Home News Update सरकार कोणाचंही येवो, त्यात या स्थळांचा वाटा महत्वाचा असणारंय!

सरकार कोणाचंही येवो, त्यात या स्थळांचा वाटा महत्वाचा असणारंय!

874
Support MaxMaharashtra

राज्यात अखेर राष्ट्रपती राजवट(President’s rule) लागू झाली आहे. त्यामुळं गेल्या काही दिवसांपासून घडत असलेल्या राजकीय घडामोडींना पूर्णविराम मिळाला आहे. आता नवीन सरकार कधी अस्तित्वात येणार हे येत्या काही दिवसांत कळेल. मात्र, सरकार बनवण्यासाठी ज्या काही घडामोडी घडल्या त्यात काही स्थळांचा रोल महत्वाचा आहे. याचठिकाणांहून सर्व सुत्र हलली आहेत. त्यामुळं त्यांची आठवण काढायलाच हवी.

या सर्व राजकीय घडामोडींमध्ये काही ठिकाणं केंद्रस्थानी आहेत. यामध्ये पहिलं अर्थातच मातोश्री आहे. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thakre)  यांच्यापासून सेनेच्या सर्व राजकीय घडामोडी मातोश्रीहूनच घडत आलेल्या आहेत. यावेळीही मातोश्रीच्या आदेशानुसारच सेनेची भूमीका ठरत आहे.

मातोश्रीसोबत दुसरं महत्वाचं ठिकाण म्हणजे सिल्व्हर ओक. हे नाव काही दिवसांपूर्वी सर्व महाराष्ट्राला परिचित झालं. शरद पवार यांच्या मुंबईतील या निवासस्थानातून सत्तेसाठी मोठ्या हलचाली घडत आहेत. याच ठिकाणी संजय राऊत(sanjay raut) आणि शरद पवार(shard pawar) यांची ३ ते ४ वेळेस भेट झाली. या भेटीदरम्यान शिवसेना आणि राष्ट्रवादी एकत्र येण्याच्या शक्यता निर्माण झाल्या आणि पुढच्या घडामोडी घडायला सुरूवात झाली.

‘सिल्व्हर ओक’हून आलेले निरोप राष्ट्रवादीच्या सर्व नेत्यांपर्यंत पोहोचवायचं ठिकाण बनलं होतं यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान. मुंबईत मंत्रालयाच्या अगदी जवळ असलेल्या याठिकाणी राष्ट्रवादीच्या सर्व महत्वाच्या नेत्यांचा कायम राबता असतो. ‘प्राईम लोकेशन’ असल्याने प्रतिष्ठान हे सर्वांसाठी सोयीचं आहे. राज्यातल्या या बिकट परिस्थितीत राष्ट्रवादीसाठीच्या या हक्काच्या ठिकाणी पक्षाची सर्व खलबतं झाली. पक्षाच्या महत्वाच्या नेत्यांची बैठक, आमदारांची बैठक, शरद पवारांचं पक्षनेत्यांना संबोधित करणं, पक्षानं प्रसारमाध्यमांशी बोलणं सर्वकाही याच ठिकाणी होतंय.

काँग्रेस हा राष्ट्रीय पातळीवरचा पक्ष असल्याने त्यांच्याविषयीच्या घडामोडी या राष्ट्रीय पातळीवरच झाल्या. राज्यात गोंधळाची परिस्थिती होत आहे हे ओळखून काँग्रेसने आपल्या आमदारांना राज्याबाहेर हलवलं आणि जयपूरला त्यांची ‘सोय’ केली. त्यानंतर काँग्रेससाठी काही काळ त्यांचं केंद्र जयपूर होतं. तिथं नेत्यांच्या आणि आमदारांच्या बैठकीत शिवसेनेला पाठींबा देण्यावर एकमत झालं. पक्षाचे प्रमुख नेते हा निरोप घेऊन दिल्लीकडे निघाले आणि जयपूरचा केंद्रबिंदू दिल्लीकडे सरकला.

पुढे सर्व गोष्टी दिल्लीतून झाल्या. सोनिया गांधी (sonia gandhi) यांच्या १० जनपथ इथल्या निवासस्थानी महाराष्ट्राचे प्रभारी मल्लिकार्जून खर्गे, के. सी. वेणूगोपाल, अहमद पटेल यांच्यात बैठकांचं सत्र सुरु झालं. त्यांच्या जोडीला राज्यातील काँग्रेसचे महत्वाचे नेते होते.

