सीबीआयच्या रडारवरील ‘टीडीपी’चे २ खासदार भाजपात

7

 लोकसभा निवडणुकीदरम्यान घरावर सीबीआयचे छापे पडल्याने अडचणीत आलेले तेलुगू देसम पक्षाचे (टीडीपी) चे  खासदार सी. एम. रमेश, वाय. सत्यनारायण चौधरी यांना भाजपने प्रवेश देऊन पावन करून घेतले आहे. त्यांच्यासोबत टी. जी. व्यंकटेश आणि जी. मोहन राव या अन्य दोन खासदारांनी पक्षांतर करून (टीडीपी) सर्वेसर्वा चंद्राबाबू नायडू  यांना धक्का दिला आहे. ‘टीडीपी’च्या राज्यसभेतील सहापैकी चार खासदारांनी गुरुवारी सभापती व्यंकय्या नायडू यांची भेट घेऊन टीडीपी संसदीय पक्ष भाजपमध्ये विलीन होत असल्याचे पत्रही दिले आहे.  दरम्यान, यूरोप दौऱ्यावर असलेले चंद्राबाबू नायडू यांनी यावर प्रतिक्रिया देताना ,”बंडखोरीच्या कारणांची चौकशी केली व अशी संकटे पक्षाला नवीन नसल्याचे नेत्यांना सांगितले. फक्त आंध्र प्रदेशच्या हितासाठी टीडीपी भाजपाच्या विरोधात लढली’, असे नायडू म्हणाले.

कोण आहेत हे खासदार?

टीडीपीचे राज्यसभेतील खासदार सी. एम. रमेश आणि वाय. सत्यनारायण चौधरी यांच्या घरावर सीबीआय काही दिवसांपूर्वी छापे टाकले होते.  हे दोघेही व्यवसायाने उद्योजक असून सीबीआय, आयकर विभाग, आणि सक्तवसुली संचालनालय [ईडी] च्या रडारवर आहेत. सीबीआयचे संचालक आलोक वर्मा आणि विशेष संचालक राकेश अस्थाना यांच्यातील वाद चव्हाट्यावर आला असताना आयकर विभागाच्या तपासात रमेश यांचे नाव जोडले गेले होते.  अन्य खासदार वाय. सत्यनारायण चौधरी हे एका बँक घोटाळा प्रकरणात सीबीआय आणि [ईडी] च्या रडारवर आहेत.

 पक्षांतरबंदी कायदा लागू होतो का?गुरुवारी तेलुगू देसमच्या राज्यसभेतील चार खासदारांनी दुपारी २ च्या सुमारास भाजप प्रवेशाचा निर्णय सभापतींना कळवला. सी. एम. रमेश, वाय. सत्यनारायण चौधरी, टी. जी. व्यंकटेश आणि जी. मोहन राव या खासदारांनी पक्षांतर केले. दोन-तृतीयांश सदस्यांनी एकत्रितपणे दुसऱ्या पक्षात प्रवेश केला तर त्यांना पक्षांतरबंदी कायदा लागू होत नाही. त्यामुळे या चारही खासदारांवर पक्षांतरबंदीची कारवाई करता येणार नाही, असेही बोलले जाते.

राज्यसभेत ‘एनडीए’चे संख्याबळ वाढले

राज्यसभेत ‘एनडीए’ अल्पमतात आहे. २४५ सदस्यांच्या राज्यसभेत ‘एनडीए’चे संख्याबळ १०२ होते. ‘टीडीपी’च्या चार खासदारांमुळे ते १०६ झाले. वरिष्ठ सभागृहात बहुमत नसल्याने भाजपसाठी महत्त्वाची अनेक विधेयके रखडली आहेत. त्यामुळे राज्यसभेतील संख्याबळ वाढवण्याचा प्रयत्न भाजप सातत्याने करत आहे. ‘एनडीए’ला राज्यसभेत बहुमतासाठी आणखी काही जागा हव्या आहेत.

Comments