Home News Update मुंबईला स्वच्छ ठेवणाऱ्या कामगारांचा जगण्यासाठी संघर्ष

मुंबईला स्वच्छ ठेवणाऱ्या कामगारांचा जगण्यासाठी संघर्ष

Support MaxMaharashtra

मुंबईची घाण साफ करणाऱ्या सफाई कर्मचाऱ्यांना घाणीमध्ये राहावं लागतंय. कोट्यवधी मुंबईकरांचं आरोग्य चांगलं राहावं म्हणून राबणाऱ्या या सफाई कर्मचाऱ्यांच्या वसाहतींची दुरवस्था झालीये. चेंबूर (Chembur)  परिसरातील पी. बी. लोखंडे मार्ग इथली सफाई कर्मचारी वसाहती समस्यांच्या विळख्यात सापडलीये. या वसाहतीमध्ये १९० सफाई कामगार राहतात. ही संपूर्ण इमारत घाणीच्या साम्राज्यात उभी आहे.

इमारतीत प्रवेश करतांना तुम्हाला सांडपाणी आणि चिखलाचा सामना करावा लागतो. पावसाळ्यात तर गुडघाभर पाण्यातून मार्ग काढत विद्यार्थांना शाळेत जावं लागतं. इमारतीखाली घाण साचल्यामुळे मुलांना खेळायला जागा उरलेली नाही. या इमारतीला सुरक्षा कंपाऊन्ड नाही. त्यामुळे दारुडे, नशेखोर, गुंड प्रवृत्तीच्या लोकांचा इथं मुक्त वावर असतो. इथं राहणाऱ्या महिला आणि मुलांमध्ये असुरक्षिततेची भावना पसरली आहे. वारंवार तक्रार करूनदेखील या समस्यांची कुणी दखल घेत नाही.

या इमारतीत प्रत्येक सफाई कामगाराला १६० चौरस फुटांचं घर मिळालंय. यामध्ये छोटसं किचन, बाथरूम आणि हॉल आहे. लोखंडी पाईपमधून पाणी गळत असतं. ते पाणी इमारतीच्या भिंतींमध्ये झिरपत असल्यानं इमारतीला धोका निर्माण झाला आहे. या भागाला अपुरा पाणीपुरवठा होत असल्यामुळे सर्वांना घरात पाणी साठवून ठेवावं लागत. घरात पाहुणे आल्यास झोपण्याची जागा नसते. त्यामुळे आम्ही पाहुण्यांना घरी बोलवत नाही असं इथले रहिवासी सांगतात.

इमारतीला लागली वाळवी

इमारतीला चारही बाजूंनी वाळवी लागलीये. अस्वच्छता, कचऱ्याचं साम्राज्य, गळकी पाईपलाईन, साचलेलं सांडपाणी, यामुळे या परिसरात सर्वत्र दुर्गंधी येते. इमारतीत राहणाऱ्या कुटुंबीयाचं आरोग्य धोक्यात आलंय. इमारतीमधील मीटर हाऊस मोडकळीस आलंय. इथं वायर अस्ताव्यस्त पडल्या आहेत. मीटर हाऊसचा दरवाजा मोडला आहे. त्यामुले इथं मोठी दुर्घटना घडू शकते. असं रहिवाशांनी वाटतं. मुंबईचा कचरा साफ करुन कोट्यवधी लोकांची सेवा करणाऱ्या या कामगारांना एक चांगलं आणि साधसुधं आयुष्य जगण्यासाठी एवढा संघर्ष करावा लागतोय, यावरुनच अजूनही सरकारी कारभार आणि समाजाचा दृष्टीकोन बदलेला नाही हेच दिसतंय.

 

चांगल्या पत्रकारितेसाठी तुमचं योगदान आवश्यक आहे.

सहभाग निधी साठी इथे क्लिक करा


Warning: A non-numeric value encountered in /home/maxmaharashtra/public_html/wp-content/themes/Newsmag2/includes/wp_booster/td_block.php on line 997