Home मॅक्स ब्लॉग्ज दिड कोटी लिटरच्या शेततळ्याची कहाणी…

दिड कोटी लिटरच्या शेततळ्याची कहाणी…

Ravi Bapatle
Support MaxMaharashtra

यावर्षी परतीचा पाऊस होण्यापूर्वी महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यात पावसाची गंभीर परिस्थिती होती. लातूर जिल्ह्यातील औसा, लातूर तालुक्यांचाही यात समावेश होता. सेवालय, हँपी इंडियन व्हिलेज परिसरात तर खूपच कमी पाऊस होता. सेवालयातील शेत तळं कोरडं पडलेलं. विहीरीने तळ गाठलेला. केवळ एका बोअरवेल वर कसं बसं चाललं होतं. सगळी चिंता होती ती पाण्याची. मला आठवतयं, त्या रात्री बराच वेळ या विषयावर आम्ही बोलत होतो. मुलं आणि इतर सगळी मिळून ९०च्या आसपास माणसं, छोटी – मोठी हजार दिड हजार झाडं यांच्या जगण्याचा विषय होता. एवढ्या माणसांसाठी टँकरनं पाणी आणणं खूप अवघड होतं. शिवाय परिसरात सगळीकडंच पाणी टंचाई. चर्चा करीतच आम्ही झोपी गेलो.

सकाळी उठल्याबरोबर रवीनी पहिला प्रश्न केला, व्हिलेजवर एक मोठं शेततळं केलं तर?…
हो…हाच उत्तम पर्याय राहिल, मी दुजोरा दिला. जागा होती. अंबाजोगाईच्या मानवलोक संस्थेचे कार्यवाह अनिकेत लोहिया यांनी कामासाठी जेसीबी मशीन उपलब्ध असल्याचं सांगितलं होतं. मी अनिकेतला बोललो. त्यांनी चार दिवसात व्हिलेजवर मशीन पाठवली. रवीनी स्थानिक आँपरेटर बघितला. लगेच काम सुरू झालं.

सेवालय असो की व्हिलेज, आराखडा बनवणारा रवीच असतो. कुठल्याही अभियंत्यापेक्षा त्याची कल्पकता कमी नाही. काय आणि कसं करायचंय, याचं स्पष्ट चित्र त्याच्या समोर असतं. सगळं काम समोर उभं राहून करून घेणार. न थकता दररोज १२-१४तास काम.

जेसीबी सोबत मुरूम, माती उचलायला चार पाच ट्रँक्टर. दर आठवड्यात माझी चक्कर ठरलेली. बघता-बघता तळं साकार होऊ लागलं. तळ्यातील मुरूम आणि मातीचा वापर करून रवीनं एकर-दिड जमीन तयार करून घेतली. व्हिलेजवरील सगळे खड्डे बुजवले. रस्ते मोठे केले. झाडांसाठी खड्डे केले. एका कामात चार काम केली. रवीची ही सगळी धावपळ मी बघत होतो. यात रवीचं हाताचं दुखणं निघालं… स्पाँडिलाईटस्…
असचं काहीतरी नाव. या दुखण्यावरच्या औषधांनी दुसरी दोन दुखणी काढली. दवाखान्यातून सुटका करून घेताना, शुगर निघाली, ती ही अचानक. हाताच्या दुखण्यासाठी खाजगी वैद्याचे उपचार सुरू झाले… या सगळ्या गंभीर परिस्थितीतही शेततळ्याचे काम सुरूच राहिले. शेवटच्या टप्प्यात भाड्याची पोकलँड मशीन आणून काम पूर्ण केले.

Ravi Bapatle

जवळपास दोन महिने हे काम चालू होते. सेवालय आणि व्हिलेजवरील मुलांनीही वेळोवेळी श्रमदान करून त्यांचं योगदान दिलयं. आज २००×१५० आकार व सरासरी २७ फुट खोली असलेलं सुमारे दिड कोटी लिटरचं हे शेततळं तयार झालयं.

हे काम चालू असताना आर्थिक अडचणी होत्याच. मात्र, सेवालयाचे संस्थापक रवी बापटले यांची बाजारात चांगली पत आहे. अगदी डिझेलसुध्दा उधारीवर मिळालं. देणी असली तरी पैशाअभावी काम थांबलं नाही. शेततळ्यात प्लास्टिक टाकण्यासाठी कंपनीचा माणूस पुण्याहून नुकताच येऊन गेला. साडे-पाच लाखाचं खर्चाचं अंदाजपत्रक त्यानं दिलयं. प्लास्टिक अंथरल्यानंतरचं यात पाणी भरण्याचे काम सुरू होईल.

