Home > राजदीप सरदेसाई > भारत-पाकिस्तान सामने सतत व्हावेत ; का ?

भारत-पाकिस्तान सामने सतत व्हावेत ; का ?

भारत-पाकिस्तान सामने सतत व्हावेत ; का ?
X

निवडणूकीच्या हवेचा रोख ओळखण्यासाठी जर उत्तर भारतातील पानवाले दिशादर्शक ठरू शकत असतील, तर लंडनचे टॅक्सी ड्रायव्हर्स हे बहुतेकदा खेळाबाबतचा अंदाज वर्तवणारे चाणाक्ष तज्ज्ञ असतात. लंडनमध्ये माझा टॅक्सीचालक हा योगायोगाने पाकिस्तानी निघाला आणि तो जेंव्हा चॅंम्पियन्स ट्रॉफीमध्ये भारताविरुद्धच्या सामन्यात त्याचा संघ मोठ्या पराभवाच्या दिशेने वाटचाल करत असल्याचा अंदाज वर्तवत होता, तेंव्हाच मेन इन ग्रीन मोठ्या संकटात सापडल्याचे लक्षात आले. शेवटी ‘बिग ब्रदर’ ला हरविण्याचा हा जो जूनन आहे, त्याचाच पाकिस्तानी लोकांना गर्व वाटत आला आहे. पण, आता हे सगळेच बदललं आहे आणि त्यामुळेच बर्मिंगहॅममध्ये पाकिस्तानचा भारताविरुद्ध १२४ धावांनी झालेला मोठा पराभव हा मुळीच आश्चर्यकारक वाटू नये. टीम इंडिया ही आज पाकिस्तानपेक्षा कितीतरी पट अधिक चांगली आहे, हेच आजचे वास्तव आहे.

पण, कायमच काही अशी परिस्थिती नव्हती. मी लहानाचा मोठा होत असतानाच्या १९८० च्या काळात, पाकिस्तानच भारताचा बहुतेकदा पराभव करत असे. तो अर्थातच द ग्रेट इम्रान खानच्या नेतृत्वाखालील अतिशय शक्तीशाली संघ होता. कदाचित, १९८६ साली शारजाच्या सामन्यात जावेद मियांदादने शेवटच्या चेंडूवर मारलेल्या षटकाराने पाकिस्तानला एक वेगळंच मानसिक बळ दिलं, जे पुढे कित्येक वर्ष त्यांच्याबरोबर राहीलं. आपल्यामध्ये पुन्हा एकदा आत्मविश्वास रुजविण्यासाठी आणि सुमारे दिड दशकं भारतीयांमध्ये असलेला न्यूनगंड दूर करण्यासाठी आपल्याला २००३ च्या विश्वचषक स्पर्धेच्या उपांत्यपूर्व सामन्यात सचिन तेंडूलकरनं दैदीप्यमान खेळी करेपर्यंत वाट पहावी लागली. त्यानंतर मात्र, प्रत्येक सरत्या वर्षासह, भारत आणि पाकिस्तान यांच्यातील वाढती दरी अधिकाधिक उघड होत गेली आणि आज तर अशी परिस्थिती आहे की कदाचित मोहम्मद आमीर या डावखुऱ्या वेगवान गोलंदाजाचा अपवाद वगळता, एकही पाकिस्तानी खेळाडू असा नाही, जो भारताच्या एकदिवसीय संघामध्ये स्थान मिळवू शकेल. तर मग नेमका काय बदल झाला आहे?

यासाठी आपल्याला भूतकाळात डोकावून पाहावे लागेल. १९८०च्या दशकाच्या उत्तरार्धात... जेंव्हा भारत आणि पाकिस्तान या दोन्ही देशांची अर्थव्यवस्था गंभीर संकटात होती... पहिल्यांदा पाकिस्तानला आणि त्यानंतर १९९१ साली भारताला आर्थिक संकटातून सुटका करुन घेण्यासाठी आयएमएफकडे जाण्याशिवाय पर्यायच राहीला नाही. त्याला प्रतिसाद देताना भारताने समाजवादी मार्ग सोडून दिला आणि आर्थिक उदारीकरणाला चालना दिली, त्याचबरोबर तोपर्यंत सुप्तावस्थेत असलेल्या उद्योजकांमधील ऊर्जेला वाट करुन दिली. याऊलट, भ्रष्टाचार आणि राजकीय अस्थैर्यात अडकलेल्या पाकिस्तानची मात्र ही गंभीर परिस्थिती हाताळताना चांगलीच तारांबळ उडाली.

