Home मॅक्स ब्लॉग्ज राज ठाकरेंचं स्वागत आहे….

राज ठाकरेंचं स्वागत आहे….

1024
0
Courtesy : Social Media
Support MaxMaharashtra

राज ठाकरे यांची या निवडणुकीत काय भूमिका असेल या प्रश्नावरचा पडदा अखेर उठला आहे. राज ठाकरे यांनी विरोधी पक्षांची भूमिका मागितली आहे. या भुमिकेत येण्याची इच्छा प्रदर्शित केल्याबद्दल राज ठाकरे यांचं जाहीर अभिनंदन. सध्या विरोधी पक्षातले बहुतेक सर्वच नेते शरीराने विरोधी पक्षात आणि मनाने सत्तेत सहभागी आहेत. काहींनी शारीरिकदृष्ट्या पक्षत्याग करून थेट सत्तेत सहभागी होण्याचा रस्ता स्वीकारला. अशा वेळी विरोधी पक्षाची भूमिका पार पाडण्याची हिंमतच कोणी दाखवायला तयार नाही.

ईडी ने नोटीस पाठवून राज ठाकरे यांची 9 तास चौकशी केली होती. खरं तर हा राजकीय डावपेचाचा एक भाग आहे. यातून जे काही व्हायचं ते होईल पण सार्वजनिक जीवनात वावरत असताना अशा पद्धतीच्या आव्हानांना तोंड द्यायची तयारी ठेवलीच पाहिजे. भ्रष्टाचाराचे आरोप सिद्ध व्हायला लागणारा वेळ अशाच कारणांमुळे आहे. राज ठाकरे यांचा कोहीनूर मिल प्रकरणातला सहभाग सर्वांना माहित आहे. याची शंका आल्यानंतर तपास यंत्रणांनी चौकशी केली असती तर खऱ्या अर्थाने तपास यंत्रणांच्या निष्पक्षपातीपणाची खात्री पटली असती, पण निवडणुका आल्या की या तपास यंत्रणांची होणारी लगबग पाहिली की संशयच येतो. तपास यंत्रणांमधल्या अनेक अधिकाऱ्यांना आपण सर्वच जण जवळून ओळखतो. त्यांची निष्ठा कर्तव्याशी कमी, मालकांशी जास्त असते. चांगल्या पोस्टींग साठी ते सत्तेत असणाऱ्यांच्या आसपास घुटमळत असतात. त्यामुळे अशा चौकशा, अटका यांची मानसिक तयारी ठेवलीच पाहिजे. राज ठाकरे ज्याला हुकूमशाही म्हणतात त्या हुकूमशाहीत अशा कारवाया अपेक्षित असतात.

हे ही वाचा :

राज ठाकरे ईडी आणि टायमिंग

कदाचित ईडी चौकशी नंतर राज ठाकरे सरकारवर म्हणजे भाजपा वर फार टीका करणार नाहीत, कदाचित ते फक्त शिवसेनेलाच लक्ष्य करतील. जे काही करतील ते त्यांनी विरोधकाच्या भूमिकेत येऊन प्रामाणिकपणे केलं पाहिजे.

या कारवायांच्या पलिकडे राज्याचं हित, जनता आहे. या जनतेच्या हिताचं रक्षण करण्याची जबाबदारी विरोधी पक्षांवर आहे. राज्यातला विरोधी पक्ष या कर्तव्यापासून दूर झाला. राजकारणाचे लाभार्थी असलेले नेते विविध आरोपांमुळे घेरले गेले. या नेत्यांवर पक्ष अवलंबून असल्याने त्यांना दुखवण्याची हिंमत पक्षांच्या प्रमुखांमध्ये राहिली नाही. जो पर्यंत या नेत्यांनी भीतीपोटी पक्ष सोडले नाहीत तो पर्यंत त्यांच्या हकालपट्टीचा निर्णय ही या पक्षांना घेता आला नाही. यावरून काही घराणी राजकारणात किती वरचढ असतात याचा अंदाज बांधता येतो. अशा नेत्यांना भारतीय जनता पक्षाने रेड कार्पेट दिलं. असे नेते आपल्या पक्षातून गेले, त्यामुळे आपला सात-बारा कोरा झाला आता नवीन जोमाने कामाला लागूया अशी भावना ही विरोधी पक्षांमध्ये निर्माण होऊ शकली नाही. याचं कारण म्हणजे या पक्षांनी आपल्या दुसऱ्या तिसऱ्या फळीतील कार्यकर्त्यांना कधी तयार होऊ दिलं नाही, मोठं होऊ दिलं नाही, संघर्ष करू दिला नाही. सत्तेत असताना सत्ता उपभोगली.

राज ठाकरेंच्या चौकशीत ‘राज’कारण आहे का? – निखिल वागळे

आज महाराष्ट्रीतील विरोधी पक्ष एका विचित्र अवस्थेतून जात आहे, मेलेलेल्यांना किती मारायचं म्हणून आज तर विरोधी पक्षांवर चर्चा करणं सोडून दिलं तर ती ऐतिहासिक चूक ठरू शकेल. वंचितच्या आगमनाचं मी स्वागत केलं होतं. आप पक्षाने महाराष्ट्रात निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला याचं ही मी स्वागत केलं. मनसे ने निवडणूक लढवली पाहिजे, ती ही कुठलीही आघाडी न करता या मताचा मी आहे. काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस हेच प्रमुख विरोधी पक्ष आहेत या भूमिकेतून आता बाहेर यायला पाहिजे. या शिवायही बरेच पर्याय निर्माण होऊ शकतात. गरज नाहीय सर्वच विरोधी पक्षांनी एकाच छत्राखाली निवडणूक लढवायची. सगळ्यांना वाढायचा अधिकार आहे, लढण्याचा अधिकार आहे. राज्यातल्या छोट्या छोट्या विरोधी पक्षांनी विरोधी पक्षाचा अवकाश ताब्यात घेतला पाहिजे. विरोधकाच्या भूमिकेत यायला पाहिजे. सत्तेशिवाय ही जगता येतं, वाढता येतं, टिकता येतं हे समजून घेतलं पाहिजे. राज ठाकरे यांनी या अवघड अवकाशात प्रवेश करण्याचा निर्णय घेतला आहे.

हा कठीण निर्णय आहे. या निर्णयावर जर ते ठाम राहिले तर येत्या काळात ते ही सत्तेच्या जवळ पोहोचू शकतात. राजकीय आणि सामाजित आयुष्यात शून्य अनेकदा तुमचं स्वागत करत असतात. शून्याला न घाबरता त्यातून नवं जग साकारायची धमक आता दाखवायला हवी. राज ठाकरे, तुमचं विरोधी पक्षाच्या भूमिकेत स्वागत आहे.

Exclusive : ईडीची नोटीस आल्यापासून राज ठाकरेंचं काय चाललंय?


Warning: A non-numeric value encountered in /home/maxmaharashtra/public_html/wp-content/themes/Newsmag2/includes/wp_booster/td_block.php on line 997