Home > रिसर्च > 'एॅश' है भाई !

'एॅश' है भाई !

एॅश है भाई !
X

कोळश्यावर आधारीत विद्यूत प्रकल्पातून निघणारी राख म्हणजेच फ्लय ऍश. प्रदुषणाचा शाप घेऊन आलेली ही राख वरदान सुद्धा ठरू शकते.

चंद्रपूर म्हंटलं की लगेच आठवतात ते काळ्या सोन्याच्या खाणी म्हणजेच कोळश्याच्या खाणी! चंद्रपूर आणि आसपासच्या परिसरात उच्च दर्जाचा कोळसा मुबलक प्रमाणात उपलब्ध आहे. त्यामुळे ‘ब्लॅक गोल्ड सिटी’ म्हणजेच काळ्या सोन्याचं शहर अशी सुद्धा शहराची ओळख आहे.

कोळश्याच्या या मुबलकतेमुळे चंद्रपूर शहरात आशिया खंडातला दुसर्‍या क्रमांकाचा आणि महाराष्ट्रातला सर्वात मोठा औष्णिक वीज प्रकल्प आहे. या प्रकल्पामध्ये दगडी कोसळा जाळून औष्णिक उर्जेतून वीज निर्मिती केली जाते. काळ्या सोन्याच्या या प्रक्रियेतूनच काळीराख निर्माण होते आणि बाहेर फेकली जाते. तिची योग्य विल्हेवाट न लावल्यानं ती वातावरणात पसरते आणि प्रदुषण वाढतं. याच राखेला ‘फ्लाय ॲश’ म्हणजे हवेत उडणारी राख असं म्हटलं जातं.

फ्लाय ॲशमुळेच शहर सर्वाधिक प्रदुषित

फ्लाय ॲशमध्ये असलेल्या सिलिका आणि ॲलुमिना या घटकांमुळे शहराच्या प्रदुषणात मोठी वाढ झाली. परिणामी चंद्रपूर शहर राज्याचं क्रमांक एकचं तर देशातलं चौथ्या क्रमांकाचं प्रदुषित शहर बनलं. शहरवासियांच आरोग्य धोक्यात आलं. श्वसनाचे आणि डोळ्यांचे आजार वाढले. हे प्रदूषण कमी करण्यासाठी काही उपाय योजना राबवता येतील यावर विचार मंथन सुरू झालं.

बेस्ट आउट ऑफ वेस्ट

प्रवीण जानी हे चंद्रपुरातील एक नामांकित उद्योजक. या समस्येवर तोडगा काढण्यासाठी धडपड सुरू केली. या फ्लायॲशचं नेमकं काय करता येईल यासाठी त्यांनी चीन आणि जपानचा दौरा केला. तिथल्या औष्णिक प्रकल्पांना भेटी दिल्या. ते त्यांच्या प्रकल्पातून उत्सर्जित होणाऱ्या कचऱ्याची कशी विल्हेवाट लावतात याचा सखोल अभ्यास केला.

औष्णीक वीज प्रकल्पामध्ये निर्माण होणारी फ्लाय ऍश शहराच्या बाहेर साठवली जाते. तिचे मोठे मोठे डोंगरच चंद्रपूर शहराच्या आजूबाजूला उभे राहीलेत. वन्यजीवांना सुद्धा त्याचा त्रास सहन करावा लागत आहे.

अभ्यासाअंती या फ्लाय ऍशचा वापर योग्य पद्धतीनं केला तर ही समस्या दूर होऊ शकते हे प्रविण जानी यांनी दाखून दिलं आणि तिथूनच सुरूवात झाली देशातल्या पहिल्या फ्लाय ऍश क्लस्टरची...

प्रविण जानी यांनी फ्लाय ऍश पासून पर्यावरणपूरक वस्तूंची निर्मिती होऊ शकते हे दखवून दिलं. तसंच त्यातून कशी रोजगार निर्मिती होऊ शकते हे सुद्धा स्पष्ट केलं.

