Home > News Update > या कारणामुळे ट्रम्प यांनी बंद केली रोजची पत्रकार परिषद !

या कारणामुळे ट्रम्प यांनी बंद केली रोजची पत्रकार परिषद !

या कारणामुळे ट्रम्प यांनी बंद केली रोजची पत्रकार परिषद !
X

अमेरिकेत कोरोना रुग्णांची संख्या १० लाखांच्याजवळ पोहोचते आहे. तर मृतांची संख्या ५३ हजारांच्यावर पोहोचली आहे. या भीषण परिस्थितीमध्येही अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी अमेरिकेतील प्रसारमाध्यमांवर खापर फोडत रोज पत्रकार परिषद घेणे बंद केले आहे.

अमेरिकीतील काही माध्यमे फेक न्यूज दाखवून टीआरपी मिळवतात आणि पत्रकार परिषदेत फक्त विरोधी प्रश्नच विचारतात असा आरोप ट्रम्प यांनी कला आहे. “lamestream मीडिया जेव्हा विरोधी प्रश्न विचारतो आणि सत्य आणि अचूक माहिती देत नसेल तर व्हाईटहाऊसमध्ये पत्रकार परिषद घेण्यात काहीच अर्थ नाही. त्यांना विक्रमी टीआरपी मिळतो पण अमेरिकन जनतेला फक्त फेकन्य़ूज मिळतात”, असे ट्विट ट्रम्प यांनी केले आहे. एकंदरीतच या मुद्यावरुन ट्रम्प यांनी मीडियापासून पळ काढलेला दिसतोय.

ट्रम्प यांनी हा निर्णय एका वेगळ्या कारणामुळे घेतल्याचीही चर्चा आहे. याआधी डोनाल्ड ट्रम्प यांनी आपल्या पत्रकार परिषदेत सूर्यप्रकाशामुळे कोरोनाचे विषाणू मरतात किंवा मलेरियाच्या औषधांनी कोरोना बरा होऊ शकतो अशी वक्तव्य बिनधास्त करुन टाकली होती. पण गुरूवारच्या पत्रकार परिषदेत तर ट्रम्प यांनी हद्दच केली. घरात स्वच्छतेसाठी वापरल्या जाणाऱ्या जंतुनाशकांचा वापर कोरोनाच्या उपचारासाठी येईल का याचा वैद्यकीय तज्ज्ञांनी अभ्यास करावा, असं वक्तव्य केले.

त्यानंतर अनेक ठिकाणी घरगुती वापरासाठीचे जंतुनाशक तयार करणाऱ्या उत्पादकांना नागरिकांना कोरोनावरील उपचारासाठी जुंतनाशकांचा वापर करु नका, असे आवाहन करावे लागले. ट्रम्प यांनीही आपण उपरोधिकपणे हे वक्तव्य केले होते, असं स्पष्टीकरण दिले आहे. पण ट्रम्प यांच्या अजब दाव्यांवर त्यांच्या यंत्रणेला नंतर स्पष्टकरण द्यावे लागण्याची ही काही पहिलीच वेळ नाहीये. त्यामुळे आपल्या बिनधास्त वक्तव्यांनी अडचणीत येणाऱ्या ट्रम्प यांनी मीडियावर खापर फोडत पळ काढला आहे, अशी टीका आता अमेरिकन प्रसारमाध्यमांमधून होत आहे.

Updated : 26 April 2020 3:25 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top