शतकाच्या सुरुवातीपासूनच भारताने लोकशाही परंपरांनी मजबूत केलेली दिर्घकालीन राजकीय स्थिरता अनुभवली तर पाकिस्तानने मात्र त्यांच्या पंतप्रधानांना कारावास होत असताना किंवा त्यांच्या हत्या होत असतानाही, लष्कराने मात्र आपले वर्चस्व अबाधित राखल्याचे पाहिले. खास करुन पाकिस्तानी सैन्याकडून भारत आणि अफगाणिस्तानविरुद्धच्या दहशतवादाला आश्रय देण्याचा निर्लज्ज प्रयत्न झाल्यामुळे, आज त्या देशात बंदुका आणि इस्लामी कट्टरवादाचे धोकादायक मिश्रण तयार झाले आहे. आज भारताने जेंव्हा जगातील सर्वाधिक वेगाने वाढणारी मोठी अर्थव्यवस्था बनण्याचा आणि त्याचबरोबर जी-२० सारख्या महत्वाच्या संघटनेचा भाग होण्याचा मान मिळविला आहे, पाकिस्तान हा जवळजवळ एक ‘परिहा स्टेट’ (आंतरराष्ट्रीय समुहाने बहिष्कृत ठरविलेले राष्ट्र) बनला आहे, ज्याची ओळखच दहशतवादाचा प्रसार करणारा अशी झाली आहे.

हाच विरोधाभास आता क्रिकेटच्या मैदानावरही परावर्तित होताना दिसत आहे. आपली आर्थिक ताकद आणि प्रेक्षकांचा बेभान पाठिंबा यांच्या जोरावर आज भारत जागतिक क्रिकेटची राजधानी बनला आहे, पाकिस्तानमध्ये मात्र २००९ साली लाहौरमध्ये श्रीलंकेच्या संघावर झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर एकही कसोटी सामना होऊ शकलेला नाही. एकीकडे भारतीय खेळाडूंना इंडियन प्रिमियर लिगमधून फायदा मिळत असताना आणि उच्च दर्जाच्या स्पर्धेला तोंड देण्याची संधी मिळत असताना, पाकिस्तानी क्रिकेटपटूंना मात्र गल्फमधील जवळजवळ रिकाम्या मैदानांतून स्वतःचा खेळ दाखवावा लागत आहे. अत्यंत कुशल आणि तंदूरस्त असा भारतीय संघ आणि अगदी सामान्य असा पाकिस्तानी संघ यांच्यामध्ये असलेली तफावत सहजपणे उघड करण्यासाठी पाकिस्तानच्या क्षेत्ररक्षणाची लाजिरवाणी स्थितीच पुरेशी आहे. बर्मिंगहॅममध्ये झालेल्या सामन्यात अगदी साधारण क्लब क्रिकेट संघानेदेखील त्यांच्यापेक्षा जास्त चांगले क्षेत्ररक्षण केले असते.

त्यामुळेच आज कधी नव्हे इतकी पाकिस्तानबरोबर क्रिकेट खेळण्यायोग्य वेळ आलेली आहे... इतर काही नाही तर यापूर्वीच्या काळात झालेल्या पराभवांचा बदला घेण्याची... आजही दोन्ही देशांदरम्यान खेळल्या गेलेल्या १२८ एकदिवसीय सामन्यांचा निकाल पहाता पाकिस्तानची बाजू वरचढ आहेः त्यांनी ७२ सामने जिंकले आहेत, तर आपण ५२ आणि चार सामने अनिर्णित राहीले आहेत. पाकिस्तानशी सर्व प्रकारच्या क्रिकेटवर बहिष्कार घालण्याची इच्छा असलेल्या टोकाच्या राष्ट्रवाद्यांना विसरुन जा... भारत-पाकिस्तान क्रिकेट हे कदाचित काही जणांना गोळीबाराशिवायचे युद्ध वाटू शकते, पण सीमेवरील संभाव्य रक्तरंजित संघर्षापेक्षा ते प्रामाणिकपणे अधिक चांगले राहील. शीतयुद्धाचा काळ आठवून पाहा, जेंव्हा साम्यवादी देश हे खेळाचा वापर त्यांच्या व्यवस्थेचा वरचढपणा सिद्ध करण्यासाठी करत असत. आता, खास करून उपखंडाला हे दाखवून देण्याची आपली पाळी आहे की, भारताने सर्व सामाजिक बाबींमध्ये पाकिस्तानवर वर्चस्व मिळविले आहे, खास करुन अशा खेळामध्ये ज्यासाठी आपण सगळे वेडे आहोत.

ता. कः गेल्या आठवड्यात एका क्रिकेट कॉन्क्लेव्हमध्ये माजी पाकिस्तानी कर्णधार आमीर सोहेलने मला विचारले की इस्लामबादमध्ये लष्करी अधिकारी सत्तेत असतानाच का बरं भारत पाकिस्तान क्रिकेटची भरभराट झाली. माझे उत्तर अगदी सोपे होतेः जेंव्हा पाकिस्तानात लष्कर सत्तेत असते, तेंव्हा दहशतवादी हे सैन्याच्या नियंत्रणात असतात आणि त्यामुळे त्यांच्याकडून काही आगळीक होण्याची शक्यता कमी असते. त्यावेळी एकदाच, इतरवेळा वाचाळ असणारा सोहेल यावर प्रतिक्रीया देताना मात्र स्टम्प्ड झाल्यासारखा वाटला.

राजदीप सरदेसाई

Updated : 10 Jun 2017 6:18 AM GMT
Next Story
Share it
Top