२००३ पासून त्यांनी याबाबत जनजागृती सुरू केली. केंद्र सरकार बरोबर पत्रव्यवहार सुरू केला. सलग सात वर्ष पाठपुरावा केल्यानंतर त्यांच्या प्रयत्नंना यश आलं. केंद्र सरकारनं लघु आणि मध्यम उद्योग मंत्रालयामार्फत २०१० मध्ये फ्लाय ऍश संदर्भातील धोरण जाहीर केलं.

फ्लाय ऍशचा नेमका उपयोग तरी काय?

फ्लाय ॲशचा नेमका उपयोग तरी काय? असा प्रश्न तुम्हाला पडला असेलच ना? तर याचं उत्तर थक्क करून सोडणारं आहे. या फ्लाय ऍशपासून तब्बल ७० प्रकारच्या वेगवेगळ्या वस्तू बनवल्या जातात.

१) बांधकाम क्षेत्रातील विटा, सिमेंट आणि पेवरब्लॉक्स, (कमी उत्पादन खर्च आणि जास्त मजबुती, टिकाऊपणा आणि पारंपरिक लाल विटांना स्वस्त आणि वजनाला हलका पर्याय)

२) पर्यावरणानुकूल फ्लोरिंग साठी फरशा, उष्णताअवरोधक वाल पॅनल्स, सिलिंगशीट्स,ध्वनी रोधक शीट्स मध्ये वापर.

३) प्लास्टिकपेंट्स, नैसर्गिक रांगोळी , होळी रंग यासाठी उपयुक्त

४) इंडस्ट्रीयल ग्रीस निर्मिती , कॅरोगेटेड पेपर निर्मिती साठी देखील उपयुक्त

४) अतिशय कमी दरात औषधी उत्पादन , प्रसाधनं निर्मिती , सजावटीच्या वस्तू, भांडे घासण्याचे पावडर इत्यादी.

५) सर्वात महत्वाचे संशोधन म्हणजे फ्लाय ॲश हे शेतीचे खत आणि कीटक नाशक म्हणून स्वस्त आणि नैसर्गिक असा पर्याय आहे. फ्लाय ॲश पिकांवर कीड नियंत्रण करण्यास अतिशय परिणामकारक आहे आणि त्याहूनही महत्वाचे म्हणजे यामुळे अगदी कमी पाण्यात शेती पिक घेतल्या जाऊ शकते. त्यामुळे दुष्काळी भागात कमी पाण्यात कमी खर्चात शेती केली जाऊ शकते. हा एक क्रांतिकारी असा शोध मानायला हरकत नाही.

संशोधन, जनजागृती, पाठपुरावा ते उद्योजकता

अशी बहुपयोगी फ्लाय ऍश उत्सर्जित कचरा म्हणून फेकण्यात येत होती. पण प्रविण जानी यांनी पर्यावरण अनुकूल विनियोग, पर्यावरण संवर्धन आणि महत्त्वाचं म्हणजे रोजगार निर्मिती हा तिहेरी मेळ साधत देशातला पहिला फ्लाय ऍश क्लस्टर उभारला. चंद्रपूर जवळ साधारण १०० एकर परिसरात हा ‘फ्लाय ॲश क्लस्टर‘ उभा राहीला आहे. केंद्रीय लघु आणि मध्यम उद्योग मंत्रालय आणि राज्य सरकारच्या मदतीतून हे साध्य झालं.

अशा प्रकारच्या क्लस्टरच्या उभारणीसाठी सरकारकडून ७०% ते ९० % अनुदान मिळतं. १०% रक्कम खाजगी गुंतवणूकदारानं उभारणं अपेक्षित असते.

प्रविण जानी यांनी क्लस्टरमध्ये ४५ गुंतवणूकदारांचं पाठबळ मिळवलं. पण सरकारचा लालफितीचा कारभार आणि उदासिनतेमुळे अनुदानाअभावी १५ कोटींची ही योजना कागदोपत्री बारगळत राहिली. सरतेशेवटी २०१२ मध्ये सर्व मंजुऱ्या आणि सोपस्कार पार पडले आणि मुहूर्तमेढ रोवली गेली.

