उद्धव ठाकरे भगतसिंह कोश्यारी यांच्या भेटीला

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज सकाळी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची राजभवन येथे भेट घेऊन महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा दिल्या. यावेळी दोघांमध्ये साधारण २० मिनिटं चर्चा झाली. जरी ही भेट महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा देण्यासाठी होती. असं सांगितलं जात असलं तरी ही भेट राजकीय असल्याचं वेगळं सांगायला नको.

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी महाराष्ट्रात निर्माण झालेला घटनात्मक पेच सोडवण्यासाठी केंद्रीय निवडणूक आयोगाला एक पत्र लिहिलं आहे. या पत्रात महाराष्ट्रातील विधानपरिषदेच्या रिक्त 9 जागांसाठी तात्काळ मतदान घ्यावं अशी विनंती या पत्रात केली आहे.

यावर केंद्रीय निवडणूक आयोग आज 1 मेला व्हिडीओ कॉन्फरन्स द्वारा बैठक घेणार असून या बैठकीत महाराष्ट्रात 9 विधानपरिषदेच्या जागांसाठी निवडणूक घ्यायची अथवा नाही. यावर फैसला होण्याची शक्यता आहे. या चर्चे अगोदर आज उद्धव ठाकरे यांनी भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेतली आहे. त्यामुळं या भेटीला विशेष महत्व प्राप्त झालं आहे.

एकीकडे राज्य कोरोना व्हायरस सारख्या महामारीला तोंड देत आहे. अशा वेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचं पद घटनात्मक पेचात अडकलं आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाने कोरोना व्हायरस चं संकट पाहता देशातील सर्व निवडणूका काही काळासाठी स्थगित केलेल्या आहेत. अशा परिस्थिती महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचं पद घटनात्मक पेचात अडकलं आहे.

कोणत्याही व्यक्तीने मंत्री म्हणून शपथ घेतल्यानंतर त्या मंत्र्यांना 6 महिन्याच्या आत विधानसभा किंवा विधानपरिषदेचं सदस्य व्हावं लागतं. उद्धव ठाकरे यांनी राज्याचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतल्यानंतर 6 महिन्याच्या आत त्यांना विधानसभा आणि विधानपरिषदेचं सदस्य होणं गरजेचं आहे. मात्र, कोरोना व्हायरस चा देशात प्रकोप सुरु असल्यानं राज्यात कोणतीही निवडणूक होणार नाही. अशा परिस्थितीत राज्यात घटनात्मक पेच निर्माण झाला आहे.

यावर मार्ग म्हणून महाविकास आघाडी ने राज्यपाल कोट्यातील रिक्त असलेल्या 2 जागांपैकी एका जागेवर उद्धव ठाकरे यांची निवड करावी. असा ठराव मंत्रीमंडळाच्या बैठकीत दुसऱ्यांदा पार करुन राज्यपालांकडे पाठवला आहे. मात्र, हा ठराव फेटाळल्याची चिन्हं दिसत आहेत. कारण राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी राज्यात रिक्त झालेल्या 9 विधान परिषद जागांसाठी निवडणूक घेण्याची विनंती केंद्रीय निवडणूक आयोगाला केली आहे.

त्यानंतर महाविकास आघाडीच्या नेत्यांनी निवडणूक आयोगाला या संदर्भात तीन वेगवेगळी पत्रं पाठवली आहेत. शिवसेनेच्या वतीने एकनाथ शिंदे, राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने जयंत पाटील आणि काँग्रेसच्या वतीनं बाळासाहेब थोरात यांनी पत्र दिलं आहे. या सर्व पत्रांचा मजकूर जवळ जवळ सारखाच आहे. या तीनही नेत्य़ांनी केंद्रीय निवडणूक आयोगाला 27 तारखेच्या यात निवडणूक प्रक्रिया पूर्ण करण्याची विनंती या पत्राद्वारे केली आहे.

ते या पत्रात म्हणतात…

राज्यात होणाऱ्या ज्या 9 विधानपरिषद जागांच्या निवडणूका पुढं ढकलण्यात आल्या होत्या. त्या घेण्यात याव्यात. आम्ही कोणतीही गोष्ट लपवत आहोत. असं वाटू नये. म्हणून… आम्ही उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रीमंडळाच्या दोन कॅबिनेट बैठकांमध्ये उद्धव ठाकरे यांना राज्यपाल कोट्यातून विधानपरिषदेवर नियुक्त करण्याचे प्रस्ताव राज्यपालांकडे पाठवले आहेत. मात्र, या प्रस्तावावर अद्यापपर्यंत निर्णय घेण्यात आलेला नाही. त्यामुळं घटनात्मक तरतुदींच्या अनुषंगाने उद्धव ठाकरे यांचं निवडून येणं बंधनकारक आहे. नाही तर राज्यात या परिस्थितीत स्थिर असलेलं हे सरकार अनिश्चतेच्या भोवऱ्यामध्ये अडकण्याची शक्यता आहे.

राज्यातील सर्व जनेतेने उद्धव ठाकरे यांच्या मागे विश्वास व्यक्त केलेला आहे. या सर्व राजकीय स्थैर्याच्या दृष्टीकोनातून निवडणूक आयोगाने निर्णय घ्यावा. त्यामुळं या निवडणूका लवकरात लवकर घेण्यात याव्यात. आणि याची सर्व प्रक्रिया 27 तारखेच्या अगोदर पूर्ण होईल. असं नियोजन करावं.

अशी विनंती महाविकास आघाडीच्या नेत्यांनी केली आहे.