Home > News Update > 'ठाकरे' सरकार, फडणवीसांची तक्रार

'ठाकरे' सरकार, फडणवीसांची तक्रार

ठाकरे सरकार, फडणवीसांची तक्रार
X

राज्यात महाविकास आघाडीचं सरकार आता स्थिर होतंय. पण मुख्यमंत्रीपद गेल्यानंतर अस्वस्थ झालेले देवेंद्र फडणवीस हे विवीध मुद्यांवरुन आक्रमकपणे ठाकरे सरकारची कोंडी करण्याचा प्रयत्न करताहेत. काँग्रेस, राष्ट्रवादीच्या नेत्यांना टार्गेट न करता फडणवीस यांच्या टिकेचा रोख शिवसेनेवर असल्याचं स्पष्ट दिसतेय.

दुसरीकडे संजय राऊत यांना लक्ष्य करुन शिवसेनेतील नाराज मंडळी आणि कडव्या हिंदुत्ववादी नेत्यांच्या भावनांना हात घालण्याची स्टॅटेजीसुध्दा फडणवीस यांच्या विधानातून दिसून येते. राज्यात सत्ता गमावल्यानंतर फडणवीस यांनाही पक्षाअंतर्गत नाराजीचा सामना करावा लागतोय. त्यामुळे सत्ताधाऱ्यांवर अधिक आक्रमकपणे टिका करण्याची चढाओढही या टिकेवरुन दिसून येते. देवेंद्र फडणवीस यांनी जानेवारी महिन्यात सरकारविरोधात काय काय तक्रारी केल्या, टीका केलीये आणि याची पार्श्वभूमी काय, या सर्वांचा आढावा घेणारा हा स्पेशल रिपोर्ट..

दिनांक- 23 जानेवारी

देवेंद्र फडणवीस- राज्य सरकारने प्रसिध्द केलेल्य़ा जाहिरातील सुप्रीम कोर्टाच्या निर्देशानुसार पंतप्रधानांचे छायाचित्र प्रकाशित करावे.

पार्श्वभूमी- महाराष्ट्रात सत्ता परिवर्तन झाल्यापासून राज्य शासनाकडून प्रकाशित केल्या जाणाऱ्या शासकीय जाहिरातींमध्ये पंतप्रधानांचा फोटो वगळला जातोय.

दिनांक- २० जानेवारी

देवेंद्र फडणवीस- २०१४मध्ये काँग्रेससोबत सत्ता स्थापन करण्याच्या प्रयत्नासंदर्भात शिवसेनेनं खुलासा करावा

पार्श्वभूमी - २०१४ मध्ये शिवसेनेनं भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी काँग्रेसकडे पाठिंबा मागितला होता, असा गौप्यस्फोट पृथ्वीराज चव्हाण यांनी केला होता.

१६ जानेवारी

देवेंद्र फडणवीस- इंदिरा गांधींसारख्या सर्वोच्च नेत्यावर आरोप होऊनही काँग्रेस शांत का?

पार्श्वभूमी – खासदार संजय राऊत यांनी एका मुलाखती दरम्यान दिवंगत पंतप्रधान इंदिरा गांधी या अंडरवर्ल्ड डॉन करीम लाला याला भेटण्यासाठी मुंबईत यायच्या असा दावा केला होता. मात्र वाद झाल्यावर खासदार संजय राऊत यांनी हे विधान मागे घेतलं.

१७ जानेवारी

देवेंद्र फडणवीस- अभिनेते योगेश सोमण यांच्यावर आकसातून करण्यात आलेली कारवाई मुख्यमंत्र्यांनी मागे घ्यावी.

पार्श्वभूमी - मुंबई विद्यापीठातील थिएटर ऑफ आर्टसचे संचालक अभिनेते योगेश सोमण यांच्यावर ठाकरे सरकारने निलंबनाची कारवाई केली आहे. ४ डिसेंबरला फेसबुक पोस्टमधून सोमण यांनी राहुल गांधी आणि दिवंगत पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्यावर टका केली होती.

१६ जानेवारी

देवेंद्र फडणवीस- शिवाजी महाराजांच्या वंशजाचा अपमान सहन करणार नाही. संजय राऊत यांनी माफी मागावी.

पार्श्वभूमी – खासदार संजय राऊत यांनी शिवाजी महाराजांचे थेट वंशज असल्याचा पुरावे उदयनराजे यांनी उपलब्ध करुन द्यावे असं विधान केलं होत. मात्र संजय राऊत यांच्या विधानाचं राष्ट्रवादी काँग्रेसने समर्थन केलं.

१६ जानेवारी

देवेंद्र फडणवीस- गुन्हेगारी पार्श्वभूमीचे नगरसेवक मुन्ना यादव यांना जनतेनं तीन वेळा नगरसेवक म्हणून निवडून दिलं.

पार्श्वभूमी- फडणवीसांनी मुन्ना यादवसारख्या गुंडाची महामंडळावर नियुक्ती करून त्याला संरक्षण दिलं होतं. त्यामुळे राजकारणातल्या गुन्हेगारीबाबत बोलू नये, असा आरोप महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी केला होता.