Happy indian village (HIV)चा जगातला अशा प्रकारचा हा पहिलाच प्रयोग इथे हळू हळू स्थिरावतोय. एक अशक्य वाटणारं जीवन प्रत्यक्षात जगलं जातयं.
जन्मजात एचआयव्ही संक्रमित मुलांचं संगोपन करायचं, शिक्षण द्यायचं, त्यांना स्वत:च्या पायावर उभं करायचं, त्याचं एक गाव वसवायचं… तर या कामासाठी पैसे लागणारचं. या कामासाठी सरकारची मदत घ्यायची नाही, असा निर्णय केल्यानंतर समाजाकडं मदत मागणं आलचं. समाजानेही रवी बापटले यांच्या कामाला मनापासून मदत केलीय.

सेवालयाचं, म्हणजेच इंडियन व्हिलेजचं सगळं काम समोर उभं आहे. एखाद्या स्वच्छ आरशात प्रतिबिंब दिसावं तसं ते कोणीही पाहू शकतं. लोकांनी दिलेल्या पै न पै चा इथं विनियोग होतो. त्याचा हिशोब संस्थेकडं आहे. संस्थाप्रमुख सकाळपासून झोपेपर्यंत शारीरिक श्रमासह सगळी कामं करतोय असं चित्र क्वचितच कुठे पाहायला मिळेल. रवी हे आवर्जून सांगांव असं उदाहरण आहे.

रवी खऱ्या अर्थानं महात्मा गांधींचा शिष्य शोभतो. त्याचं राहणं, खाणं आणि जगणं इतकं साधं आहे की, अनेकदा मी ही अवाक् होऊन जातो. एचआयव्ही संक्रमित मुलांपलिकडं रवीनं त्याचं काही विश्वच ठेवलेलं नाही.
त्यामुळंच मला स्वत:ला रवी बापटले यांच्या कामात योगदान देणं मनापासून आवडतं. २००९ पासून आजतागायत सेवालयातील एका मुलाचा पालक बनून मी रवीसोबत आहे तो केवळ या वेगळेपणामुळेच.

केवळ लोकांच्या मदतीवर फार काळ अवलंबून राहू नये, असाचं रवीचा विचार आहे. ही संस्था, मुलं स्वावलंबी व्हावीत यादृष्टीने छोटे छोटे प्रयोग सुरू आहेत. शेतीतून,
हस्तकौशल्यातून, सेवालय म्युझिक शो च्या माध्यमातून स्वावलंबनाचे प्रयत्न सुरू आहेत. इतरही काही गोष्टींचे नियोजन सुरू आहे.

हे दिड कोटी लिटरचं शेततळं हा ही संस्था स्वावलंबी बनवण्याच्या प्रयत्नातील एक महत्त्वाचा उपक्रम आहे. भविष्यात या पाण्यावर खूप काही गोष्टी करता येण्याजोग्या आहेत. आज व्हिलेजसाठी पाणी ही प्राथमिकता आहे. याला मदत करणारा दाता, दाते भेटतीलच..

सेवालयाच्या या लोकसहभागात तुम्हीही सहभागी व्हा. तुम्हाला अगदी सहजपणे जो काही आर्थिक सहभाग देता येईल तो द्या. तुम्हालाही उद्या अभिमानानं सांगता आलं पाहिजे. होय…रवी बापटले यांच्या सेवाभावी उपक्रमाचा मी ही एक भाग आहे. पैसे पाठविण्यासाठी बँकेचा तपशील दिलाय. पैसे टाकले तर नाव, पत्ता कळवा म्हणजे त्याची पावती बनवता येईल…
धन्यवाद मित्रांनो.

महारुद्र मंगनाळे

AAMHI SEVAK SANSTHA,LATUR.
BANK OF MAHARASHTRA
(MAIN BRANCH,Latur. )
A/C NO. : 60026253218
IFSC : MAHB0000038
MICR : 413014001
Website: www.sevalay.org
E-Mail: [email protected]

चांगल्या पत्रकारितेसाठी तुमचं योगदान आवश्यक आहे.

सहभाग निधी साठी इथे क्लिक करा


Warning: A non-numeric value encountered in /home/maxmaharashtra/public_html/wp-content/themes/Newsmag2/includes/wp_booster/td_block.php on line 997