या सर्वांमध्ये सर्वात अंडररेटेड राहीलं ते ‘वर्षा’. महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांचं शासकीय निवासस्थान असलेल्या वर्षा बंगल्यावर भारतीय जनता पार्टीच्या कोअर कमीटीच्या बैठका पार पडल्या. भाजपशी संबंधित सर्व हलचाली वर्षा बंगल्यावरुनच झाल्या. भाजप सत्ता स्थापन करणार नाही हा ऐतिहासिक निर्णयही याच ठिकाणावरून जाहीर करण्यात आला.

या सर्व राजकीय घडामोडींमध्ये राजभवन शेवटी शेवटी समाविष्ठ झालं. राज्याच्या राज्यपालांचं शासकीय निवासस्थान असलेलं राजभवन हे सर्व राजकीय पक्षांचं अंतिम लक्ष्य होतं. सत्ता स्थापन करायची असल्यास त्याची रस्ता हा राजभवनातून जाणार होता. सर्वात आधी भाजपने राजभवनात राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेतली. त्यानंतर सेना पाठींबा देणार नाही हे स्पष्ट झाल्यानंतर त्यांनी सत्तास्थापन करण्यासाठी असमर्थता दाखवली.

हे ही वाचा : 

भाजपशी पुन्हा एकदा संपर्क करणार का? काय म्हणाले उद्धव ठाकरे

सत्तास्थापनेसाठी राज्यपालांनी निपक्षपाती भूमिका घ्यायला हवी होती – डॉ. उल्हास बापट

शिवसेनेची कोंडी ! कॉंग्रेस राष्ट्रवादीचं वेट अॅड वॉच…

त्यानंतर राज्यपालांच्या निमंत्रणानुसार शिवसेनेच्या शिष्टमंडळाने दुसऱ्या दिवशी संध्याकाळी राजभवनात राज्यपालांची भेट घेतली. मात्र सत्तेसाठीचं समीकरणं जुळवण्यात सेनेलाही अपयश आलं. त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसलाही राज्यपालांचं निमंत्रण आलं होतं. मात्र, आपण दिलेल्या वेळेत बहुमत सिद्ध करू शकत नाही हे लक्षात आल्यानंतर राष्ट्रवादीच्या नेत्यांनी वेळ वाढवून मागितला. राज्यपालांनी वेळ न देता थेट राष्ट्रपती राजवटीची शिफारस केल्याने राष्ट्रवादीची राजभवनची वारी टळली.

मध्यंतरी काही तास लीलावती रुग्णालयही राजकीय घडामोडीच्या केंद्रस्थानी आलं होतं. शिवसेना नेते संजय राऊत यांची प्रकृती बिघडल्यानंतर त्यांना लीलावती रूग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. त्यांच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली. त्यानंतर शरद पवार, उद्धव ठाकरे, आशिष शेलार यांच्यासह अनेक सर्वपक्षीय नेत्यांनी त्यांची भेट घेत प्रकृतीची विचारपूस केली. यावेळी संजय राऊत यांच्या प्रकृतीसोबत राज्यातल्या राजकीय प्रकृतीवरही चर्चा झाल्या असणार.

यासोबतच हॉटेल रिट्रीट आणि ताज लँड एंड हे दोन हॉटेलही चर्चेत राहीले. शिवसेनेनं मलाडच्या हॉटेल रिट्रीटमध्ये आपल्या आमदारांची बडदास्त ठेवली होती. याठिकाणी आदित्य ठाकरे हे ही आमदारांच्या भेटीला आले. वांद्रे पश्चिमच्या ताज लँड एंड या हॉटेलमध्ये शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्यात भेट झाली. यावेळी दोन्ही पक्षाचे अनेक नेते उपस्थित होते. मातोश्रीवरून आपलं राजकारण करणाऱ्या ठाकरेंनी पहिल्यांदा मातोश्रीच्या बाहेर येऊन राजकीय वाटाघाटीची चर्चा केली. त्यामुळे हे ठिकाणही ऐतिहासिक घटनेचं साक्षीदार असंच म्हणावं लागेल.

चांगल्या पत्रकारितेसाठी तुमचं योगदान आवश्यक आहे.

सहभाग निधी साठी इथे क्लिक करा


Warning: A non-numeric value encountered in /home/maxmaharashtra/public_html/wp-content/themes/Newsmag2/includes/wp_booster/td_block.php on line 997