१५ जानेवारी

देवेंद्र फडणवीस- तान्हाजी’ चित्रपट करमुक्त करण्याची मागणी, मुख्यमंत्र्यांना पाठवलं पत्र

पार्श्वभूमी- दीपीका पादुकोण जेएनयूच्या जखमी विद्यार्थ्यांना पाठींबा देण्यासाठी विद्यापीठात गेल्यानंतर भाजप समर्थक संघटनांनी दीपीकाच्या ‘छपाक’ या चित्रपटाला विरोध केला. त्यानंतर उत्तर प्रदेश सरकारने ‘तान्हाजी’ चित्रपटाला करमुक्त केलं. त्यानंतर तान्हाजी चित्रपट करमुक्त करण्याची भाजप नेत्यांनी मागणी केली होती.

१० जानेवारी

देवेंद्र फडणवीस- जेएनयूमध्ये झालेल्या हिसांचाराच्या पाठीमागे डाव्या संघटना

पार्श्वभूमी – जेएनयू परिसरात हिसांचार झाल्यानंतर, तीन दिवसानंतर दिल्ली पोलिसांनी घाईघाईने पत्रकारपरिषद घेतली. त्यामध्ये जखमी झालेल्या आयशी घोषवर गुन्हे दाखल केले. त्यानंतर भाजप नेत्यांनी leftbehindviolence हा हॅश टॅग वापरुन डाव्या संघटनांवर आरोप केले होते.

९ जानेवारी

देवेंद्र फडणवीस- जिल्हा परिषद निवडणुकीत भाजपच राज्यातला सर्वात मोठा पक्ष ठरलाय.

पार्श्वभूमी – राज्यातल्या ६ जिल्हा परिषद निवडणुकांचे निकाल लागल्यानंतर फडणवीसांनी हे विधानं केलं होतं. या निवडणुकांमध्ये भाजपने नागपूरात सत्ता गमावली. तर वाशिम, अकोल्यात पक्ष मागे फेकला गेला. पण धुळे, नंदुरबारमध्ये भाजपने चांगली कामगिरी केलीये.

६ जानेवारी

देवेंद्र फडणवीस- मंत्रालयापासून अवघ्या २ किलोमीटर अंतरावर फ्री काश्मीरच्या घोषणा दिल्या जाताहेत. मुख्यमंत्र्यांच्या नाकावर टिच्चून देशविरोधी कारवाया सुरु आहेत.

पार्श्वभूमी- CAA आणि NRC कायद्याविरोधात मुंबईतल्या गेट वे ऑफ इंडियासमोर आंदोलन झालं होतं. या आंदोलनादरम्यान महक मिर्झा प्रभू नावाच्या एका मराठी मुलींन फ्री काश्मीर हा फलक झळकावला होता. काश्मीरची इंटरनेटबंदीतून मुक्तता करावी असा हेतू असल्याचं स्पष्टीकरण या मुलीने दिलं होतं.

४ जानेवारी

देवेंद्र फडणवीस- सत्तेसाठी शिवसेना कितीवेळा सावरकरांचा अपमान सहन करणार?

पार्श्वभूमी- दिल्लीच्या रामलीला मैदानावर सुधारीत नागरिकत्व कायद्याविरोधात झालेल्या रॅलीत, माफी मागायला माझं नाव राहुल सावरकर नाही, मी राहूल गांधी आहे अस विधान राहुल गांधी यांनी केलं होत.

४ जानेवारी

देवेंद्र फडणवीस- एक आठवडा झाला तरी खातेवाटप होत नाही. एका मंत्र्याने राजीनामा दिला. सरकार कोसळण्याची ही सुरुवात आहे.

पार्श्वभूमी- मंत्रिमंडळाचा विस्तार झाल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी आठवड्यानंतर खातेवाटप जाहीर केलं होतं. या दरम्यान राज्यमंत्रीपदाची शपथ घेतलेले अब्दुल सत्तार यांनी मंत्रीपदाचा राजीनामा दिल्याचं वृत्त आलं होतं. मात्र आपण राजीनामा दिलाच नव्हता असा खुलासा त्यांनी नंतर केला होता.

३ जानेवारी

देवेंद्र फडणवीस- सावरकर यांच्यावरील काँग्रेसने काढलेल्या पुस्तकाचा निषेध. मुख्यमंत्र्यांनी पुस्तकावर बंदीची घोषणा करावी

पार्श्वभूमी- मध्यप्रदेशमध्ये सावकरांची बदनामी करणारी पुस्तिका सेवा दलाच्या सदस्यांना वाटण्यात आली. यामध्ये सावकरांबद्दल आक्षेपार्ह लिखाण केलं होतं.

२ जानेवारी

देवेंद्र फडणवीस- तीन पक्ष एकत्र आले तरी भाजपला पराभूत करु शकत नाही. जनता भाजपसोबत आहे.

पार्श्वभूमी- नागपूर जिल्ह्यातील डिगडोह इथं जिल्हा परिषद निवडणूक प्रचारसभेला संबोधित करतांना फडणवीस यांनी हे विधान केलं होतं. प्रत्यक्षात निकालात नागपूर जिल्हा परिषदेत भाजपला सत्ता गमावावी लागली आहे.

Updated : 23 Jan 2020 1:57 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top