Home > News Update > “जवानांना विनाशस्त्र धोक्याच्या दिशेने कोणी आणि का पाठवलं? यासाठी जबाबदार कोण?’’ राहुल गांधी

“जवानांना विनाशस्त्र धोक्याच्या दिशेने कोणी आणि का पाठवलं? यासाठी जबाबदार कोण?’’ राहुल गांधी

“जवानांना विनाशस्त्र धोक्याच्या दिशेने कोणी आणि का पाठवलं? यासाठी जबाबदार कोण?’’ राहुल गांधी
X

लडाखमधील गलवान खोऱ्यात (Galvan Valley) भारत आणि चीन यांच्यात झालेल्या बाचाबाचीत भारताचे 20 जवान शहीद झाल्यानंतर चीनविरोधात देशात संताप व्यक्त केला जात आहे. यावर कॉंग्रेस नेते राहुल गांधी यांनी आक्रमक भूमिका घेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर सातत्याने प्रश्नांचा भाडीमार करत आहेत.

राहुल यांनी 18 सेकंदाचा व्हिडीओ ट्विटर वर पोस्ट केला आहे. या व्हिडीओ मध्ये राहुल यांनी “चीनने भारताच्या विनाशस्त्र जवानांची हत्या करुन खूप मोठा गुन्हा केला आहे. मला विचारायचं आहे की, शहीद झालेल्या आपल्या जवानांना विनाशस्त्र धोक्याच्या दिशेने कोणी आणि का पाठवलं? यासाठी जबाबदार कोण?”.

असा सवाल आता राहुल यांनी उपस्थित केला आहे.

या अगोदरही राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका केली होती.

“पंतप्रधान का शांत आहेत?, ते का लपवत आहेत? आता हे पुरे झालं. काय घडलं हे आम्हाला जाणून घ्यायचं आहे. आपल्या सैनिकांना मारण्याची चीनची हिंमत कशी झाली? आपला भूभाग घेण्याची त्यांनी हिंमत कशी केली?,” असे प्रश्न राहुल गांधी यांनी उपस्थित केले होते.

या संदर्भात भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने दिलेल्या प्रतिक्रियेत भारत आपल्या हद्दीत कोणताही निर्णय घेण्यास आणि राबवण्यास स्वतंत्र आहे, चीनने याचे भान ठेवावे आणि हद्दीचे उल्लंघन टाळावे अशी प्रतिक्रिया दिली आहे.

या सर्व घडामोडीनंतर देशाची राजधानी दिल्लीत मोठ्या हालचालीला सुरुवात झाली आहे. संरक्षणाशी संबंधित मुद्यांवर चर्चेसाठी संरक्षणमंत्री राजनाथ सिंह आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेऊन चर्चा केली होती. दिल्लीमध्ये मोठ्या प्रमाणात बैठका सुरु असून चीन ला आता भारत कसं उत्तर देणार याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे.

दरम्यान हे वृत्त आल्यानंतर 17 जून ला संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांच्या दिल्लीतील निवासस्थानी बैठका सुरु आहेत. या बैठकीला परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर तसेच चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ जनरल बिपिन रावत (Chief of Defence Staff Bipin Rawat), लष्करप्रमुख जनरल मनोज मुकुंद नरवणे (Army chief General Manoj Mukund Naravane), नौदलप्रमुख अॅडमिरल करमबिरसिंह (Navy chief Admiral Karambir Singh) आणि हवाई दलाचे प्रमुख एअर चीफ मार्शल राकेश कुमार सिंह भदुरिया (Air chief marshal Rakesh Kumar Singh Bhadauria) उपस्थित होते.

गलवान खोऱ्यात काय घडतंय?

गलवान खोऱ्याच्या सीमेवर चीनी सैन्याने टेंट उभारले आहेत. त्यामुळे भारतीय लष्करानं या ठिकाणी सैन्य दल वाढवले आहे. असं भारतीय अधिकाऱ्यांनी सांगितलं आहे. भारताकडूनच गलवान खोऱ्यात बेकायदा हालचाली सुरू असल्याचा दावा चीननं केला आहे.

गलवान खोऱ्याचे महत्त्व काय?

गलवान खोऱ्याचा परिसर पाकिस्तान, चीनच्या शिनजियांग प्रांताला तसंच लडाखच्या सीमेला लागून आहे. 1962 च्या युद्धातही गलवान खोरे युद्धाचे प्रमुख केंद्र होता. त्यामुळं या भागाचं महत्त्व अधिक आहे. गलवान खोरे लडाख आणि अक्साई चीनच्या मधोमध भारत-चीन सीमेच्या जवळ आहे. अक्साई चीनवर भारत आणि चीन दोघंही आत्तापर्यंत दावा करत आलेले आहेत.

1975 नंतर पहिल्यांदाचं घडली अशी घटना... काय घडलं होतं 1975 ला?

1975 ला सीमेवर झालेल्या एका चकमकीत 4 जवान शहीद झाले होते. चीनने भारतात घुसखोरी करुन गोळीबार केला होता. त्यानंतर दोन्ही देशांमध्ये झालेल्या चर्चेमध्ये दोन्ही देशांमध्ये तणाव निर्माण झाला तरी एकमेकांवर गोळीबार करुन शस्त्रसंधीचे उल्लंघन करायचे नाही. असं ठरवण्यात आले. त्यानंतर आज हाती आलेल्या वृत्तानुसार 1975 नंतर सर्वाधिक जवान शहीद झाले आहेत. ४५ वर्षांच्या इतिहासात चिनी सीमेवर इतकी मोठी घटना घडली आहे.

जागतिक पातळीवर काय घडतंय?

भारत आणि चीन दरम्यान पुन्हा एकदा मोठा तणाव निर्माण झाला असताना जागतिक पातळीवर चीनविरोधात रणनीती तयार करण्यासाठी हालचाली सुरू झाल्या आहेत. युरोपीय महासंघ आणि अमेरिका यांनी आता एकत्र येऊन चीनचे आक्रमक धोरण आणि मनसुबे हाणून पाडण्यासाठी रणनीती आखण्याचे आवाहन युरोपीय महासंघाचे प्रमुख अधिकारी जोसेफ बोरेल यांनी केले आहे.

"आपली मूल्य आणि हित जपण्यासाठी एकत्र येण्याची गरज आहे" असे त्यांनी युरोपीय युनियनचे परराष्ट्रमंत्री आणि अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री माईक पॉम्पिओ यांच्यात व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे झालेल्या बैठकीत म्हटले आहे. उर्वरित आशियाशी चांगले संबंध राहतील आणि चीनविरोधात कडक भूमिका घेता येईल असे एक ठोस धोरण तयार करण्याचे आवाहन त्यांनी केले आहे.

हे ही वाचा

साने गुरुजींची आत्महत्त्या फक्त हारजीत या मोजपट्टीत बसवता येईल का?: प्रा. हरी नरके

२४ तासात कोरोनाबाधीत रुग्णांच्या संख्येचा उच्चांक

“20 जवानांचे बलिदान वाया जाऊ द्यायचे का?”

दरम्यान अमेरिकेने यावर कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. तर जर्मनीचे परराष्ट्र मंत्री हाय मास यांनी चीनने जागतिक पातळीवर पारदर्शकतेचे पालन केले पाहिजे असे म्हटले आहे. यावेळी त्यांनी चीनकडून कोरोनाबाबत सुरूवातीच्या टप्प्यात माहिती लपवली गेल्याचाही उल्लेख केला.

Updated : 18 Jun 2020 1:40 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top