Home > News Update > 'त्या' प्रश्नाचे उत्तर शरद पवार यांनी 'ठाकरे कुटुंबीय' असं का दिलं?

'त्या' प्रश्नाचे उत्तर शरद पवार यांनी 'ठाकरे कुटुंबीय' असं का दिलं?

त्या प्रश्नाचे उत्तर  शरद पवार यांनी ठाकरे कुटुंबीय असं का दिलं?
X

शरद पवारांना समजून घेणं सोप्पं नाही असं का म्हटलं जातं? याचं उत्तर या लेखात तुम्हाला मिळेल... फक्त "उद्धव की राज?" या राज ठाकरे यांच्या प्रश्नाला एका मुलाखतीत शरद पवार यांनी दिलेलं उत्तर आठवा आणि ज्येष्ठ पत्रकार संजय आवटे यांचा हा लेख वाचायला सुरुवात करा

शरद पवारांची प्रकट मुलाखत राज ठाकरे यांनी घेतली, तेव्हा २०१९ ची लोकसभा निवडणूकही व्हायची होती. त्या मुलाखतीतील 'रॅपिड फायर राउंड'मध्ये राज यांनी पवारांना विचारलेः "उद्धव की राज?"

त्यावर पवार उत्तरलेः "ठाकरे कुटुंबीय" (Thackeray Family)

ती मुलाखत पाहाताना एनसीपीचा कार्यकर्ता असलेला एक मित्र मला म्हणाला, "उद्धव त्या मोदींसोबत आहेत. क्रमांक एकचे शत्रू आहेत. राज आता कॉंग्रेस आणि राष्ट्रवादीसोबत येऊ पाहाताहेत. तर, थेट 'राज' असं उत्तर देण्यात काय अडचण होती? उलटपक्षी राजसोबत आघाडीच करायला हवी साहेबांनी."

पुढं काय घडलं? हे आपल्याला माहीत आहे. याच उद्धव यांना शरद पवारांनीच मुख्यमंत्री केले आणि राज पुन्हा अनिश्चिततेच्या वावटळीत सापडले.

राज ठाकरेंनी 'मनसे' हा आपला नवा पक्ष स्थापन केला, तो काळ वेगळा होता. प्रस्थापित राजकारणाला जगभर आव्हान दिले जात होते. नवे चेहरे राजकारणाच्या रिंगणात येत होते. भारतातही तशा हालचाली सुरू झाल्या होत्या. अहोरात्र दळण दळणारी 'न्यूज चॅनल्स' तेव्हा महाराष्ट्रात नुकतीच दाखल होत होती. राज ठाकरे हा या वाहिन्यांसाठी खात्रीचा 'टीआरपी' होता. त्यामुळे त्यांच्या 'लाइव्ह' सभा, मुलाखती असे सगळे सुसाट सुरू झाले. अल्पावधीत राज ठाकरेंचे गारूड तयार झाले. महाराष्ट्राच्या राजकारणात 'आले नवे नवे पाणी' अशी सळसळ राज यांनी तयार केली.

तेव्हा अनेक पत्रकार, संपादकही कमालीचे भारावलेले असते. मला आठवते, तेव्हा मी 'लोकसत्ता'चा सहसंपादक होतो. कुमार केतकर संपादक होते. केतकर साहेबांनी 'मुद्रा भद्राय राजते' असा अग्रलेख तेव्हा लिहिला होता आणि राजमुळे महाराष्ट्राचे राजकारण कसे बदलत जाणार आहे, अशी भारावलेली मांडणी केली होती. राज यांचे गारूड असे विलक्षण होते की २००९ च्या पहिल्याच निवडणुकीत राज यांचे तेरा कार्यकर्ते आमदार झाले.

मी, मात्र सुरूवातीपासून राज यांचा विरोधक होतो. २०१४ च्या निवडणुकीत राज हा दखलपात्र मुद्दाही असणार नाही, असे मी तेव्हाच म्हटले होते. तसा लेखही 'लोकसत्ता'त लिहिला होता.

राज यांचे राजकारणच मुळात चुकीच्या पायावर उभे होते. त्याला काही ठोस आशय नव्हता. दीर्घकालीन दृष्टी नव्हती. राज हे 'स्टेट्समन' नव्हेत, तर 'स्टंट्समन' होते. राजकारणासाठी लागणारे कष्ट करण्याची त्यांची तयारी नव्हती. पक्ष संघटन करण्यासाठी कार्यकर्त्यांना सतत कार्यक्रम द्यावा लागतो. नेता तेवढा कार्यक्षम असावा लागतो. राज यांच्यापाशी यापैकी काहीच नव्हते.

