पुणे : गरवारे महाविद्यालयात विद्यार्थ्यांचे धरणे

पुणे : गरवारे महाविद्यालयात विद्यार्थ्यांचे धरणे

शेवटच्या वर्षी आवडीचे विषय निवडण्याला मनाई करणाऱ्या पुण्याच्या गरवारे कॉलेज प्रशासनाविरोधात विद्यार्थ्यांनी आंदोलन पुकारलं आहे. विज्ञान शाखेतील विद्यार्थ्यांना 10 विषयांपैकी आवडीचे विषय निवडायचं स्वातंत्र्य असतानाही कॉलेज प्रशासन दोनच विषयांपैकी एक विषय प्राविण्यासाठी निवडण्यास सांगत असल्याने विद्यार्थ्यांमध्ये असंतोष पसरला आहे. या प्रकरणी स्टुडंट हेल्पींग हँड संघटनेने गरवारे महाविद्यालयात प्राचार्यांच्या केबिनबाहेर आंदोलन केलं.
रसायनशास्त्रात प्राविण्य अभ्यासक्रम करायची इच्छा असलेल्या विद्यार्थ्यांना भौतिकशास्त्र तर काहींना जीवशास्त्रात अभ्यासक्रम पूर्ण करायचा सल्ला देण्यात आला.
बीएससी च्या 300 विद्यार्थ्यांसाठी रसायनशास्त्र आणि सांख्यिकी या विषयांसाठी 70-70 जागा ठेवण्यात आल्या आहेत. इतर विद्यार्थ्यांना कमी लोकप्रिय असलेले विषय निवडण्यासाठी सांगण्यात आलं आहे.
रसायनशास्त्र आणि सांख्यिकी मध्ये खूप विद्यार्थ्यांना प्रवेश हवा आहे, मात्र आम्ही जागांची संख्या वाढवू शकत नाही, असं कॉलेजचे प्राचार्य पी.बी. बुचडे यांनी एका इंग्रजी वृत्तपत्राशी बोलताना सांगीतलं.
दरम्यान, प्रथम वर्षापासून ही मुलं इथे शिकत आहेत. आवडीचा विषय नाकारण्यात आलेल्या विद्यार्थ्यांपैकी 27 विद्यार्थी मागासवर्गीय आहेत, आणि त्यांना रसायनशास्त्रातच करिअर करायचं आहे. या विद्यार्थ्यांची मागणी मान्य झाली नाही तर उग्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा स्टुडंटस हेल्पींग हँड संघटनेच्या कुलदीप आंबेकर यांनी दिला आहे.