Home > रिसर्च > मराठवाड्याचा सिटीस्कॅन

मराठवाड्याचा सिटीस्कॅन

मराठवाड्याचा सिटीस्कॅन
X

मराठवाड्याच्या मागासलेपणाची खरी कारणं ही इतिहासात आहेत. मराठवाडा आणि तिथल्या लोकांची मानसिकता समजून घेण्यासाठी हा इतिहास सर्वात आधी समजून घेणं फार महत्त्वाचं आहे. तोच इतिहास आजच्या परिस्थितीशी सांगड घालून उलगडत आहेत प्रसाद चिक्षे...

मराठवाड्याचा इतिहास व त्याचा विकासावर झालेला दुरगामी परिणाम

मराठवाडा हा महाराष्ट्राचा गोदावरी खोर्‍यात आणि आसपास वसलेला एक प्रदेश असून आठ जिल्ह्यांचा त्यात समावेश होतो. औरंगाबाद शहर हे या विभागाचे मुख्यालय आहे. महाराष्ट्रातली १६.८४ टक्के लोकसंख्या या प्रदेशात राहाते. त्यापैकी तीस टक्के लोक आर्थिक दृष्टीनं दारिद्‌ऱ्यरेषेखाली आहेत. प्रदेशाचा तीस टक्के भाग पर्जन्यछायेत येतो. कोरडवाहू शेतीचे प्रमाण नव्वद टक्क्यांवर आहे. शेती हाच येथील नागरिकांचा उदरनिर्वाहाचा प्रमुख स्रोत आहे.

data-href="https://www.facebook.com/MaxMaharashtra/"

data-width="380"

data-hide-cover="false"

data-show-facepile="false"

data-show-posts="false">

मराठवाड्याचा इतिहास समजून घेतल्या शिवाय तो अविकसित राहण्याच्या सुप्त कारणांची मीमांसा करणे चूकीचे ठरेल. यासाठी सर्वप्रथम मराठवाड्याचा इतिहास समजून घ्यावा लागेल. हा इतिहास दोन चरणात म्हणजे १३व्या शतका पूर्वींचा व १३वं शतक ते १९४८ पर्यंतचा असा आहे. पहिल्या कालखंडातील राज्यकर्ते हे मुलतः भारतातीलच होते तर दुसऱ्या कालखंडातील राज्यकर्ते परदेशातून या भागावर आक्रमण करून राज्य मिळवणारे व विभिन्न संस्कृतीचे होते.

पुराणातील वर्णनानुसार मराठवाड्याच्या काही भाग नंदांच्या साम्राज्यात असावा असे दिसते. नव-नंदडेरा म्हणजे नांदेड असेही मानले जाते. ज्ञानकोशकारांच्या मते पैठण ही त्यांची दक्षिणेकडील राजधानी होती. अशोकाच्या लेखातून पेतनिकांचा म्हणजेच पैठणवासियांचा उल्लेख आढळतो.

मराठवाड्याला महत्व आले ते सातवाहन वंशाच्या काळात. दक्षिणेतील पहिल्या व मोठ्या साम्राज्याची राजधानीच पैठण (प्रतिष्ठान) येथे होती. या काळात मराठवाड्याच्या राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक, साहित्य आणि कलाक्षेत्रात खूप प्रगती झाली. पैठण, तेर, भोकरदन ही गावे या काळातच भरभराटीस आली. अजिंठा येथील पहिल्या गटातील व पितळखोरे येथील लेणी याच काळातील होत.

सातवाहनांनंतर मराठवाड्याच्या काही भागावर वाकाटकांनी राज्य केले त्यांच्या कारकीर्दीत अजिंठ्याच्या काही लेण्यांत चित्रकाम झाले.

वाकाटकांनतर चालुक्य वंशाच्या राजांचा मराठवाड्याशी संबंध आला. त्यानंतर राष्ट्रकूट घराण्याने ७४४ ते ९७३ पर्यंत येथे राज्य केले. त्यांची एक उपराजधानी नांदेड जिल्ह्यांतील कंधार येथे होती. वेरूळ येथील अद्वितीय लेणी यांच्या कारकीर्दीत खोदली गेली.

कल्याणी चालुक्याच्या काळातील शंभरांहून अधिक शिलालेख नांदेड उस्मानाबाद व परभणी जिल्ह्यांतून मिळतात. या राजांनी याच जिल्ह्यांतून कलापूर्ण मंदिरे उभारली. सहाव्या विक्रमादित्याच्या काळात विद्यास्थाने व महाघटिकस्थाने (महाविद्यालये) यांना अनुदान दिले गेले.

