‘आज त्यांना हिटलर नकोसा झालाय!’

‘आज त्यांना हिटलर नकोसा झालाय!’

760
0
आपल्यापैकी अनेकांना आठवत असेल की शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे स्वतः अनेकदा म्हणायचे,

“ही लोकशाही वगैरे काही मी मानत नाही, हुकूमशहाच हवा.”

मनसे च्या कार्यकर्त्यांची जडणघडण ही बाळासाहेबांच्या विचारांनीच झालीय. आज मात्र त्यांना हिटलर नकोसा झालाय!
पण अनेकजण आहेत असे आजही समाजात, ज्यांना लोकशाही, स्वातंत्र्य, व्यक्तिवाद वगैरे सगळं भंपक वाटतं. याच वाटण्याचा पुढचा भाग हा उदारमतवाद, सेक्युलॅरिझम आणि पुरोगामी वगैरेंना शिव्या घालण्याचा असतो. आणि हे सगळं जाऊन थेट हुकूमशाही वगैरेच यायला हवी असं त्यांचं मत असतं. जसं आधी राज ठाकरेंच्या आधीच्या पक्षाच्या नेतृत्वाचं मत होतं.
गंमत म्हणजे, लोकशाहीत राहूनच तुम्हांला लोकशाही नको, हुकूमशाही पाहिजे असं म्हणता येतं. एकदा का हुकूमशाहित गेलात की तुम्ही लोकशाही पाहिजे म्हणू शकत तर नाहीच, शिवाय हा नको, तो हुकूमशहा पाहिजे असंही म्हणू शकत नाही.
हिटलर वगैरे आपण पुस्तकातून वाचले, बघितले आणि ऐकलेच नुसते. आजवर कधी भोगावेही लागले नाहीत. यापुढचं माहीत नाही!
खरंतर, बहुतांशी जर्मनांना पण हिटलरने आपलं काय नुकसान केलं हे हिटलर संपल्यानंतरच लक्षात आलं. Victor Klemperer नावाचे जर्मन प्रोफेसर होते. दुसऱ्या महायुद्धाच्या काळात त्यांनी एक डायरी ठेवली होती. नंतर ती हिटलरच्या कारकीर्दीबद्दल जर्मन नागरिकांच्या नजरेतून भाष्य करणारा महत्त्वाचा दस्तावेज ठरली. याच Klemperer यांनी एक नोंद करून ठेवलीय. हिटलरने स्वतःला गोळी घालून घ्यायच्या आदल्या दिवशी पर्यंत, म्हणजे 29 एप्रिल 1945 पर्यंत, जेव्हा रशियन, अमेरिकन, ब्रिटिश आणि काही फ्रेंच फौजा बर्लिनमध्ये घुसल्या होत्या, त्या दिवसापर्यंत हिटलरचे सैनिक, तो त्यांच्याशी खोटं बोलला, त्याने त्यांना अनेक घटनांबद्दल खोटी माहिती दिली हे मान्य करायला तयार नव्हते. हात तुटून जायबंदी झालेल्या सैनिकानेही त्यांना 29 एप्रिल ला “hitler has never lied yet, i believe in Hitler” (हिटलर आजवर कधीही खोटं बोललेला नाही, माझा हिटलवर विश्वास आहे) असं म्हटलं होतं. ही नोंद Klemperer यांनी स्वतःच केलेली आहे.
हे अश्यासाठी सांगितलं की आज मनसेच्या कार्यकर्त्यांना (त्यांच्या भाषेत सैनिकांना) हिटलर आठवलाय. हुकूमशाहीचा राग, संताप आलाय. ‘लोकशाही बरी रे बाबा’ म्हणावंसं वाटतंय. पण ज्यांना अजूनही हिटलर हवाय, त्याच्या खोट्यानाट्या कहाण्या हव्यात, जगण्याच्या मूलभूत प्रश्नावरून लक्ष विचलित करण्यासाठी त्याने रोजच्यारोज केलेले बहाणे जी मंडळी अजूनही स्वीकारत आहेत, त्यांनी हे लक्षात असू द्यावं की हिटलरनंतर जर्मनीची भयानक पीछेहाट झाली आणि त्यातून आर्थिक, सामाजिक, सांस्कृतिक आणि मानसिक पातळीवर सावरायला त्या देशाला पुढची ४० वर्षं द्यावी लागली.
-अमेय तिरोडकर