Home > News Update > BHARATMATA: MOTHER TERESA

BHARATMATA: MOTHER TERESA

BHARATMATA: MOTHER TERESA
X

जगात आस्तिक-नास्तिक वाद अनादी काळापासून सुरु आहे. आजही त्यावर वेळोवेळी चर्चा होत असते. असे असंले तरी अशा वादविवादात न पडता देवावर श्रद्धा ठेऊन आपल्या कार्यात आनंद मानणारे खूप आहेत. तसेच देवावर विश्वास न ठेवता केवळ स्वतःवर विश्वास ठेऊन नवनिर्माणाची प्रेरणा वाहणारे देखील तेवढेच आहेत. आपलं आस्तिक असणं, नास्तिक असणं किंवा निरीश्वरवादी असणं हे सगळं बाजूला ठेवून कर्मसिद्धांतावर विश्वास ठेवण्याची शिकवण देणाऱ्या निष्काम कर्मयोगाची हीच तर खरी प्रेरणा. हाच प्रेरणेचा स्रोत भारतीयांना मदर टेरेसांच्या रूपाने चैतन्य देऊन गेला. त्यांनी घालून दिलेला आदर्श आजच्या असहिष्णुतेच्या वातावरणात आवर्जून अभ्यासावा असाच आहे.

सातासमुद्रापार जन्मलेली बाई येशू ख्रिस्ताची मानवतावादी शिकवण घेऊन भारतात येते आणि भारताचीच होऊन जाते ही घटना सामान्य नक्कीच नाही. तत्कालीन परिस्थितीचा धांडोळा घेतला तर धार्मिक वृत्तीच्या मदर तेरेसांना भारतीय समाजात राहून कार्य करताना कुठल्या राजकीय,सामाजिक, धार्मिक आणि मानसिक परिस्थितून जावं लागलं असेल हे समजून घेणं महत्वाचं ठरतं. वयाच्या अठराव्या वर्षी नन बनलेली ही बाई भारताला आपलं कार्यक्षेत्र निवडते. कलकत्ताजवळच्या एंटाली गावात शिक्षिका म्हणून काम सुरु करते. सलग १७ वर्षे शिक्षिका-मुख्याध्यापिका म्हणून भूमिका बजावते. भारताच्या एकूण समाजरचनेत अगदी खालच्या वर्गातून आलेल्या लहानग्यांना शिक्षणाची गोडी लावते हे विशेष. ही कॉन्व्हेंट शाळा होती. सहाजिक तेथे धार्मिक शिक्षण दिलं जायचं. ख्रिश्चन मिशनरीज धर्मप्रचारासाठीच भारतात कार्यरत होत्या हा तो काळ होता. अशा परिस्थितीत जेव्हा त्या शिक्षिका म्हणून काम करायच्या तेव्हा धार्मिक बाजूने कमी आणि मानवतेच्या अंगाने त्या अधिक काम करायच्या.यादरम्यान दुसरं महायुद्ध सुरु झालं होत. जपानने ब्रम्हदेश ताब्यात घेतलं आणि इंग्रजांना देखील पश्चिम बंगालात खबरदारी म्हणून लष्करी तळ उभारावं लागलं. त्यात मदर तेरेसांची शाळा अन्यत्र हलवली गेली. दरम्यान गांधीजींच्या नेतृत्वाखाली १९४२ साली चाले जावं चळवळ जोर धरत होती. बंगाल तर स्वातंत्र्यसैनिकांची भूमी. राजा राममोहन रॉय ते सुभाषबाबू असा या मातीचा इतिहास. पाहायला गेलं तर धर्माच्या आधारे तेरेसांनी ब्रिटिशांना मदत करायला हवी होती. ब्रह्मदेशातून भारतात स्थलांतरित झालेल्या नागरिकांना त्यांच्या नशिबावर सोडून द्यायला हवं होतं. ब्रिटिशांच्या विरोधात आंदोलन उभारणाऱ्या कार्यकर्त्यांना पकडून दयायला हवं होत. पण त्यांनी तस काही केलं नाही. धर्मप्रचारासाठी जरी त्या भारतात आल्या असल्या तरी त्यांनी मानवतेलाच सर्वश्रेष्ठ मानलं. पुढे याची त्यांना किंमत चुकवावी लागली.