मराठवाड्याला यादव घराण्याच्या काळात अत्यंत महत्व आले. यादव वंशातील पाचव्या भिल्लमाने ११७५ मध्ये देवगिरी येथे राजधानी हलविली आणि तेथे देवगिरी किल्ला बांधला. यादवकाळात मराठवाड्याची सर्व क्षेत्रात, विशेषत: संगीत, कला, वाङ्मय इत्यादीमध्ये प्रगती झाली. यादवकालीन अनेक मंदिरे मराठवाड्यात असून ती हेमाडपंती या नावाने प्रसिद्ध आहेत. हेमाद्री तथा हेमाडपंत हा बहुश्रुत विद्वान यादवांच्या दरबारी होता. याने चतुर्थर्गचिंतामणी हा

बृह् द् ग्रंथ लिहिला. रामचंद्र (१२७१ ते १३११) हा यादवांचा शेवटचा राजा मराठवाडा याच्या काळात परमोत्कर्षाला पोहोचला होता.

या इतिहासाच्या चरणाचा अभ्यास करताना आपल्याला नक्कीच काही गोष्टी समजतात.

  1. इसवी सनाच्या तेराव्या शतकापर्यंत मराठवाड्याचा परिसर म्हणजेचे महाराष्ट्रातील गोदा खोरे, संपन्न अशा राजसत्ताचे माहेरघर होते.
  2. इसवी सन पूर्व ५ व्या शतकातील अश्मक आणि मूलक ही दोन्ही महाजनपदे या परिसरातील, त्यानंतर अनुक्रमे सातवाहन, वाकाटक, पूर्वचालुक्य, राष्ट्रकुल, उत्तरचालुक्य, यादव शिलाहार, कलचुरी या राजसत्तांच्या कालखंडात या परिसराने आर्थिक संपन्नता, राजकीय स्थैर्य, प्राचिन व्यापार उदीम उपभोगली.
  3. मोठ मोठी व्यापारी शहरे इथे उदयाला आली.
  4. अप्रतिम कालाविष्कार घडविले.
  5. दऱ्याखोऱ्यातून सह्याद्रीच्या कड्याकपारीतून अप्रतिम कला अविष्कार घडविले होते.
  6. या कला अविष्काराला उदार हस्ते मदत करणारे संपन्न व्यापारी इथे होते.
  7. राजघराण्याच्या कोषागारात अमित संपती होती.
  8. इथल्या संपन्नतेच्या कथा अरब व्यापार्‍यामार्फत सर्वदूर पसरल्या होत्या.

१३व्या शतकात म्हणजे मराठवाड्याच्या इतिहासाच्या दुसऱ्या चरणात हे सारे बदलू लागले. पराकोटीचा सत्तासंघर्ष सुरु झाला. देवगिरीच्या वैभवामुळे मोहित होऊन अलाउद्दीन खल्जीने दक्षिणेवर स्वारी केली. रामचंद्र यादवला पराभव पत करून अपमानास्पद तह करावा लागला. पुढे मलिक काफूरने देवगिरीवर आक्रमण केले. त्यात देवगिरी पडली. यादवांचे साम्राज्य लयास गेले.

खल्जीनंतर दिल्लीच्या गादीवर तुघलक आले.त्यांपैकी मुहम्मद तुघलकाने देवगिरी येथेच दिल्लीची राजधानी हलविली आणि देवगिरीचे नाव दौलताबाद असे बदलले. या संघर्षाबरोबरच प्रशासन व्यवस्थेतही बदल घडले, नवी सुभेदारी व्यवस्था उदयास आली. इ.स. १३४६ साली दिल्लीच्या सलतनतीने दख्खन पठारावर चार सुभे निर्माण केले.

तुघलकानंतर मराठवाड्याचा बराचसा भाग बहमनी राज्यात समाविष्ट झाला. बहमनी सलतनतीचा वजीर महंमद गवान याने बहमनी राज्याची प्रशासकीय पुनर्रचना करण्याचे काम हाती घेतले. या महंमद गवानचे लष्करी ठाणे नांदेड शहराच्या परिसरातच होते. त्याची आठवण म्हणून आजही नांदेडमध्ये वजिराबाद नावाची वस्ती आहे. या वजीर महंमद गवानने केलेल्या प्रशासकीय सुधारणेत बहमनी राज्याचे चार तरफ रद्द करण्यात येऊन आठ नवे सुभे निर्माण करण्यांत आले.

