Home > News Update > UGC च्या निर्णयाला युवासेनेचे ‘सर्वोच्च’ आव्हान

UGC च्या निर्णयाला युवासेनेचे ‘सर्वोच्च’ आव्हान

UGC च्या निर्णयाला युवासेनेचे ‘सर्वोच्च’ आव्हान
X

कोरोनाच्या संकटामुळे रखडलेल्या अंतिम वर्षाच्या परीक्षा घेण्याच्या युजीसीच्या निर्णयाला युवासेनेने सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले आहे. अंतिम वर्षाच्या परीक्षा सप्टेंबरमध्ये घेण्यात याव्यात असे आदेश युजीसीने सर्व विद्यापीठांना दिलेले आहेत. पण महाराष्ट्र सरकारने याआधीच राज्यात अंतिम वर्षाच्या परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेतलेला आहे. विद्यार्थी, शिक्षक तसेच शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या आरोग्य सुरक्षेच्या दृष्टीने परीक्षा घेणे धोकादायक आहे, अशी भूमिका राज्य सरकारने वारंवार मांडलेली आहे. पण त्यानंतरही युजीसीने परीक्षा बंधनकारक आहेत असं स्पष्ट केल्यानंतर युवासेनेनं थेट सर्वोच्च न्यायालयात धाव घेतलेली आहे. पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी ट्विट करुन ही माहिती दिली आहे.

“देशातील कोरोनाबाधीत रुग्णांची संख्य़ा १० लाखांच्या वर गेली आहे. अशावेळी लाखो विद्यार्थी, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि त्यांच्या परीवारांच्या आरोग्य़ सुरक्षेसाठी अंतिम वर्षाच्या परीक्षा घेण्याचा अट्टाहास युजीसीने सोडावा, असे आदेश सर्वोच्च न्यायालयाने युजीसीला द्यावे अशी विनंती करणारी याचिका युवासेनेने सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे”

अशी माहिती आदित्य ठाकरे यांनी दिली आहे.

अंतिम वर्षाच्या परीक्षांवरुन सध्या मोठा वाद निर्माण झाला आहे. राज्याचे उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनीही वारंवार केंद्रीय मनुष्यबळ विकासमंत्र्यांना पत्र लिहून परीक्षा रद्द करण्याची मागणी केली आहे. तसंच युजीसीने जरी अंतिम वर्षाच्या परीक्षा बंधनकारक केल्या असल्या तरी सध्याच्या परिस्थितीत परीक्षा घेणे शक्य नसल्याचेही राज्य सरकारने स्पष्ट केले आहे. आता सर्वोच्च न्यायालय याबाबत काय भूमिका घेते ते पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

Updated : 18 July 2020 9:37 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top