Home > News Update > दिल्ली भाजपपासून दूर का?

दिल्ली भाजपपासून दूर का?

दिल्ली भाजपपासून दूर का?
X

दिल्ली जिंकण्यासाठी भाजपने सर्व ताकद झोकून दिली होती. यावेळी कुठल्याही परिस्थितीत दिल्ली ताब्यात घ्यायची या इर्षेने भाजपने आपली संपूर्ण फौज मैदानात उतरवली होती. तब्बल २४ केंद्रीय मंत्री २४० खासदार, आजी - माजी ११ मुख्यमंत्री दिल्लीच्या रणसंग्रामात सर्वशक्तीनिशी उतरले होते. ४० स्टार कँम्पेनर प्रचारात होते. भाजपने दिल्लीत रोड शो, सभा, छोटेखानी सभा असे तब्बल ५ हजार एव्हेंट केले. अगदी निवडणुकांच्या तोंडावर बँडमिंटनपटू सायना नेहवाल हिला भाजपमध्ये दाखल करुन घेण्यात आलं. प्रजासत्ताक दिनाच्या दिवशीही गृहमंत्री अमित शहा दिल्लीत प्रचार सभा घेत होते. बिटींग द रिट्रीटच्या समारोहातही गृहमंत्री दिसले नव्हते.

मिशन शाहिन बाग

भाजप नेहमीच शास्त्रशुध्द सर्व्हे करुन मैदानात उतरतो. मात्र यावेळी भाजपने केलेल्या प्रत्येक सर्व्हेमध्ये ‘आप’सत्ता राखणार हे स्पष्ट झालं होतं. अरविंद केजरीवाल सरकारने शाळा, पाणी, वीजबिल, आरोग्य या क्षेत्रात जबरदस्त कामगिरी केली आहे. त्यामुळे ‘आप’ ला विकासाच्या मुद्यावर काउंटर करणे शक्य नाही. याची जाणीव भाजपला होती. नेमक त्यावेळी सुधारीत नागरिकत्व कायदा आणि CAA च्या विरोधात देशभरात मोठी आंदोलनं सुरु झाली.

जामियामधील गोळीबार, जेएनयूमध्ये विद्यार्थी, शिक्षकांना झालेली मारहाण, यामुळे संपूर्ण देश ढवळून निघाला होता. एका सर्व्हेमध्ये शाहिन बागच्या आंदोलकांवर दिल्लीकर नाराज असल्याचं पुढं आलं होत. त्यामुळे मिशन शाहिन बाग या मुद्यावर फोकस करण्याचं भाजपने ठरवलं. भाजपने सर्व प्रचारकांना या संदर्भात एक ब्रिफींग दिली आणि प्रचाराचा भाग नसलेले हे मुद्दे हळूहळू दिल्लीकरांच्या पुढे येऊ लागले.

दहशतवादी केजरीवाल

माहिती आणि प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी दिल्लीच्या मुख्यमंत्र्यांना थेट दहशतवाद्याची उपमा दिली. अरविंद केजरीवाल दहशतवादी असल्याचे सर्व पुरावे आहेत असंही ते म्हणाले. आतापर्यंत देशातील एका राज्याच्या मुख्यमंत्र्याला केंद्रीय मंत्र्यांनी जबाबदारीने दहशतवादी म्हणण्याचा हा पहिलाच प्रसंग असावा.

भाजप खासदार परवेश सिंह वर्मा एका रॅलीमध्ये गरजले की केजरीवालसारखे दहशतवादी देशात लपून बसले आहेत. आपल्याला विचार करावा लागणार आहे की काश्मीरमध्ये दहशतवाद्यांशी लढावं की केजरीवाल सारख्या दहशतवाद्यांशी.

टार्गेट शाहिनबाग

केंद्रीय अर्थ राज्यमंत्री अनुराग ठाकूर यांनी एका प्रचार सभेत ‘ देश के गद्दारो को.. गोली मारो सालो को.. हा नाराही उपस्थितांकडून वदवून घेतला. देशाची कायदा-सुव्यवस्था, अंतर्गत सुरक्षा ज्यांच्या हातात आहे. ते देशाचे गृहमंत्री अमित शाह यांनी एवढ्या रागाने भाजपसाठी ईव्हीएमचं बटन दाबा की शाहीन बागवाल्यांना करंट लागला पाहीजे, हा सूर आलापला.या चिथावणीतून दोन माथेफिरुंनी आंदोलकांवर गोळीबाराचा प्रयत्न केला.

भाजपच्या प्रवेश सिंह यांनी शाहिन बागच्या आंदोलकांना बलात्कारी, चोर ठरवण्याचा प्रयत्न केला. ते म्हणाले शाहीन बागमध्ये लाखो लोक जमले आहेत. ते तुमच्या घरात घुसतील तुमच्या बायका, मुलींवर बलात्कार करतील, त्यांना ठार मारतील. दिल्लीत भाजपचं सरकार आलं तर दिल्लीत सर्व मशिदी हटवू, एका तासात शाहीन बाग खाली करु. मात्र याच प्रवेश सिंह यांना राष्ट्रपतींच्या अभिभाषणाच्या धन्यवाद प्रस्तावावर पहिले भाषण करण्याचा बहुमान दिला गेला.