महंमद गवानच्या विरुध्द राजदरबारात मात्र बरेच राजकारण घडले इ.स. १४८१ साली या राजकीय कट कारस्थानचा परिणाम वजीर महंमद गवानच्या मृत्युत झाला. त्याला देहदंड देण्यापर्यंत सलतनतीतले कटकारस्थान पोहोचले. पराकोटीचा सत्तासंघर्ष सगळीकडे चालु होता. १४८२ साली सुलतान महमंदशाह तिसरा बहमनी मृत्यु पावला व त्याचा १२ वर्षाचा मुलगा महमुदशाहा अल्पवयीन राजा म्हणून सत्तेवर आला. सलतनतीतील सारी सत्ता कासीम बरीदने आपल्या हाती घेतली व पालनकर्ता राजा म्हणून तो कारभार पाहु लागला. नांदेड जिल्ह्यातील कंधारचा किल्ला हा कासीम बरीदचे प्रमुख लष्करी ठाणे बनला. इसवी सन १५२६ साली तिकडे दिल जहिरुद्दीन मुहंमद बाबरने मुघल सत्तेची स्थापना केली ही मुघलसत्ताही दख्खनच्या सत्ता संघर्षात येऊन उतरली.

१५३८ मध्ये बहमनी राज्याची पाच शकले झाली आणि मराठवाड्याचा प्रदेशही आदिलशाही, इमादशाही, तुत्बशाही, बरीदशाही आणि निजामशाही यामध्ये विभागला गेला.

अहमदनगरच्या निजामशाहीत समाविष्ट असलेला वऱ्हाड सुभा आणि त्यातला नांदेड जिल्हा इ.स. १५९६ मध्ये मुघलांच्या राज्यात समाविष्ट झाला आणि गेली तीनशे-साडे तीनशे वर्षे चाललेला मुस्लीम सलतनतीचा संघर्ष संपला.

१७ व्या शतकातील नांदेड जिल्ह्याचा इतिहास म्हणजे अहमदनगरची निजामशाही आणि मुघल सत्ता यांच्यातल्या संघर्षाची गाथा होय. दोन अडीच दशके हा संघर्ष चालला. १६३२ साली दौलताबादही मुघलांच्या ताब्यात गेले आणि मागोमाग निजामशाहीतील कंधार आणि दौलाताबाद सारखी प्रमुख लष्करी ठाणी पडल्यामुळे मुघलांचा प्रभाव वाढला.

पुढे १६३३ मध्ये शहाजहान या मोगल राजाने दौलताबाद जिंकले. त्याचा मुलगा औरंगजेब दक्षिणेचा सुभेदार म्हणून काही काळ येथे होता.

छत्रपती शिवरायांनी सामान्य रयतेचा विश्वास जागवला. त्यांना लढण्याचे सामर्थ्य दिले. सत्तेचा उपभोग स्वत:च्या स्वार्थासाठी करण्यांच्या या मध्ययुगीन कालखंडात काळाची चौकट भेदून लोककल्याणाचा विचार करणारे मराठी स्वराज्य छत्रपती शिवाजी महाराजानी निर्माण केले . मुघल-मराठा संघर्षातील लक्षणीय अशी लढाई इथे झाली नसली तरी उभय पक्षाच्या फौजानी परिसरात घोडदौड मारली. १६७० साली व-हाडवरील चढाईच्या वेळी शिवाजी महाराज नांदेडला आले होते. इ.स. १६५८ साली औरंगजेब मुघल सम्राट बनला. इ.स. १६८६ साली मुघलांनी विजापूर जिंकले. विजापुरची आदिलशाही आणि गोवळकोंड्याची कुतूबशाही या दोन सलतनतीच्या पाडवानंतर औरंगजेबाने मराठ्यावर सगळे लक्ष केंद्रीत केले. कंधारचा आपला लष्करी तळही मजबुत केला हमिदुद्दीनखान या किल्लेदाराने याच काळात कंधारच्या किल्यावर आपला तळ ठोकला, मुघल-मराठा संघर्ष अधिक तीव्र झाला. हा संघर्ष चालू असतांना नांदेड परिसरातील सामान्य रयतेचे जीवन अत्यंत हलाखीचे झाले होते. अनेक लोक स्थलांतरित होऊ लागले. याच काळात नांदेड मधील काही घराणी काशी प्रयाग अशा तिर्थक्षेत्री स्थलांतरित झालेली दिसतात. १८ व्या शतकातील संघर्षही मुख्यत: मुघल आणि मराठा यांच्यातला सत्तासंघर्ष होता.

