रावते साहेब, विद्यार्थ्यांना बसच्या टपावरून प्रवास करावा लागतोय

रावते साहेब, विद्यार्थ्यांना बसच्या टपावरून प्रवास करावा लागतोय

356
0

ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांकडे सर्वच यंत्रणांचं कायम दुर्लक्ष होत आलेलं आहे. एसटी महामंडळाकडून विद्यार्थ्यांना अनेक सवलती दिल्या जातात. मात्र, महामंडळाच्या बसफे-याच नियमित नसल्याचा त्रास विद्यार्थ्यांबरोबरच सामान्य नागरिकांनाही होतोय. शेवटी, घरी जायची ओढ असल्यानं विद्यार्थ्यांनी चक्क जीव मुठीत घेऊन बसच्या टपावरून प्रवास केल्याचं विदारक चित्र बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव इथं पाहावयास मिळालं.

नेमकं काय घडलं ?

सोमवारी कवळगाव वरून खामगावकडे निघालेल्या खामगाव आगाराच्या एसटी बसच्या टपावरून दिवठाणा येथील शाळेचे विदयार्थी बस मध्ये जागा नसल्यामुळे बसच्या टपावर बसुन प्रवास करू लागले. त्यावेळी रस्त्यावरून जाणा-या काहींना हे चित्रं थोडसं विचित्र वाटल्यानं त्यांनी फोटो, व्हिडिओ काढले. त्यानंतर ते सोशल मीडियावर व्हायरलही केले. तब्बल ३५ किलोमीटरचा प्रवास विद्यार्थ्यांनी बसच्या टपावरच बसून केला. सध्या पावसाळ्याचे दिवस असल्यानं रस्ते अपघाताच्या घटनांचं प्रमाण हे अधिक असतं. मात्र, सुदैवानं या प्रवासात कुठलाही अनुचित प्रकार घडला नाही. या मार्गावर एसटीच्या बसेस वेळेवर धावत नसल्यानं मिळेल त्या बसमध्ये मिळेल त्या जागी बसून विद्यार्थी प्रवास करत असतात. शाळा सुटल्यानंतरही विद्यार्थ्यांना बससाठी कित्येक तास वाट पाहावी लागते. सोमवारीही जेव्हा बस क्रमांक एम ४० एन ९६६६ ही बस स्थानकात आली तेव्हा ती आधीच्या प्रवाशांमुळं भरगच्च झाली होती. त्यामुळं विद्यार्थ्यांना बसच्या टपावर बसण्याशिवाय पर्याय नव्हता. त्यामुळं विद्यार्थ्यांनी बसच्या टपावर इतर काही सहप्रवाशांसोबत बसण्याला प्राधान्य दिलं. विशेष म्हणजे बसचालक किंवा वाहकानंही त्यांना टपावर बसून
प्रवास करण्यापासून परावृत्त केलं नाही.

एसटीची सेवा कधी सुधारणार ?

एसटीच्या सेवेत अनेक बदल करण्याची आवश्यकता आहे. मात्र, परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी बसच्या टपावरून प्रवास केलेल्या घटनेची योग्य वेळी दखल घेतली तर भविष्यातली मोठी दुर्देवी घटना टाळता येऊ शकते. इतर ठिकाणी नियमबाह्यपणे स्कूलबसेस चालवून विद्यार्थ्यांचा जीव धोक्यात घातला जात असतो, त्यावरही अपेक्षित अंकुश बसवता आलेला नाही. अशा परिस्थितीत आता सरकारच्या एसटी बसेसही विद्यार्थ्यांसाठी सुरक्षित राहिलेल्या नाहीत, असा नाराजीचा सूर पालक वर्गात उमटू लागलाय.
कारवाई तर कराच, पण बस वेळेवर सोडा

संबंधित घटनेची चौकशी करून बसचालक आणि वाहकावर योग्य ती कायदेशीर कारवाई करण्याचं आश्वासन खामगावचे आगार व्यवस्थापक रितेश फुलपगारे यांनी दिलंय. नुकत्याच झालेल्या अर्थसंकल्पामध्ये केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी भारतात उच्च दर्जाचं शिक्षण देण्यासाठी मोठी तरतूद केलीय. शिवाय परदेशातील विद्यार्थ्यांना दर्जात्मक शिक्षण देण्यासाठी भारतात ‘स्टडी इन इंडिया’ सारखे उपक्रम (Study in india)राबवण्याचं आश्वासनही दिलंय. आंतरराष्ट्रीय स्तरावर भारतीय विद्यार्थ्यांनी सक्षमपणे सामोर जावं यासाठी केंद्र सरकार प्रयत्नशील असल्याचं त्या म्हणाल्या आहेत. मात्र, मुळ भारतीय विद्यार्थ्यांनाच शिक्षणासाठीच्या पायाभूत सुविधांपासून वंचित राहावं लागतंय, याकडे सरकारनं अधिक लक्ष देण्याची गरज आहे.