Home > News Update > पप्पा परत या! शालेय निबंधातून चौथीच्या मुलाची दिवंगत वडिलांना हाक..

पप्पा परत या! शालेय निबंधातून चौथीच्या मुलाची दिवंगत वडिलांना हाक..

पप्पा परत या! शालेय निबंधातून चौथीच्या मुलाची दिवंगत वडिलांना हाक..
X

आई या विषयावरचे अनेक निबंध आपण नेहमी वाचतो....पण बीड जिल्ह्यातल्या चौथीमध्ये शिकणाऱ्या एका मुलानं आपल्या दिवंगत वडिलांना परत बोलवणारं पत्र सध्या व्हायरल झालंय, पाहूया मॅक्स महाराष्ट्रचे प्रतिनिधी विनोद जिरे यांचा विशेष रिपोर्ट...

मन हेलावून सोडणारा शालेय विद्यार्थ्याचा निबंध सोशल मीडियावरून व्हायरल झाल्यानं मुलांच्या मनात आईबरोबरच वडिलांचं असणं किती महत्वाचं असतं हे पुन्हा सिद्ध झालंय. शालेय शिक्षण घेणाऱ्या एका दहा वर्षीय विद्यार्थ्याने 'माझे पप्पा' या निबंधातून आपल्या घरातील आर्थिक विवंचना व घरातला कर्ता पुरुष नसल्यानं आलेली हलाखीची परिस्थिती स्पष्ट केली आहे. पत्रात, विद्यार्थ्याने आपल्या हयात नसलेल्या पित्याने घरी परत यावे, असे नमूद केले आहे. त्यामुळे, मुलाचे नाही तर हा निबंध वाचणाऱ्यांचे डोळे पाणावतायत...

चौथीच्या वर्गात शिकणाऱ्या मंगेश वाळकेचे वडील आजारपणामुळे नुकतेच मृत्यू पावले आहेत. मंगेशने लिहिलेल्या निबंधात कुटुंबाची आर्थिक विवंचना आणि घरातला मुख्य माणूस गेल्यानं येणारं नैराश्य दिसतंय. एवढंच नाही तर 'पप्पा तुम्ही परत या' असं भावनिक आवाहनही मंगेशने त्या पत्राच्या शेवटी केले आहे. मंगेश हा बीड जिल्ह्यातील आष्टी तालुक्यातील वाळकेवाडी येथील जिल्हा परिषदेच्या शाळेत शिकतो. त्याने 'माझे पप्पा' या विषयावर निबंध लिहिला आणि त्याच्या कोवळ्या मनाच्या वेदना आणि नितळ भावना कागदावर उमटल्या. ते वाचून त्याच्या शिक्षिका भावनिक झाल्या आणि त्यांनी व्हाट्सअॅप ग्रुपवर शेअर केल्याची चर्चा आहे.

मंगेशने लिहिलेले पत्र सोशल मीडियावर व्हायरल झाले. त्यानंतर त्याच्या कुटुंबीयांची व त्याची खरी माहिती शोधण्याचा प्रयत्न केला असता, अत्यंत विदारक परिस्थिती समोर आली. त्याची आई देखील अपंग आहे. त्यामुळे मंगेश घरातील सर्वच कामात आईला मदत करून शिक्षण घेत असल्याचे समजले. त्यांची आर्थिक परिस्थिती अत्यंत बिकट आहे. मंगेशला वडील नसल्याचे दुःख तर आहेच, पण त्याहूनही भयंकर म्हणजे आर्थिक संकट. त्यातही आई अपंग आणि इयत्ता चौथीत शिकणाऱ्या लेकराचे वय अवघे १० वर्षे. ज्या वयात मुले मजा-मस्ती करतात त्या वयात मंगेशवर घराची जबाबदारी आली.

सध्या मंगेशची आई शारदा वाळके या मोलमजुरी करून मंगेशचे शिक्षण करत आहेत. भविष्यात मंगेशने आपल्या वडिलांचे स्वप्न पूर्ण करावे, मोठा साहेब व्हावे, हीच त्यांचीदेखील अपेक्षा आहे. मात्र, मोलमजुरी करून जगायची वेळ आल्यानं या कुटुंबासमोर मंगेशच्या शिक्षणाचा प्रश्न निर्माण झाला आहे..सोशल माडियाच्या गैरवापराचा मुद्दा कायम चर्चेत येतो, पण सोशल मीडियामुळे समाजातील अशा कथा आणि संघर्षही समाजासमोर येतात, आता कदाचित यातूनच मंगेशला मदतीचा हात मिळू शकतो...

Updated : 18 Jan 2020 10:57 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top