१७२४ च्या आक्टोबर महिन्यात मुघल आणि निजामी सैन्यात साखरखंडी येथे मोठी लढाई झाली. दख्खनचे सहा मुघल सुभे निजामच्या ताब्यात आले. मुघल साम्राज्याचा सुभेदार म्हणून निजामाने दख्खनचे सुभे ताब्यात घेतले असले तरी प्रत्यक्षात साखरखंडी येथील लढाईतील विजयामुळे मुघलाना पराभूत करून चिन कुलीखान निजाम-उल् मुल्कने आपले स्वतंत्र राज्यच अस्तित्वात आणले होते. या स्वतंत्र राज्याचा कारभार औरंगाबादमधून पाहिला जाऊ लागला. यानंतर आसफजाही घराण्याचे म्हणजे हैदराबादच्या निजामाचे १७२४ पासून मराठवाड्यावर आधिपत्य होते. कालांतराने निजामी राज्याची राजधानी, हैद्राबादला स्थलांतरीत झाली.

मराठ्यांनी निजामाविरूद्धच्या अनेक लढायामध्ये पालखेड (१७२८), उदगीर (१७६०), राक्षसभुवन (१७६३), खर्डा (१७९५) इत्यादींत निजामाचा पराभव केला. १७९५ मध्ये मराठवाड्याचा प्रदेश निजामाने सुपूर्द केला होता. सवाई माधवरावाच्या मृत्यूनंतर त्यावर पुन्हा निजामाने ताबा मिळविला.

१७९५ चा निजाम-मराठे यांच्यातील महा-रणसंग्राम (Gazetteers of India) – खर्डा हे आणखी एका ऐतिहासिक घटनेसाठी प्रसिद्ध आहे ते म्हणजे खर्ड्याची लढाई. सतराव्या शतकाच्या अखेरीस दुसरे माधवराव पेशवे आणि हैद्राबादचा निजाम यांच्यात ऐतिहासिक लढाई झाली यात देशाच्या विविध भागातील मराठे एकत्र येवून त्यांनी निजामाचा सपशेल पराभव केला. इथे इंग्रजांनी तटस्थ राहून निजामाची मदत करण्याचे नाकारले. या अतिटतीच्या लढाईत मुधोळचे सरदार मालोजी घोरपडे, इंदूरचे दौलतराव सिंधिया, माधवराव पेशवे-२, नागपूरचे रघुजीराजे भोसले आणि खर्डा येथील जहागीरदार 'सरदार सुलतानराजे निंबाळकर' यांनी महापराक्रम गाजविला आणि निजामाला धूळ चारली. पानिपतच्या महासंग्रामानंतर खर्ड्याची लढाईचे नाव घेता येईल, या मैदानी लढाईत सुमारे ३ लाख मराठे विरुद्ध निजामाचे साधारण ४-५ लाख सैन्य असा मुकाबला होता आणि तो मराठ्यांनी मनगटाच्या जोरावर जिंकला. निजामाकडून जबर खंडणी तसेच बेरर प्रांतातील महसुलाचा वाटा देण्याचे मान्य होताच निजाम आणि मराठे यांच्यात तह झाला.

महाराष्ट्राच्या संदर्भामध्ये सन.१८१८ पासून आधुनिक काळाची सुरुवात मानावी लागते. या एतद्देशीय सत्तेचा अस्त होऊन पेशवाई संपुष्टात आली व ब्रिटीस राज्य स्थिरावले. इ.स. १८५३ साली इंग्रज आणि निजाम यांच्यात एक नवा करार झाला. या करारान्वये हैद्राबादच्या निजामाने आपल्या राज्यातला पन्नास लाख शेतसारा वसुल करता येण्याजोगा भूप्रदेश इंग्रजाच्या ताब्यात द्यायचे कबुल केले.