१६ ऑगस्ट १९४६ ला स्वतंत्र मुस्लिम राष्ट्राची मागणी करणाऱ्या मुस्लिम लीगने 'प्रत्यक्ष कृती' कार्यक्रम सुरु केला. बंगालात हिंदू-मुस्लिम दंगली पेटल्या. रक्ताच्या थारोळयांनी कलकत्ता शहर माखलेलं असताना, शहरात दंगली उफाळून आलेल्या असताना आपल्या पदराखाली असलेल्या २०० अनाथांना सांभाळत असलेली ही मायमाऊली दंगलग्रस्तांना देखील मदत करत होती. पुढे १९४७ भारत आणि पाकिस्तान अशा दोन राष्ट्रांची निर्मिती झाली. इंग्रज देश सोडून गेले. भारतीयांनी आनंदोत्सव साजरा केला. पण फाळणीमुळे देशाचं जनमानस बिघडलेलं होत. सीमाभागात दंगली पेट घेत होत्या. अशा वेळी मदर तेरेसांना देश सोडून जाणं सहजशक्य होत. पण इथेच त्यांचं वेगेळेपण पाहायला मिळत. त्या मिशनरीचं काम करत असल्या तरी मानवता या मूल्याला त्यांनी अग्रक्रम दिला. या घटनेचा त्यांच्यावर खोल परिणाम झाला आणि त्यांनी भारतातच राहून लोकांची सेवा करण्याचं ठरवलं.

धर्मकार्यासाठी आलेल्या तेरेसांना लोकसेवा करण्याची संमती घ्यावी लागली. ही संमती थेट व्हॅटिकन चर्चमधून मिळवावी लागली. त्यांच्या कामाचा आवाका लक्षात घेता त्यांना तशी संमती दिली गेली. शिक्षिका असलेल्या या बाईने भारतीय नागरिकत्व स्वीकारलं आणि नर्सिंगचं प्रशिक्षण घेतलं. हा त्याच्या जीवनातला दुसरा असा महत्वाचा टप्पा म्हणता येईल. क्षय,मलेरिया, कुपोषणग्रस्त, कुष्ठरोगी अशा समस्या असलेल्या वातावरणात हे काम हाती घेणं नक्कीच सोपं नव्हतं. त्यांची काम करण्याची जिद्द पाहून काहींनी त्यांचं कौतुक केलंच, पण कर्मठ धर्मगुरूंनी टीकादेखील सुरु केली. तेरेसा यांनी ख्रिश्चन धर्माची शिकवण द्यावी, लोकांचे धर्मांतर करावे म्हणून त्यांना नेमण्यात आल्याची मिशनरींची धारणा होती. तर आपले काम हे देवाचे आणि धार्मिक सेवेचे आहे असं तेरेसांना वाटत होत. मिशनरी म्हणत, 'सिस्टर तेरेसा या धर्मोपदेशक आहेत', तर तेरेसा म्हणत , 'मी कर्मोपदेशक आहे'.

फिरते दवाखाने आज आपण आपल्या आसपास पाहतो आहोत. त्याची मूळ प्रेरणा आणि कल्पना ही मदर तेरेसांचीच. ज्या महारोग्यांना दवाखान्यापर्यंत पोहोचणे देखील शक्य नाही, अशा रोग्यांपर्यंत स्वतः पोहचून सेवा देण्याचा त्यांचा यामागचा विचार होता. मदर तेरेसा म्हणत, 'जगातील सर्वात मोठा रोग कोणता असेल तर तो म्हणजे आपण नकोसे झाल्याची भावना' . आज जर त्या ह्यात असत्या तर काश्मीर प्रश्नावर नक्कीच व्यक्त झाल्या असत्या. काश्मिरी नागरिकांच्या मनात असलेली एकाकीपणाची भावना,न्यूनगंड त्यांनी जाणून घेऊन संवादाची सुरुवात नक्कीच केली असती.