बिर्याणी

शाहिन बागवरुन हिंदू- मुस्लीम धृवीकरण करण्याचे सर्व आवश्यक प्रयत्न भाजपने केले. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी अरविंद केजरीवाल यांच्या पक्षावर शाहिन बागच्या आंदोलकांना बिर्याणी पुरवण्याचा आरोप लावला.

भाजपचे आयटी सेल प्रमुख अमित मालवीय यांनी पुरावे म्हणून शाहिन बागचे आंदोलक बिर्याणी खात असल्याचे फोटोही सोशल मीडियावर टाकले. भाजपने बिर्याणीवरुन मतदान प्रभावीत कऱण्याचा प्रयत्न केला.

मुंबई दहशतवादी हल्यातील एकमेव जिवंत आरोपी अजमल कसाब बिर्याणीची मागणी करतोय असं या खटल्यातील विशेष वकील उज्वल निकम यांनी म्हटलं होतं. त्यानंतर बिर्याणी म्हणजे दहशतवादी किंवा मुस्लीम असं समीकरण निर्माण झालं. महत्वाचं म्हणजे कसाबने कधीही बिर्याणीची मागणी केली नव्हती किंवा सरकारने त्याला बिर्याणी पुरवली नव्हती, असं खुद्द निकम यांनी खुद्द कबूल केलं.

प्रचाराचा अंतिम टप्पा आणि संसद

दिल्ली निवडणुका डोळ्यासमोर ठेवून संसदेत रामजन्मभूमी मंदिर बांधण्यासाठी ट्रस्टची घोषणा करण्यात आली. संसदेतही शाहिन बाग आंदोलकांना टार्गेट करण्यासाठी भाजप खासदारांनी प्रक्षोभक भाषणे केली.

प्रचाराच्या अंतिम टप्प्यात खुद्द पंतप्रधानांनी शाहिन बागमधील आंदोलनावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. नरेंद्र मोदी यांनी दोन प्रचार सभा घेतल्या. देशाची शांतता बिघडवण्याचा प्रयत्न असल्याचं विधान पंतप्रधानांनी केलं.

राष्ट्रवाद, पाकिस्तान मुद्दे कायम

मात्र दिल्लीत एवढी ताकद झोकूनही अरविंद केजरीवाल यांच्या ‘आप’ने शानदार प्रदर्शन केलं आहे. विकास विरुध्द राष्ट्रवाद या प्रचाराच्या लढाईत सध्यातरी विकासाचे मुद्दे राष्ट्रवादावर वरचढ ठरलेत असं म्हणता येईल. मात्र कायम राज्यांच्या निवडणुकीत राष्ट्रवाद, पाकिस्तान उपस्थित करुन भाजप एकापाठोपाठ एक राज्य गमावत चाललंय. मग पुढे काय, हा मोठा प्रश्न भाजपपुढं आहे.

मात्र प्रखर राष्ट्रवाद आणि पाकिस्तानच्या मुद्द्यावर केंद्रात जिंकणारा भाजप भविष्यातही या मुद्यावरुन मागे हटणार नाही असंच चित्र आहे. रामजन्मभूमीचा मुद्दा संपला आहे. मात्र तिहेरी तलाक, ३७० कलम हटवल्यानंतर आता समान नागरी कायद्याचा मुद्दा भाजपच्या भात्यात शिल्लक आहे. हे कुणी विसरु नये.

भाजप, काँग्रेस दिल्लीतून बेदखल

१९९३ मध्ये भाजपने पहिल्यांदा दिल्लीत सरकार बनवलं. दिवंगत मदन लाल खुराना यांना दिल्लीचे मुख्यमंत्री नेमण्यात आलं. मात्र १९९६ मध्ये खुराणा यांना बदलवून साहिब सिंह वर्मा यांना मुख्यमंत्रीपदावर बसवण्यात आलं. त्यानंतर शेवटच्या ५२ दिवसासाठी सुषमा स्वराज यांना मुख्यमंत्री करण्यात आलं.

भाजपने घातलेल्या या गोंधळानंतर काँग्रेसने शिला दिक्षित यांच्या नेतृत्वात दिल्लीत सातत्यानं तिनदा सत्ता मिळवली.त्यानंतर अरविंद केजरीवाल यांच्या ‘आप’ पक्षाचा उदय झाला. आणि काँग्रेस आणि भाजप दिल्लीच्या राजकारणातून बाहेर फेकले गेले. भाजपने यावेळीसुध्दा एक अंकी संख्या गाठता आली आहे. मात्र तीन वेळा दिल्लीत सत्तेमध्ये राहिलेल्या काँग्रेसला यावेळीसुध्दा खात उघडता आलं नाही.

Updated : 11 Feb 2020 7:40 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top