पेढे, बर्फी खाणाऱ्या शिर्डीतल्या कुत्र्यांची ‘कुत्र्या’गत अवस्था

शिर्डीतील कुत्र्यांना (श्वानांना )… कधी गावरान तुपातील बुंदी.. कधी महागडी बर्फी, मिठाई, मलई पेढे दूध…., मसालादुध, ड्रायफ्रुट .. पिझ्झा… भारी.. भारी.. बिस्किटे असे एक ना अनेक स्वादिष्ट दर्जेदार मिष्ठान्न व खाद्यपदार्थ तासातासाला मिळत असतात. मात्र, लॉकडाऊन मध्ये मलई, पेढे दररोज खाणाऱ्या श्वानांना कोरोनाच्या लॉकडाऊन मध्ये सोयीची साधी भाकरीही मिळणे कठीण झाले आहे.

साईभक्तांच्या दातृत्वाने अगदी ऐश आरामात भूक भागविणाऱ्या श्वानांची मात्र, खायची मोठी दैना आबळ झाली आहे. सशक्त सुदृढ कुत्रे आता कुपोषीत वाटू लागली आहे. कुठलेही कष्ट न करता.. बसल्या जागी परावलंबीपणाने भारी भारी खाद्यपदार्थ खाणाऱ्या या श्वानांची दारोदार भटकून स्वावलंबी पणाने पोट भरण्याची लढाई लॉकडाऊनने मोठी अवघड करून ठेवली आहे.

एरवी भाकरीकडे ढुंकूनही न बघणारे कुत्रे आता मात्र, भाकरी शोधत फिरत आहेत. कोरोनाचा मुक्या प्राण्यांवर होत आहे. मात्र, हे दुर्दैव म्हणावे लागेल…

शिर्डीतील कुत्र्यांची (श्वानांची) तऱ्हाच न्यारी असं म्हटलं तर वावगं ठरू नये…! जिथे ग्रामीण अथवा शहरी भागात पाळीव वगळता इतर कुत्र्यांना शिळ्या भाकरीचा तुकडाही मिळणे कठीण असतो. तुकड्यासाठी दारोदार भटकंती करावी लागते. अनेकदा हाड.. हाड… म्हणून तसेच काठी अथवा दगड मारुन… त्या श्वानांना घरासमोरून हुसकावून लावले जाते.

तेव्हा रस्त्यावर पडलेले अथवा जे मिळेल ते अन्न खाऊन हे श्वान आपली भूक भागवतात. मात्र, शिर्डी नगरीतील श्वानांची जगण्याची शैली व कथा वेगळीच आहे. साईभक्तांच्या मदतीवर रोज राजेशाही थाटात खाणार्‍या या श्वानांना आता मिठाई मिळणे. दूरच साधी भाकरी मिळणेही अवघड झाले आहे.

साईबाबांचा प्राणीमात्रावर सुद्धा विशेष जिव्हाळा व प्रेम होते. साईबाबा प्राण्यांना नित्यनियमाने खायला देत. साईबाबांच्या शिकवणूकीचा धागा पकडून साईभक्त सुद्धा श्रद्धेपोटी शिर्डीत द्वारकामाई व साईबाबा मंदिर परिसरातील श्वानांना अतिशय प्रेमाने वागवतात.

या श्वानांच्या सेवेत साईभक्ती मानतात. साईदर्शन प्रसंगी महागडी मिठाई मसाला दूध, भारी भारी बिस्किटे, खास मलई पेढे, बर्फी शुद्ध गावरान तुपातील बुंदी, पिझ्झा ड्रायफ्रुट्स श्वानांना खाण्यासाठी देतात. माणसालाही खाण्याचा मोह आवरणार नाही. असे भारी भारी पदार्थ येथील श्वानांना मिळायचे. त्यामुळे मंदिर परिसरातील श्वान भारदस्त अतिशय सुदृढ व सशक्त दिसायचे मंदिर परिसर सोडून खाण्यासाठी त्यांना इतरत्र भटकण्याची गरज भासत नसे.

भक्तांकडून मिळणारे वेगवेगळे पदार्थ खाऊन पोट हाऊसफुल्ल झाल्यावर अनेक श्वान फक्त भक्तांनी दिलेल्या पदार्थाला तोंड लावून अथवा त्याची थोडीशी चव घेऊन त्याकडे नाक मुरडायचे व पदार्थ तसाच ठेवायचे.

कोरोनाच्या लॉकडाऊन मध्ये धार्मिक तीर्थक्षेत्रे बंद असल्यानं शिर्डीत साईमंदिर सुद्धा बंद असल्याने साईभक्त शिर्डीत येत नाहीत. परिणामी साईभक्ताकडून मिळणारा नैवेद्य म्हणा अथवा प्रसादरूपी आहार श्वानांसाठी पारखा झाला आहे. गेले महिनाभरापासून या कुत्र्यांना ना पेढे ना मलई बर्फी अथवा भारी भारी खाद्यपदार्थ खायला न मिळाल्याने मिळेल ते अन्नपदार्थ खावे लागत असल्याने त्यांची अवस्था दुधाची तहान ताकावर भागविण्यासारखीच झाली आहे.