त्यामुळे राज यांची घसरगुंडी अटळ होती. २०१९ च्या लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने त्यांनी 'आयडिया ऑफ इंडिया' समजून घेत त्या दिशेने जाण्याचा प्रयत्न केला आणि त्याला उदंड प्रतिसादही मिळाला. पण, अखेरीस तोही स्टंटच ठरला.

राज यांची फरफट मग अपरिहार्य होती.

पण, कोणी काही म्हणो, राज ठाकरेंच्या व्यक्तिमत्त्वात जो 'एक्स फॅक्टर' आहे, तो सध्या देशातल्या कोणत्याही राजकीय नेत्यांत नाही. राज यांच्या असण्यात- दिसण्यात- वक्तृत्वात करिश्मा आहे. आणि, त्यांना ते नीट ठाऊक आहे. त्यामुळे स्वतःला 'कॅरी' कसे करायचे, याचे नीट भान त्यांना आहे.

राज यांचे साधे बसणे, रोखून पाहाणे, लोकांना अभिवादन करणे, बोलणे यात एक वेगळाच डौल आणि जरबही आहे. 'प्रेझेन्स ऑफ माइन्ड' असणारा आणि तीक्ष्ण विनोदबुद्धी असणारा हा नेता बुद्धिमान, कलासक्त असा आहेच, पण राजकारण त्याच्या पल्याड असते. 'राजकारण' हा ध्येयांचा पाठलाग करत सुरू असलेला अथक आणि सातत्यपूर्ण असा प्रवास असतो. तिथे 'पोलिटिकल करेक्टनेस', 'कमिटमेंट', क्रेडिबिलिटी आणि मुत्सद्देगिरीचाही कस लागतो.

राज तिथे कमी पडतात.

हे ही वाचा

साने गुरुजींची आत्महत्त्या फक्त हारजीत या मोजपट्टीत बसवता येईल का?: प्रा. हरी नरके

२४ तासात कोरोनाबाधीत रुग्णांच्या संख्येचा उच्चांक

“20 जवानांचे बलिदान वाया जाऊ द्यायचे का?”

राज यांची प्रकट मुलाखत दोन वर्षांपूर्वी मी घेतली होती, ती आज आठवतेय.

राज ठाकरे यांची प्रकट मुलाखत मी घ्यावी, अशी कल्पना मांडली ती भाजपचे प्रवक्ते सन्मित्र शिवराय कुलकर्णी यांनी. हे खरे लोकशाहीचे सौंदर्य!

अमरावतीच्या प्रख्यात 'अंबा फेस्टिव्हल'मध्ये दहा हजारांच्या जनसमुदायासमोर झालेली ती प्रकट मुलाखत प्रख्यात कलावंत आणि राज यांचे वर्गमित्र विजय राऊत, तसेच मित्रवर्य संजय सिंगलवार, पप्पू पाटील यांच्या पुढाकारानं ठरलेली. शिवराय हे या फेस्टिव्हलचे अध्यक्ष. त्यांनी हट्टच धरलेला.

मात्र, मुलाखतीच्या दिवशी मी जयपूर आणि दिल्लीला असणार होतो. त्यामुळे कसे जमेल हा प्रश्न होता. पण, दिल्लीची मीटिंग संपताच तातडीनं फ्लाइटनं मुंबई- पुणे मार्गे नागपूर गाठलं आणि मग कारनं अमरावती.

परप्रांतातून महाराष्ट्रात येऊन राज यांची मुलाखत!

एवढी धावाधाव केल्याचा आनंद झाला. कारण, ही प्रकट मुलाखत अतिशय रंगली. स्नेही रेणुका देशकर सोबत होत्या.

मुलाखतीपूर्वी नि नंतरही राज यांच्यासोबत धमाल गप्पा रंगल्या. ते स्वतःही या मुलाखतीवर खुश होते. त्यांना एवढे आडवे-तिडवे प्रश्न कोणीच विचारले नसतील, असे राज यांचे कार्यकर्तेच सांगत होते. मात्र, राज यांनी धमाल आणि खुली उत्तरं देत मुलाखत उंचीवर नेऊन ठेवली.

व्यक्तिशः माझ्यावर राज यांचा प्रभाव नसल्याने मी 'कुल' होतो. पण, माझ्या स्नेही रेणुका भारावलेल्या होत्या. त्यांनी राज यांच्यासोबत फोटो काढून घेतला आणि त्या म्हणाल्या, "आज एक स्वप्न पूर्ण झालं!"

त्यावर हजरजबाबी राज तातडीनं म्हणाले, "मोठी स्वप्नं बघा!"

आज राज यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देताना, मला त्यांना तेच सांगायचंय.

राज यांच्या हातात वय तर आहेच, पण अद्यापही तेच वलय आहे!

- संजय आवटे

Updated : 18 Jun 2020 5:49 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top