स्पेन डायरी भाग- 10

स्पेन डायरी भाग- 10
X

सकाळी लवकर उठून जर कुठे प्रवास असेल तर आदल्या रात्री मला बिलकूल निज येत नाही. एकतर मी वेळेची पक्की आणि दुसरे म्हणजे आपल्या मुळे इतर खोळंबतील हेही मला भावत नाही. तर उद्या सन खावीयरला निघायचे म्हणत मी घाईने बॅगा पॅक केल्या आणि जवळच राहाणाऱ्या जौमाच्या घरी त्या ठेवून आले. मग संध्याकाळी परत थोडा वेळ कातालून्या ला फिरुन आले. या वेळी मला दुकानात म्यागनेट असलेले छोटे छोटे केकटस दिसले. हे इतके भारी होते ना की घेण्याचा मोह आवरेना पण विमानात चेकिंगची अडचण म्हणत मूग गिळून सॉरी आइसक्रीम गिळून उगी राहीले. माझ्या स्वभावत एक दोष आहे; मी कुठेही गेले की तो प्रदेश इतका पालथा पाडते ना की तिथली सर्व ठीकाण, गल्ल्या, रस्ते, दुकानं तोंडपाठ होतात. तर अशी परत परत ला राम्ब्ला जाण्यास मी यावेळेसही उत्सुकच होते. सकाळी साधारण सर्वांचे आटोपेपर्यंत साडेआठ वाजले, एका भल्या मोठ्या लीमोजीन गाडीतून आमचा लवाजमा निघाला होता. गाडी दस्तुरखुद्द मर्से चालवत होती. मूळची उंच, गोरीपान, लाल गडद टॉप व खाकी रंगाची हाफ पँट घालून खूप लाघवी दिसत होती. कानात मेचिंग डुल व गळ्यात नाजुक साखळी घातलेली मर्से आमची सकाळ प्रसन्न करुन गेली! गाडीने सान खावीयर पर्यंतचा आमचा प्रवास उणापुरा सात ते आठ तासांत पार पडला; मागे म्हंटल्याप्रमाणे स्पॅनिश लोक वाटेत भरपूर थांबत गप्पा, कॉफी, सिगारेट याचा आस्वाद घेत रमतगमत गाडी चालवतात. मर्सेही "पी पी" कोणाला करायची म्हणत मोटेल आले की गाडी थांबवायची. कतालनमध्ये "पी पी" म्हणजे लघुशंका! तर असे मजल दरमजल करत आमचा हा कारवा मुक्कामी पोहोचला.

सान खावीयर हे एक छोटेसे शहर, मुर्सिया या स्पेनच्या दक्षिण पूर्व भागात वसलेले आहे. कोस्ट कलिडा ऑफ मुर्सीयाच्या तीरावर हे शहर साधारण 74 पर स्क्वेर किलोमीटरच्या परिघात स्थित आहे. समुद्र सपाटीपासून जवळपास चार मीटर उंच आहे. असं म्हंटल जातं की साधारण सतराव्या शतकात या शहराची स्थापना झाली असावी, ज्याची प्रचिती सेंट फ्रान्सिस खावीयर याच्या चापेल वरुन येते. या शहराचा इतिहास इथले समुद्र, हवा आणि जमिनीवरून सहज बांधता येतो. कस्तील्लीयन, अरागोनीस आणि कतालन अश्या तीन प्रकाराच्या जमाती इथं वसल्या आहेत. बत्तीस ते तेहतीस हजार लोकसंख्या असलेले टुमदार शहर पाहिल्या भेटीतच मोहवून टाकतं. उकाडा असलेले हे छोटेखानी गाव वजा शहर आपल्या सागरी किनाऱ्यामुळे जगभरच्या लोकांना एखाद्या लोहचुंबकासारखे आपल्याकडे आकर्षित करण्यात यशस्वी झाले आहे. मुख्य म्हणजे तिकडं आढळणारे किनारे हे भारतासारखे गलिच्छ व बरबटलेले नसतात.

पांढरी शुभ्र मोत्यांप्रमाणे असणारी वाळू, दर पंधरा मिनिटांनी किनारे साफ करणारे सफाई कामगार, शिस्तीत चालणारे लोक, समुद्र किनाऱ्याच्या जवळच असणारे शॉवेर्स; सगळं कसं शिस्तीत! मला हे पाहून इतका विषाद वाटला, अस वाटलं की माझ्या देशात याहून सुंदर संपन्न असे किनारे आहेत पण आपण काय करतो तर तिथं निर्माल्य, झालच तर मद्याच्या बाटल्या, विष्टा काय करत नाही आपण? शी दुर्भाग्य आपले की आपल्याला मूलभूत पर्यावरण शिक्षण शालेय किंवा महाविद्यालयात दिले जात नाही. आम्हास जे हॉटेल दिल होते ते इतके मस्स्त होते, एकतर खोलीत समुद्राची गाज ऐकू येत होती आणि दूसरे म्हणजे बाल्कनीत गेले आणि खाली डोकावून पाहिले की इतके सुंदर विहंगम द्रुश्य दिसे की सुख म्हणजे नक्की काय असत? मला सांगा असे जोराने ओरडावेसे वाटलं मला! तर पोहोचल्या वर लागलीच वेन्यू वर साउंड चेक ला जायच असल्याने, शरिराची मरगळ घालवण्यासाठी मी सचैल सन्न केले आणि तयारीला लागले.

क्रमशः

डॉ. मनिषा कुलकर्णी

Updated : 18 May 2017 6:44 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top