Home > Election 2020 > यंदा कोण...?

यंदा कोण...?

यंदा कोण...?
X

विधानसभेसाठी उद्या मतदान होणार आहे. मैदानात कुणीही पैलवान नाही, असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आधीच जाहीर केलेलं आहे. शिवसेना-भाजपामध्ये बंडखोरी आहे. काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस बुडताना जसं लोकं एकमेकांना घट्ट मिठी मारून राहतात तसं घट्ट मिठी मारून काम करतायत. मनसेचं इंजिन फक्त शिट्टी वाजवत राहिलं, धावलंच नाही. वंचितचा लोकसभेइतका प्रभाव या वेळी राहणार नसला तरी या निवडणुकीतल्या अनेकांच्या पराभवाचा वंचित हा फॅक्टर असणार आहे. इतर पक्ष म्हणजे ज्यांची नावं लोकांना फक्त इतर पक्ष म्हणूनच माहित असतात ते सगळे जत्रेत सामील होते. हे झालं माझं क्विक विश्लेषण.

राज्यभरात प्रचाराचा नेमका मुद्दा काय होता असं विचारलं तर ठामपणे कुणालाच काही सांगता येणार नाही. शरद पवारांचं कसलेल्या पैलवानासारखं रिंगणात असणं, त्याचं कौडकौतुक करणं, मुख्यमंत्र्यांच्या चाणक्यनितीचं कौतुक करणं, एकनाथ खडसे काही न्यूज देतात का हे पाहणं, चंद्रकांत पाटील यांची कशी पिछेहाट होतेय हे दाखवणं, बीड मध्ये भावा-बहिणीचं टोकाला गेलेलं राजकीय भांडण अशा काही बातम्यांवर ही निवडणूक तरून गेली. 370 कलम, देशभक्ती वगैरे वगैरे विषय नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांनी आणले. त्या मुद्द्यांवर विरोधी पक्षांनी फार न बोलण्याची भूमिका घेतल्याने त्यावर काही वाद होऊ शकले नाहीत. भाषणांमधला तोच तोच पणा, मुद्द्यांची कमतरता हे ही वैशिष्ट्य या निवडणुकीत जाणवलं.

राज्याची आर्थिक स्थिती ढासळतेय. तसं जागतिक मंदीमुळे त्याचा परिणाम भारतावरही दिसतोय. औद्योगिक राज्य असल्यामुळे महाराष्ट्रावर त्याचं जास्त सावट आहे. रस्ते, दळववणळाची साधनं, बंद पडणारे कारखाने, शिष्यवृत्ती, महापरिक्षा पोर्टल, शेतकऱ्यांचे प्रश्न, दुष्काळ, पीकविमा, शेतमालाचा भाव, शेतकऱ्यांच्या आत्महत्या, बेरोजगारी, मंदी, कर्जमाफी-कर्जपुनर्रचना, महिला आणि अनुसुचित जाती-जमातींवरचे अत्याचार अशा विविध समस्यांवर व्यापक चर्चा होणं आवश्यक आहे. ती होताना या प्रचारात दिसली नाही. सरकारच्या लेखी या सर्व समस्या मागील म्हणजे काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसच्या काळातल्या समस्या आहेत. आता या बचावाला काहीच बोलता येत नाही. ज्यांनी समस्या आहे हे मान्यच करायला नकार दिला असेल त्यांना त्यावरच्या तोडग्यावर बोलायला कसं लावणार.

शरद पवार स्वतःच्या पक्षाचं अस्तित्व वाचवण्यासाठी लढतायत, काँग्रेसकडे लढणारा नेता नाही म्हणून ते पवारांचा हात पकडून स्वतःचा बचाव करण्याचा प्रयत्न करतायत. भाजपा आणि शिवसेनेत कुरघोड्य़ा आहेत, मात्र हे दोन्ही पक्ष ऑस्ट्रेलियाच्या टीम सारखं खेळतायत. खरी चुरस भाजपा आणि शिवसेनेत आहे. कुणाच्या जागा कमी आणि कुणाच्या जागा वाढणार याची रणनिती सुरू आहे. यंदा शिवसेना खुल्या दिलाने भाजपासाठी काम करताना दिसत नाहीय. स्वतःच्या पक्षाचा स्ट्राइक रेट वाढवण्यासाठी शिवसेनेचा भर आहे. अनेक ठिकाणी भाजपाची मतं शिवसेनेला ट्रान्सफर होत नाहीत, यातून धडा घेतलेल्या शिवसेनेनं यंदा सगळी ताकद लावली आहे.

महाराष्ट्राच्या विधानसभेत यंदा सगळं काही वनवे असणार आहे, असं भाकित करणाऱ्या सगळ्यांनी थोडं थांबायला हवंय. काँग्रेस न लढताही जिंकण्याची स्वप्न बघतेय, त्यामुळे त्यांचा परफॉर्मन्स यथा-तथाच राहणार आहे मात्र शिवसेना- भाजपामधली रस्सीखेच या निवडणुकीला वेगळा आयाम देऊन गेलीय. पैलवान मैदानात नाही तर घरातच बसलेला होता. तो आता दंड थोपटतोय.

Updated : 20 Oct 2019 2:25 PM GMT
Next Story
Share it
Top