नबाब सालारजंगने ही गुत्तेदारी पध्दत आणि शेतसारा वसुलीच्या इतर पध्दती बंद करुन एक नवी शेतसारा पध्दत, जिल्हाबंदीपध्दती अंमलात आणली. रोव्हेन्यू सर्वे अँन्ड सेटलमेंट डिपार्टमेंट स्थापन करण्यांत आले. शेतसारा वसुलीसाठी शासकीय महसुल यंत्रणा निर्माण करण्यांत आली. १८८५ साली सुभेदार पद पुन्हा निर्माण झाले आणि ते १९४९ पर्यंत कायम होते. जिल्हा प्रशासनाचा प्रमुख म्हणुन तालुकापद निर्माण झाले ते १९४९ पर्यंत कायम होते. तालुका पातळीवर तहसिलदार पद होते. जिल्हा प्रशासनात नायब तालुकदार, पेशकार, शिरस्तेदार अशी काही पदेही होती. हैद्राबाद शहरात १८५५ साली स्टेट बँक काढण्यांत आली. अधुनिक बँकींग व्यावस्था सुरु झाली. कालातंराने निजामी राज्यातल्या काही गावात स्टेट बँकेच्या शाखा निघाल्या.

KONICA MINOLTA DIGITAL CAMERA

हैद्राबाद राज्याची राजभाषा फार्शी होती, फार्शी शिक्षण देणारे मदरसे काही ठिकाणी होते. १८६८ साळी नांदेडलाही एक फार्शी मदरसा निघाला. इ.स.१८८४ मध्ये फार्शी ऐवजी उर्दुला राजभाषेचा मान मिळाला. शिक्षणाचे माध्यम उर्दु झाले. इग्रजांच्या प्रभावातून दळणवळणाची साधने वाढली. हैद्राबाद ते वाडी पर्यंत रेल्वे सुरु झाली. इ.स. १९०० साली नांदेड या गावात रल्वे आली. हैद्राबाद-मनमाड असा मिटर गेज रेल्वे मार्ग पूर्ण झाला. आणि या रेल्वेमार्गावरील एक रेल्वे स्टेशन नांदेड गावाजवळ उभारले गेले. १९४२ च्या चलेजाव आंदोलनाचेही असेच पडसाद राज्यात उमटले. स्वामी रामानंद तिर्थांनी या आंदोलनाच्या दृष्टीने संघटन कार्य सुरु केले. हैद्राबाद राजकारणाची पावले आझाद हैद्राबादच्या दिसेने पडू लागली होती. हैद्राबादच्या निजामाची भूमीकाही या वाटचालीला पुरक होती.

इग्रजांच्या आश्रयाने निजामाने मराठवाड्यावर हैदराबाद संस्थान भारतात विलीन होईपर्यंत राज्य केले. स्वातंत्र्यपूर्व काळात हैदराबाद स्टेट काँग्रेसच्या नेतृत्वाखाली निजामविरोधी चळवळींना जोर चढला होता. रझाकारासारख्या धर्मवेड्या मंडळींनी मराठवाड्यातील प्रजेचा अनन्वित छळ केला.

भारत सरकारने १३ ते १७ सप्टेंबर १९४८ मध्ये पोलीसकारवाई करून निजामाला शरण आणले आणि हैदराबाद संस्थान भारतीय संघराज्यात विलीन केले.

या सर्वाचा आढावा घेताना काही निष्कर्ष नक्की काढता येतात.