मदर तेरेसा म्हणजे ख्रिश्चन धर्मसत्तेला पडलेलं एक कोडं होत. त्यांनी धर्मोपदेशक न बनता कर्मोपदेशक होऊन आपल्याच धर्मसत्तेला आव्हान दिलं. त्यांना संतपद द्यावं कि नाही याविषयी धर्मसत्तेतील धुरिणांनी व्यापक चिंतन केलं. धर्मसत्ता कुठलीही असू द्या ती पुरुषसत्ताकच असते. तेव्हा कुठलाही प्रस्थापित धर्म एखाद्या स्त्रीला संतपद देण्यास तयार नसतो. धर्माचे ठेकेदार मरणोत्तरही तेरेसांना संतपद देण्यास तयार नव्हते. परंतु, देवावर श्रद्धा ठेऊन मानवतेची शिकवण देणाऱ्या महामानवांना धर्मसत्तेने नव्हे तर लोकांनीच संत मानले. शेवटी या महान बाईसमोर धर्मसत्तेला झुकावे लागले. चर्चने घालून दिलेल्या साऱ्या अटी त्यांनी मान्य केल्या होत्या. आयुष्यभर त्यांनी या कठोर अटींचे पालन केले,परंतु धर्मप्रसार मात्र केला नाही.असहाय लोकांची सेवा हीच आपली प्रभूभक्ती असा त्यांचा विश्वास होता. त्यांच्या या विचारामुळे त्यांना चर्चची नाराजी भोगावी लागली. मृत्यूपश्चातही त्यांना चर्चचा विरोध कायम राहिला. हा विरोध नंतर मावळला. भारतीय समाजात काम करत असताना इथल्या सामाजिक-सांस्कृतिक आणि राजकीय पटलावर जे काही भलेबुरे परिणाम घडत होते त्या सर्वांचा परिणाम तेरेसांवर झालेला आढळतो. शेवटच्या श्वासापर्यंत त्या मानवतावाद सांगत होत्या. आज भारतात जेव्हा मॉब लिंचिंगसारख्या घटना घडत आहेत, अशा काळात त्यांची शिकवण महत्वाची वाटते. त्या म्हणतात, ' जर प्रत्येकाने आपल्या शेजाऱ्यात प्रभूचे रूप पाहण्याचे ठरविले तर जगातील संहारक अण्वस्रे कालबाह्य ठरतील'. तुकोबांपेक्षा त्या वेगळं काय सांगत होत्या? धर्मसत्तेने त्यांना संतपद देण्याअगोदर भारतीय समाजाने त्यांना संतपद बहाल केलं. त्यांना आई मानलं. जननीचा दर्जा दिला.आपल्या सहिष्णू परंपरेचं इतकं विशाल आणि व्यापक उदाहरण आपण कसे काय विसरलो?

धार्मिक असणं आणि धर्मांध असणं यातला खरा फरक मदर तेरेसांनी आपल्याला समजून सांगितला. काही धर्मांध अधेमधे कधी लहर आली की मदर तेरेसांच्या कार्यावर शंका घेत असतात,पण त्यामुळे त्यांचं मोठेपण कमी होत नाही. धर्मप्रसार केला नाही म्हणून धर्मसत्तेची नाराजी ओढून घेणाऱ्या मदर तेरेसांच्या कार्यावर जेव्हा संघप्रमुख मोहन भागवत शंका घेतात तेव्हा खरं त्यांचं खुजेपण आपल्यासमोर येतं. साऱ्या जगाने जिला आपली 'आई' मानलं तिच्याविषयी अधिक जाणून घेणं म्हणजे आपल्या आईकडेच नव्या नजरेनं पाहणं असंच नाही का? भागवतांसारख्या अनेकांना अशी नजर लाभो, ही असलेल्या-नसलेल्या देवाला प्रार्थना.

Updated : 26 Aug 2019 2:45 PM GMT
Next Story
Share it
Top