या नागरिकांच्या जीवाची पर्वा आहे कुणाला?

371

देशाची आर्थिक राजधानी मुंबई..पण याच मुंबईतील चुनाभट्टीमध्ये रोज हजारो नागरिकांना आपला जीव धोक्यात घालावा लागतोय, त्याला कारण आहे रेल्वे प्रशासन, मुंबई महापालिका आणि एमएमआरडीए यांच्यातील समन्वयाचा अभाव, पाहूया मॅक्स महाराष्ट्रचे प्रतिनिधी प्रसन्नजीत जाधव यांचा ग्राऊंड रिपोर्ट….

चुनाभट्टी इथे पूर्व आणि पश्चिमेला जाण्यासाठी उड्डाणपूल नसल्याने स्टेशनपासून जवळच असलेल्या रेल्वे फाटकाचा लोकांना एकमेव पर्याय आहे. पण लोकलची ये-जा असल्याने बहुतांश वेळा हे फाटक बंद असते. त्यामुळे हजारो वाहनांना इथं खोळंबून रहावे लागते. तर वेळ वाचवण्यासाठी अनेक लोक हे गेट बंद असतानाही पायी ट्रॅक क्रॉस करण्याचा प्रयत्न करतात. त्यामुळे दर महिन्याला इथं किमान १ ते २ अपघात होत असतात आणि त्यात काहींना प्राणही गमावले असल्याचे इथले स्थानिक नागरिक सांगतात.

उड्डाणपुलाचे काम 2008 पासून प्रलंबित असल्यामुळे स्थानिक नागरिकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागतोय. या ठिकाणी सकाळी एक तास आणि संध्याकाळी एक तास रेल्वे फाटक बंद असल्यामुळे एखाद्या पेशंटला घेऊन जाणाऱ्या एम्बुलन्सला किंवा वाहनांना मोठा वळसा घालून जावे लागते. या रेल्वे फाटकच्या अडचणीमुळे लोकांना ऑफिसमध्ये लवकर पोहचता येत नाही. गेल्या अनेक वर्षांपासून सरकारी अधिकारी येतात, उड्डाणपूल, पादचारी पुलाच्या कामाला सुरुवात करण्यापूर्वी रस्त्याचे मोजमाप घेतात. पण प्रत्यक्षात पूल होत नसल्याने नागरिकांमध्ये संतापाचं वातावरण आहे.

यासंदर्भात मॅक्स महाराष्ट्रने जेव्हा रेल्वे प्रशासनाला संपर्क साधला तेव्हा 2008 सालीत रेल्वे प्रशासनाने महानगर पालिकेला त्या ठिकाणी उड्डाणपूल बनण्यास ना हरकत प्रमाणपत्र दिल्याचा दावा केला. त्यानंतर महापालिकेला संपर्क साधला तर या ठिकाणी रस्त्याच्या दोन्ही बाजूला अतिक्रमणं असल्यामुळे महानगर पालिका पूल बनवू शकलेली नाही असं अधिकाऱ्यांनी सांगितले. याउलट महानगरपालिकेने एमएमआरडीएकडे उड्डाणपूल बांधण्याचा प्रस्ताव पाठवलेला आहे, अशी माहिती महानगर पालिका पूल विभागाने दिली आहे. आम्ही मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण म्हणजेच MMRDA कडे यासंदर्भात बी.जी.पवार (सहायक महानगर आयुक्त) यांना बेटून विचारणा केली तेव्हा महानगर पालिकेने चुनाभट्टीतील उड्डाणपूलासंदर्भात आम्हाला डेव्हलोपमेंट प्लॅन दिलेला नाही त्यामुळे तेथील उडाणपुलाचे काम रखडलेले आहे, अशी माहिती त्यांनी दिली आहे.

एकूणच काय तर सरकारी यंत्रणांच्या टोलवाटोलवीमुळे आज अनेक निष्पाप नागरिकांना विनाकारण आपला जीव गमवावा लागतोय. तर रोज हजारो लोकांचा वेळ रेल्वे फाटक उघडण्याची वाट पाहण्यात जातोय.