राजीव गांधीनी विशाल जनादेशाचा वापर भितीचे वातावरण निर्माण करण्यासाठी केला नाही :...

राजीव गांधीनी विशाल जनादेशाचा वापर भितीचे वातावरण निर्माण करण्यासाठी केला नाही : सोनिया गांधी

देशाचे माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या 75 व्या जयंती निमित्त दिल्ली येथे एका कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. या कार्यक्रमात राजीव गांधी यांच्या पत्नी आणि कॉंग्रेसच्या अंतरीम अध्यक्ष सोनिया गांधी यांनी देशभरातील कॉंग्रेस कार्यकर्त्यांना संबोधीत केलं.

यावेळी राजीव गांधींविषयी बोलताना सोनिया गांधी म्हणाल्या की, ‘नियती 28 वर्षापुर्वी अत्यंत वाईट पध्दतीने राजीव यांना आपल्यातून घेऊन गेली. मात्र, त्यांच्या आठवणी त्यांचे विचार आजही आपल्या सोबत आहेत. राजीव एक मजबूत आत्मनिर्भर भारताचे निर्माण करु इच्छित होते. एक असा भारत ज्याचे नागरिक गरिमापूर्ण जीवन जगतील. एक असा भारत जो आपल्या युवकांच्या उर्जेवर पुढे जाईल’ राजीव गांधींनी हा संदेश दिला की, भारताच्या विविधतेत देखील एकता बनवली जाऊ शकते.

यावेळी सोनिया यांनी मोदी सरकार वर देखील निशाणा साधला… ”राजीव गांधींना 1984 साली विशाल जनादेश मिळाला होता, मात्र, त्यांनी या जनादेशाचा उपयोग भिती निर्माण करण्यासाठी, लोकांना धमकावण्यासाठी केला नाही. त्यांनी त्यांच्या शक्तीचा उपयोग लोकशाहीच्या सिद्धांताला धोक्यात घालण्यासाठी केला नाही’’ असं म्हणत मोदी सरकारवर निशाणा साधला.

यावेळी सोनिया गांधी यांनी कॉंग्रेस कार्यकर्त्यांना देखील संदेश दिला  ‘कॉंग्रेस वाईट काळातून जात आहे. मात्र, या विभाजनकारी शक्ती सोबत आपण आपल्या विचाधाऱेनं लढायला हवं’ असं म्हणत भाजपवर निशाणा साधला.