Home > News Update > भारत-चीन वादात अमेरिकेची मध्यस्थी? डोनाल्ड ट्रम्प यांचे मोठे वक्तव्य

भारत-चीन वादात अमेरिकेची मध्यस्थी? डोनाल्ड ट्रम्प यांचे मोठे वक्तव्य

भारत-चीन वादात अमेरिकेची मध्यस्थी? डोनाल्ड ट्रम्प यांचे मोठे वक्तव्य
X

भारत आणि चीन दरम्यान सीमेवर निर्माण झालेला तणाव अतिशय गंभीर आहे आणि या संदर्भात अमेरिका दोन्ही देशांना तोडगा काढण्यासाठी मदत करत आहे, असं महत्त्वाचं वक्तव्य अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केलेले आहे. या वादावर तोडगा काढण्यासाठी भारत आणि चीन या दोन्ही देशांशी अमेरिकेचा संवाद सुरू असल्याची माहिती ट्रम्प यांनी दिलेली आहे.

"भारत आणि चीन दरम्यान निर्माण झालेला संघर्ष अतिशय गंभीर वळणावर पोहोचलेला आहे. या दोन्ही देशांमध्ये मोठ्या प्रमाणात तणाव निर्माण झालेला आहे आणि हा तणाव कमी करण्यासाठी अमेरिका चीन आणि भारत या दोन्ही देशांची चर्चा करत आहे" अशी माहिती डोनाल्ड ट्रम्प यांनी पत्रकार परिषदेत दिली.

गलवान खोऱ्यामध्ये भारत आणि चीनच्या सैनिकांमध्ये झालेल्या संघर्षामध्ये भारताचे 20 जवान शहीद झाल्यानंतर मोठ्या प्रमाणात तणाव निर्माण झालेला आहे. या संघर्षात चीनचे सैनिक देखील मारले गेलेले आहेत. पण चीनतर्फे अजून या सैनिकांचा आकडा जाहीर करण्यात आलेला नाही असेही डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटले आहे.

भारत आणि चीन दरम्यान गेल्या महिन्यामध्ये सीमेवर निर्माण झालेल्या वादासंदर्भात मध्यस्थी करण्याची अमेरिकेची तयारी आहे, अशी भूमिका डोनाल्ड ट्रम्प यांनी मांडली होती. पण दोन्ही देशांनी डोनाल्ड ट्रम्प यांचा हा प्रस्ताव फेटाळला होता आणि उभय स्तरावर चर्चा करून हा वाद मिटवण्यात येईल अशी भूमिका घेतली होती. पण त्यानंतर चीनने सीमेवर केलेल्या कृत्यामुळे दोन्ही देशांमध्ये मोठ्या प्रमाणात तणाव वाढलेला आहे.

अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री माईक पॉम्पिओ यांनी शुक्रवारी चीनवर जोरदार टीका केली होती. संपूर्ण युरोपसह जगाला चीनचा धोका आहे असं वक्तव्य त्यांनी केलं होतं. चीनविरोधात एका रणनीतीची गरज देखील त्यांनी व्यक्त केली होती. या सगळ्या पार्श्वभूमीवर डोनाल्ड ट्रम्प यांचे हे वक्तव्य महत्त्वाचं मानले जात आहे.

Updated : 21 Jun 2020 2:14 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top