Home > News Update > उद्याचा सूर्य निर्भयाला न्याय देणारा उगवेल का ?

उद्याचा सूर्य निर्भयाला न्याय देणारा उगवेल का ?

उद्याचा सूर्य निर्भयाला न्याय देणारा उगवेल का ?
X

दिल्लीत 2012 साली घडलेल्या निर्भया बलात्कार व हत्याकांडातील आरोपींना उद्या 20 मार्च रोजी पहाटे साडेपाच वाजता फाशी देण्याचे नियोजन आहे. ही फाशी टाळण्यासाठी आरोपींनी आपल्या वकिलांमार्फत शर्थीचे प्रयत्न केले. अनेकदा फाशी पुढे ढकलण्यात आली; परंतु आता मात्र फाशी रोखण्यासाठीचे कोणत्याही न्यायालयाचे कुठलेही आदेश नाहीत; त्यामुळे उद्या पहाटे आरोपींना फाशी दिली जाईल आणि उद्याचा सूर्य हा निर्भयाला न्याय देऊनच उगवेल, अशी दाट शक्यता आहे.

2012 साली घडलेल्या घटनेत आरोपींना स्थानिक न्यायालयाने 2014 सालीच फाशी घोषित केली होती. परंतु त्यानंतर त्या शिक्षेविरोधात उच्च न्यायालय आणि सर्वोच्च न्यायालयापर्यंत आरोपी अपिलात गेले. सर्वोच्च न्यायालयाने फाशीची शिक्षा कायम केली, त्यालाही तीन वर्षे उलटून गेलीत.

दरम्यानच्या काळात आरोपी अल्पवयीन असल्यापासून, आजारी असल्यापासून, तुरुंगात मारहाण झाल्यापासून ते अगदी वेगवेगळ्या कारणांनी आरोपींच्या वकिलांनी विविध बहाणेबाजी करून फाशी लांबवण्यात यश मिळवलं. आरोपींची राष्ट्रपतींकडे दया याचिका सुद्धा एकाच वेळी न करता एकेका आरोपीची स्वतंत्र याचिका करण्याचा फंडा आरोपीच्या वकिलांनी अवलंबून पाहिला.

या सर्व काळात भारतीय न्यायव्यवस्थेबाबत मात्र लोकांमध्ये प्रचंड चीड निर्माण झाली. निर्भयाची आई आशा सिंग यांनीसुद्धा न्यायव्यवस्थेला व भारतीय कायद्यांना तसंच संविधानिक तरतुदींना दोष दिला. मात्र आता अनेकवेळा तारखा पुढे ढकलल्या गेल्यानंतर उद्या पहाटेची फाशीची वेळ निश्चित झाली आहे.

आरोपींनी यावेळीसुद्धा आंतरराष्ट्रीय न्यायालयात फाशी विरोधात दाद मागितली आहे. कोरोना संसर्गाचा काळ असल्यामुळे फाशी देणे योग्य होणार नाही, असा सुद्धा बहाणा पुढे केला आहे. परंतु तूर्त तरी उद्याच्या फाशीविरोधात कोणत्याही न्यायालयाची स्थगिती नसल्याने फाशीचा मार्ग मोकळा झालेला आहे.

Updated : 19 March 2020 1:03 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top