्रेन अगदी वेळेत येतात, जरा वेळ चुकली की तुमचे राम नाम सत्य झालंच म्हणून समजा; भारतासारखे शेवटच्या वेळपर्यंत हात दाखवा,गाडी थांबवा, ड्रायव्हरला खेचून बाहेर काढा, मोटरमनचं डोकं फोडा असले चाळे नाहीत. त्यामुळं तीनच्या ठोक्याला बरोब्बर आमची ट्रेन अवतरली आणि आम्ही आमच्या कोच कडे कूच झालो. इथं सगळ्या ट्रेन्स वातानुकूलित, आमची रेन्फे होती माद्रिदला जाणारी. बसल्यावर लगेचच सेविका कानात ऐकायला ईअर

फोन व पेपर जो अर्थात वाचू न शकणारा घेऊन हाज़िर झाली. मी लहान बालिके सारखे काचेला तोंड लावून बाहेरील दृश्य पाहण्यात मग्न झाले. काही झालं तरी स्पेनच्या राजधानीत चालले होते ना. मग मनात हर्षाच्या उकल्या फुटत होत्या. एका प्रधीर्घ काळानंतर एकदाचे अखेर आम्ही माद्रिदला पोहोचलो. अबब किती मोठ स्टेशन? एखादा गावकरी जर पहिल्याच खेपेला मुंबईला आला आणि चर्चगेटच्या लोंढ्यात त्याला सोडले तर काय होईल त्याचे?आमचेही डोळे दीपले. बरेच जीने चढउतार केल्यावर आम्ही इन्फर्मेशन सेंटर जे रेल्वे स्थानकातच असते तिथं गेलो आणि आम्ही जे बुकिंग केल होतं तसंच इतरही प्रेक्षणीय स्थळ कशी आणि किती वेळात पाहता येतील त्याची सविस्तर माहिती करून घेतली. इथं एकतर इंग्लिश भाषेचा खड्खडाट त्यामुळे माहिती देणारा इंग्लिश बोलतो म्हणजे आम्हांला आसमान ठेंगण झालं परंतु तो इतका जलद बोलत होता की एक ओळ कळायला मला बराच वेळ लागत होता. परत परत खात्री करून घेवून आम्ही स्टेशनाबाहेर पडलो खरं पण चुकीच्या ठिकाणी.

म्हंटल जाऊद्या तरी फूट्पाथ ओलांडला खूप वेळ गेला आणि सारखे नाव असलेल्या चुकीच्या हॉटेलमध्ये गेलो. तिथंला भरमसाठ दर ऐकून ऐन उन्हाळ्यात दर्दरून घाम फुटला. परत येरे माझ्या मागल्या करत स्टेशन वर आलो; यावेळेस मात्र नीट विचारून त्याच तिकिटlवर इछीत स्थळी जाता येते असे कळले मग आम्ही सामानाच्या बॅगा ओढत रेन्फेने गेलो. त्यात आणि गडबड काही रूट्स बंद झालेले, माझा जीव अगदी रडकुंडीला आलेला पण सांगते कोणाला? आलिया भोगासी असावे सादर! कसेबसे पोहोचलो एकदा पण, त्या स्थानकावरुन आमचे ठरवलेले हॉटेल इतके लांब होते आणि कोणालाच नीट पत्ता सांगता येत नव्हता की मी भोकान्ड पसरायचे बाकी होते; पण मला काय माहिती की ही फक्त झलक आहे असली पिक्चर तो बाकी आहे! तरी आपले सामान ओढत, खुर्डत एकदाचे पोहोचलो, चक्क एक तास आम्ही चालत होतो. आता मला कळले की इतके आमिष दाखवून का हे डील मला मिळाले होते असो! एकदाचे चेक इन केले आणि गादीवर मान टाकली, कायमची नाही हो तात्पुरती...

डॉ. मनिषा कुलकर्णी

Updated : 16 Jun 2017 6:04 AM GMT
Next Story
Share it
Top