  1. सततची होणारी आक्रमणे व युद्ध यामुळे मराठवाडा या काळत प्रचंड त्रासला होता.
  2. या युद्धात लोकजीवन उद्धवस्त होत होते.
  3. ही सर्व आक्रमणे सुरवातीला आर्थिक लुटीसाठी होती नंतर सत्ता मिळवण्यासाठी होती.
  4. सत्ता व आर्थिक आक्रमणाच्या सोबतच हे सांस्कृतिक आक्रमणे होती.
  5. इथल्या स्थानिक महत्वाच्या शहरांची किंवा राजधानीची नावे बदलण्यात आली.
  6. सांस्कृतिक व धार्मिक श्रध्दांना तडे देण्यासाठी इथली मोठी मोठी मंदिरे तोडण्यात आली किंवा त्यांचे रूपांतर मशिदीत करण्यात आली.
  7. स्थानिक मराठी भाषा ही राज्यभाषा नसल्याने स्थानिक,भाषा,साहित्य,कला यांच्या विकासाला खीळ बसली.
  8. छत्रपती शिवाजी महाराजांच्या हिंदवी स्वराज्याचा अनुभव मराठवाड्याला घेता आला नाही. मराठ्यांनी अनेकदा आक्रमणे करून मुलुख जिंकला. पण तह करून परत येथील सत्ताधाऱ्यांना तो परत केला. त्याबदल्यात जबर खंडणी व महसुलाचा वाटा फक्त मराठा राज्यकर्त्यांनी घेतला.अर्थातच शिवराज्य (स्वराज्य व सुराज्य) कधी मराठवाड्यात स्थापन झाले नाही.
  9. येथील राज्यकर्त्यांनी प्रशासन व महसुली व्यवस्था आपल्या लाभासाठीची बनवली व सुभेदारी पद्धती आणली. हळूहळू श्रींमत राज्यकर्ते आणि गरीब प्रजा अशी या भागाची ओळख होऊ लागली.
  10. निजाम हा एक जगातील सर्वात श्रीमंत राजा म्हणून ओळखला जाऊ लागला.
  11. मराठवाडा संतभूमी म्हणून प्रसिद्ध आहे. अनेक संतांचा जन्म या भूमीतील. ज्ञानेश्वर, त्यांची भावंडे, नामदेव, विसोबा खेचर, गोरा कुंभार,जनाबाई, जगमित्र नागा, सेना न्हावी (बीदर), जनार्दन स्वामी, भनुदास, एकनाथ, समर्थ रामदास ही सर्व संतांची मांदियाळी मराठवाड्याच्या भूमीत जन्मलेली. अर्वाचीन काळात ही परंपरा नाथसंप्रदायी गुंडामहाराज, समर्थ संप्रदायी श्रीधरस्वामी येथपर्यंत आणता येते. याशिवाय गीतार्णवकार दासोपंत, आदिकवी मुकूंदराज, शिवकल्याण, भास्करभट्ट बोरीकर, कृष्णादास, जनीजनार्दन, गोपाळनाथ, मध्वमुनी, अमृतराय, उद्धवचिद् घन, वामनपंडित ही सर्व कवी मंडळी मराठवाड्याची. परंतु इथे असणाऱ्या अशांती व सांकृतिक आक्रमणामुळे यातील बऱ्याचशा संतांचे कार्यक्षेत्र हे मराठवाडा न राहता शिवराज्य झाले. त्यामुळे परिवर्तनाची चळवळ इथे मूळ धरू शकली नाही.
  12. सततचे बदलणारे सत्ता केंद्र, राज्यकर्ते व राजधान्या यामुळे या भागाचे प्रशासन निकृष्ट दर्ज्याचे होते. त्याचे पर्यावसन याभागातून स्थलांतरित होणाऱ्या लोकांची संख्या वाढली.
  13. निजामाच्या अडीचशे वर्षांच्या कालावधीतील स्वार्थीपणा इतक्या पराकोटीचा होता की येथील स्थानिक धर्मांतरित मुस्लिमांची आर्थिक स्थिती पण पार खालावली होती.
  14. समता व स्वातंत्र या आधुनिक मुल्यांपासून इतर महाराष्ट्राच्या तुलनेत मराठवाडा खूपच मागे राहिला. समाज परिवर्तनाची चळवळ इथे सुरु होऊ शकली नाही. आर्यसमाजाने बरेच प्रयत्न केले पण त्यांना प्रचंड अत्याचाराला सामोरे जावे लागले.
  15. आधुनिकतेची ओळख निजामशाहीत फार झालीच नाही. बाजारपेठा विकसित झाल्या नाहीत. जगाची बाजारपेठ म्हणून उदयास येणाऱ्या मुंबई सारख्या व सांस्कृतिक राजधानी म्हणून विकसित झालेल्या पुण्यासारख्या शहरांशी संपर्क यंत्रणा निजामाने विकसित होऊ दिली नाही त्यामुळे सांस्कृतिक,शैक्षणिक,राजकीय,औद्यागिक व इतर सर्वच क्षेत्रात उर्वरित महाराष्ट्रा पेक्षा मराठवाडा मागे राहिला.
  16. हे मागासलेपणा येथील जनतेमध्ये कायम गुलामगिरी,पराभूत मनोवृत्ती, दुबळेपणा, परिस्थिती व सत्ते समोर शरण जाण्याची प्रवृत्ती निर्माण झाली.
  17. उपक्रमशीलता व उद्यमशीलता लयास गेली त्यामुळे पराकोटीचे दारिद्र्य सामन्य जनतेच्या नशीबी आले.

एकूणच मराठवाड्याच्या मागासलेपनासाठी हे दुसरे ऐतिहासिक चरण खूप कारणीभूत ठरेल यात शंकाच नाही.

प्रसाद चिक्षे

Updated : 6 Sep 2022 10:45 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top