स्मार्ट सिटी पिंपरी चिंचवड : पावसाळ्यातही सोसायट्यांना टॅंकरने पाणी पुरवठा…

स्मार्ट सिटी पिंपरी चिंचवड : पावसाळ्यातही सोसायट्यांना टॅंकरने पाणी पुरवठा…

शहरं स्मार्ट होणार आहेत. शहरांमध्ये सर्व सोयी सुविधा असतील. असं आपण नेहमीच ऐकत आलो आहोत. मात्र, आहे त्या शहरात कोणतंही नियोजन नसल्याचं वारंवार समोर आलं आहे. पिंपरी-चिंचवड शहरातील सुमारे 400 सोसायट्यांना आजही टँकरने पाण्याचा पुरवठा होत आहे. महिन्याकाठी 10 टँकरची आवश्यकता या सोसायटींना भासत आहे.

पालिकेला एका सोसायटीला महिन्याकाठी तीन लाख रुपये पाण्यासाठी खर्च करावं लागत आहे. लोकप्रतिनिधींना पाण्याचा योग्य पुरवठा करण्याला अपयश आल्याने नागरिकांच्या खिशाला कात्री बसत आहे.

पिंपरी-चिंचवड शहरात मागील महिन्यात झालेल्या जोरदार पावसात अनेक वस्त्यांमध्ये पाणी शिरल्याची परिस्थिती निर्माण झाली होती. तर शहरातील अनेक परिसरातील सोसायट्यांना पिण्याच्या पाण्याविना रहावे लागत असल्याचेही चित्र आजही पाहायला मिळत आहे. शहरात निर्माण होणार्‍या सोसायट्यांची उपनिबंधक सहकारी संस्था या कार्यालयाकडे झालेल्या नोंदणीनुसार होत असते.

त्या आकडेवारीनुसार पिंपरी-चिंचवड शहरात 3 हजार 869 सोसायटी नोंदणीकृत आहेत. त्यामध्ये वाढ झाली असण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. तर सुमारे 500 सोसायट्यांचे काम सुरू असून त्यांची नोंदणी झाली नसल्याची माहिती हाऊसिंग सोसायटी फेडरेशनच्या वतीने देण्यात आली.

सोसायटी बांधण्यात आल्यानंतर संबंधीत बिल्डरकडून पाण्याची सुविधा देणं गरजेचं होतं. मात्र, ती देण्यात आली नाही. महापालिका व स्थानिक लोकप्रतिनिधी देखील या सोसायट्यांची पाण्याची अडचणी सोडवू शकलेले नाहीत. त्यामुळे सोसायट्यांना पाण्याचे टँकर विकत घेण्याची वेळ आली आहे.

पिंपळे सौदागर, वाकड आदी परिसरातील सुमारे 400 सोसायट्यांना पावसाळ्यातही टँकर घ्यावे लागत आहे. सोसायटी मेंटनन्सचा खर्च प्रत्येक घराला 1 हजार 500 रुपये द्यावे लागत आहे. त्यामध्येच टँकरसाठी महिन्याकाठी अधिकचे दोन हजार रुपये द्यावे लागत आहेत. सोसायट्यांना एका टँकरला 800 ते 1000 रुपये मोजावे लागत आहेत. त्यामुळे नागरिक हैराण झाले आहेत. पाण्याची समस्या मिटणार तरी कधी? असा सवाल नागरिक विचारत आहेत.

पावसाळ्यात महिन्याकाठी दोन लाख, तर उन्हाळ्यात दुप्पट खर्च

पावसाळ्यात एका सोसायटीला 8 ते 10 पाण्याच्या टँकरची आवश्यकता भासत आहे. एका टँकरपाठी मागे 1 हजार रुपये सोसायटीला मोजावे लागत आहे. महिन्याकाठी टँकरच्या पाण्यासाठी एका सोसायटीला दोन लाख रुपये मोजावे लागत आहे. तर उन्हाळ्यात दुप्पट पाण्याचे टँकर मागवावे लागत आहेत. त्यामुळे एका सोसायटीमागे त्यासाठीचा खर्च 4 ते 6 लाखांवर जात आहे.

या संदर्भात हाऊसिंग सोसायटी फेडरेशनचे अध्यक्ष सुदेश राजे यांनी या संदर्भात बोलताना ‘शहरात साडे तीन हजार सोसायट्यांची नोंदणी आहे. त्यामध्ये आणखीन वाढ होईल. यामधील 400 सोसायट्यांना टँकरद्वारे पाण्याची मागणी करावी लागत आहे. स्थानिक आमदार व नगरसेवक यांच्या पुढाकाराने आम्ही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनाही या बाबत निवेदन दिले आहे. ते पाण्याची समस्या काही महिन्यात सोडवू असे म्हणाले आहेत’. अशी प्रतिक्रिया दिली आहे.