मुंबईत कोणाला नकोय मराठी भाषा भवन?

ज्या भाषेसाठी महाराष्ट्र राज्याची निर्मिती झाली त्या मराठी भाषेसाठीच्या भवनाला हक्काच्या जागेसाठी झगडावं लागतंय. मराठी भाषेचं भवन मुंबईमध्ये होणं अपेक्षित असताना सरकारनं मुंबईजवळच्या ऐरोलीत मराठी भाषेचं उपकेंद्र सुरु करण्याचा निर्णय घेतलाय.
राज्यात 2010 साली मराठी विभाग सुरु झाला. तेव्हा मराठी भाषेसाठी काम करणारे साहित्य संस्कृती मंडळ, विश्वकोष निर्मिती मंडळ, राज्य मराठी विकास संस्था, भाषा संचालनालय यासोबतच मराठीसाठी काम करणाऱ्या सर्व संस्थांची कार्यालय एकाच ठिकाणी असावीत अशी मागणी करण्यात आली. यासाठी मुंबईतल्या मेट्रो सिनेमाजवळ असलेल्या रंगभवन धोबीतलाव या जागेची निवड करण्यात आली होती. परंतू ही जागा पुरातत्व विभागाच्या अखत्यारित येत असल्याचा अहवाल विभागानं दिल्यानंतर या जागेचा विचार बंद झाला.
मात्र, मराठीसाठी काम करणाऱ्या अनेक संस्थांनी मराठी भाषा भवन याच जागेवर झालं पाहिजे यासाठी लढा सुरु ठेवला आणि अनेक वर्ष पाठपुरावा केला. यासाठी एका शिष्टमंडळानं 24 जुलै रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली.
या भेटीत रंगभवनच्या जागेचा हेरिटेजचा प्रश्न निकाली काढण्यासाठी संबंधित विभागाला तात्काळ निर्देश देण्यात येतील असं अश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिलं होतं. त्यानंतर 6 जुलै रोजी मराठी भाषा विभागानं मुंबईजवळच्या ऐरोली इथं उपकेंद्र सुरु करण्याबाबत शासन निर्णय काढला आणि त्यासाठी यंदाच्या अर्थसंकल्पातून आर्थिक तरतुदही करण्यात आली.
त्यामुळं मुख्यमंत्र्यांनी अश्वासन दिलेलं असतानाही अशा प्रकारचा शासननिर्णय का काढला गेला? याचाच अर्थ मराठी भाषा विभाग मुख्यमंत्र्यांचं ऐकत नाही का असा सवाल मराठी अभ्यास केंद्राचे डॉ. दिपक पवार यांनी उपस्थित केलाय.