फ्लाय ॲश क्लस्टर समूहाचे अध्यक्ष प्रवीण जानी यांनी इच्छाशक्तीच्या जोरावर फ्लाय ऍशपासूनच कॉमन फॉसिलीटी सेंटरची इकोफ्रेंडली इमारत अवघ्या तीन महिन्यात उभी केली.

या इमारतीचा इंच आणि इंच पर्यावरण अनुकूल अशा या राखेपासून तयार करण्यात आला आहे. फ्लाय ॲशपासून निर्मित या भितींच्या आतल्या बाजूला थोर्माकोलच्या शीट्स लावण्यात आल्या आहेत. त्यामुळे इमारतीच्या आतील तापमान कमी राहण्यास मदत होतेय. याठिकाणी फ्लाय ॲश क्लस्टर उद्योगांना लागणारी अत्याधुनिक यंत्रणा त्याच्या प्रात्यक्षिकांसह संशोधनाकसाठी उपलब्ध करून देण्यात आली आहे.

अश्या प्रकारचा संपूर्ण जगात हा पहिला आणि एकमेव अभिनव प्रकल्प आहे. यामध्ये भविष्यात किमान २००० लोकांना रोजगार देण्याचं उदिष्ठ आहे.प्रवीण जानी

फ्लाय ऍश क्लस्टरपुढील आव्हानं

  • राखेवर आधारित वेगवेगळ्या ३५ सलग्न उद्योगांना प्रोत्साहन देणे
  • या उद्योगांना पायाभूत सुविधा उपलब्ध करून देणे
  • जास्तीत जास्त गुंतवणूकदारांना आकर्षित करणे
  • राखेवर आणखी संशोधन करणे
  • रस्ते आणि पुल निर्मितीत राखेच्या वापरावर संशोधन करणे
  • जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचणे
  • शेतीमधील उपयोगितीची जनजगृती करणे
  • स्वस्तातल्या घरांची निर्मिती करणे

या फ्लाय ऍश आणि बांबूचा वापर करून चंद्रपुरा जवळच्या टोलेवाही गावात १५० च्या आसपास घरं बनवण्यात आली आहेत. याघरांची निर्मिती स्वस्तात कशी केली जाईल यावर सध्या प्रवीण जानी संशोधन करत आहेत. सध्या अशा प्रकारचं एक घर बनवण्यासाठी ४० हजारांच्या आसपास खर्च येतो.

चंद्रपूर आणि परिसरात सध्या या फ्लाय ऍशपासून ब्रिक्स, पेव्हर ब्लॉक्स, पेंट, ग्रीस आणि इतर वस्तूंची निर्मिती केली जातेय. फ्लाय ऍशपासून बनवण्यात आलेला पेंट पूर्णपणे एक्सपोर्ट केला जातो. तसंच फ्लाय ऍश पासून लाईट वेट ऍग्रीगेटची निर्मिती सुद्धा केली जातेय. त्याचा उपयोद फाउंड्री सारख्या उद्योगात सुद्धा केला जाऊ शकतो.

आता आणखी पुढे जाऊन फ्लाय ऍशचता वापर करून किचन गार्डन उभं करण्याचा प्रयत्न प्रवीण जानी करत आहेत. त्याची सुरूवात त्यांनी त्यांच्या घरापासून केलीय.त्यात त्यांनी वांग्याची शेती केली आहे.

क्लस्टरमधले एक-एक उद्योग आता उभे राहत आहेत. संपूर्ण क्षमतेनं जेव्हा हे क्लस्टर सुरू होईल तेव्हा मात्र आमचा दबदबा असेल असं प्रवीण जानी आवर्जून सांगतात.

Updated : 25 Jan 2017 9:20 AM GMT
Next Story
Share it
Top