Home मॅक्स ब्लॉग्ज पानिपत: मराठ्यांच्या एका युद्धाची कहाणी…

पानिपत: मराठ्यांच्या एका युद्धाची कहाणी…

297
0
Courtesy : Social Media
Support MaxMaharashtra

साधारण 2 वर्षांपूर्वीची गोष्ट आहे. मी विश्वास पाटील यांची पानिपत कादंबरी वाचली होती. कादंबरी वाचताना सारखं वाटायचं यावर चित्रपट करायला पाहिजे. नेमकच पत्रकारीतेचं शिक्षण घेऊन बाहेर पडलो होतो. त्यामुळं चित्रपटाचा किडा डोक्यात जरा जास्तच वळवळ करत होता. राहील नाही म्हणून 1-2 मित्रांना बोलून पण बघितलं. ते आपलं असंच. त्याच दरम्यान एक बातमी आली ती म्हणजे पानिपत वर आशुतोष गोवारीकर फिल्म करताहेत. कादंबरी वाचल्यामुळं आणि यानी या विषयावर फिल्म होत असल्याचं समजताच मला जास्तच आनंद झाला. तेव्हापासून कालपर्यंत चित्रपटाबद्दल प्रचंड उत्सुकता होती ती अखेर काल संपली…

चित्रपट ऐतिहासिक असल्यामुळं अर्थातच त्याची तोडमोड केली जाऊ नये हे प्रामाणिक मत होतं. आशुतोष गोवारीकरांच्या फिल्म चांगल्या असतात. त्या प्रेक्षकांची मन जिंकणाऱ्या असतात. त्यात ही आपल्या म्हणजे महाराष्ट्राच्या मातीतली! आपल्या मातीतल्या माणसाने बनवलेली फिल्म… चित्रपट खरंच छान झालाय. पूर्ण 3 तास तुम्हाला पडद्याकडं पाहून ठेवायला दिग्दर्शक सक्सेस झालाय.

फक्त चित्रपटातील काही संदर्भ मात्र खटकतात. मी विश्वास पाटील यांची पानिपत कादंबरी वाचली म्हणून नाही तर इतरही संदर्भ पाहिले तर तुमच्या लक्षात येईल. मुळात दत्ताजी शिंदे यांना बुराडी घाटावर मारलं हे जगजाहीर आहे. पण असं असताना चित्रपटात मात्र वेगळाच किल्ला दाखवलाय. तो का हे मात्र समजत नाही. इतरही काही संदर्भ आहेत पण हा प्रामुख्याने लगेच लक्षात येतो. तो हा प्रसंग.

चित्रपटात आपापल्या परीने उत्कृष्ट अभिनय करण्याचा प्रयत्न प्रत्येकानेच केलाय. आशुतोष गोवारीकर यांनी सदाशिव भाऊंच्या भूमिकेत अर्जुन कपूर ला घेऊन मोठा सट्टा लावलाय, जुगार खेळलाय असं बऱ्याच चित्रपट समीक्षकांनी लिहिलेलं वाचलं होतं. खरंच अर्जुन कपूर सदाशिव भाऊंच्या भूमिकेला न्याय देऊ शकलाच नसेल असं वाटायचं पण तसं अजिबात जाणवलं नाही.

सुरुवातीला काही काळ आपल्या मनात हे पात्र म्हणावं तसं उतरत नाही. मात्र, जस जसा चित्रपट पुढे जातो. तसा तसा अर्जुन कपूर प्रेक्षकांच्या मनात घर करतो. त्यातच शेवटचा अर्धा तास अर्जुनन जो काही माहोल केलाय ते पाहता आधीचा अडीच तासातील त्याच काम विसरून जातोय.

अर्जुन कपूर ने त्याच्या परीनं बेस्ट देण्याचा प्रयत्न केलाय असं मी म्हणेल. अहमद शहा अब्दालीच्या भुमीकेसाठी संजय दत्तकडून दिग्दर्शकाला आणखी चांगलं काम काढून घेता आलं असतं. अब्दालीच्या भूमिकेसाठी संजय दत्त परफेक्ट बसतोय पण शेवटी जसा अपेक्षित होता तसा अभिनय मात्र दिसत नाही. क्रिती सेनन ने मात्र, पार्वतीबाईंच्या भूमिकेसाठी परफेक्ट काम केलंय.

फक्त एक गोष्ट राहून राहून सारखी जाणवते ती, चित्रपटात कुठंच पार्वतीबाईंच्या डोक्यावर पदर दिसत नाही. विचारायचं कारण हे की ऐतिहासिक चित्रपटाचा “दाखला” आहे ना म्हणून… मला सगळ्यात जास्त काम आवडलं ते नवाब शाह यांनी साकारलेला इब्राहिम खान गारदी… परफेक्ट काम आन हवा तसा लुक… जबरदस्त ट्युनिंग जुळालंय…. बाकी नानासाहेब, समशेर, मल्हार राव यांच्यासह बाकीचीही काम चांगलीच…

चित्रपटातील सीन खूप सुंदर शूट केलेत. थोडक्यात कॅमेरा बाप झालाय. जो माहोल टिपलाय तो जब्बर आहे… सुरुवातीला शनिवारवाड्यातील गाण्याचा सीन असो, सदाशिवभाऊंच्या लग्नाचा सीन असो की, मग शेवटी युद्धाचे सीन असो जबराट शूट केले आहेत.

चित्रपटाला जर चार चांद कोणी लावले असतील तर ते अजय-अतुल यांच्या गाण्याने लावलेत आहेत. कथा मराठी, ती पडद्यावर आणणारा माणुस मराठी त्यामुळं नेमकं काय हवंय ते अजय अतुल यांनी बरोबर दिलंय. शेवटी तेही याच मराठी मातीतील. तीनही गाणी भारी झाली आहेत.

एकंदरीतच, तीन तासात मराठ्यांच्या इतिहासाची उजळण पानिपत चित्रपटातून करुन देण्याचा प्रयत्न गोवारीकर यांनी केला आहे. तसं बघायला गेलं तर सगळ्याच अंगानं हा चित्रपट ठीक झालाय. मात्र, चित्रपटामध्ये सदाशिव भाऊ आणि पार्वतीच्या प्रेम कथेमुळं चित्रपट मध्ये थोडासा भरकटल्या सारखं वाटतं. मात्र, शेवटी सदाशिव भाऊंनी लढाईत दाखवलेलं साहस पैसा वसूल करण्यास मदत होते. पण हे सगळं अनुभवण्याची मजा फक्त मोठ्या पडद्यावर आहे. त्यामुळं चित्रपट मोठ्या पडद्यावर पाहिला तर अधिक चांगलं होईल.

(लेखक टिव्ही 9 या वृत्तवाहीनीत पत्रकार म्हणून कार्यरत आहेत.)

चांगल्या पत्रकारितेसाठी तुमचं योगदान आवश्यक आहे.

सहभाग निधी साठी इथे क्लिक करा


Warning: A non-numeric value encountered in /home/maxmaharashtra/public_html/wp-content/themes/Newsmag2/includes/wp_booster/td_block.php on line 997