तुमच्या मुलाकडे किंवा मुलीकडे स्वतंत्र फोन आहे का?

Through virtual kidnapping cyber criminals demand money, maharashtra cyber department appeals parents to take care

Courtesy: Social media

तुमच्या मुलाचे किंवा मुलीचे आभासी अपहरण करून खंडणीची मागणी करणाऱ्या सायबर भामट्यांपासून सावध राहा, असे आवाहन ‘महाराष्ट्र सायबर’ विभागातर्फे करण्यात आले.

सध्याच्या काळात सायबर भामट्यांनी लोकांची आर्थिक फसवणूक करण्यासाठी नवीन तंत्राचा अवलंब केला आहे. यामध्ये सायबर भामटे आधी सोशल प्रोफायलिंग (social profiling) करून शक्यतो अशा जोडप्यांना लक्ष करतात जिथे आई, वडील दोघेही नोकरी करतात आणि त्यांची मुलं एकटी असतात किंवा त्याच्याकडेपण मोबाईल असतात.

सायबर भामटे विविध सोशल मिडियाद्वारे अशा मुलांशी मैत्री करतात आणि त्यांचे फोटो , पालकांची माहिती काढून घेतात. त्यानंतर त्या मुलांना काही काळासाठी आपला मोबाईल बंद करायला सांगतात, त्याच सुमारास पालकाना खोटे व्हिडीओ बनवून किंवा फेक फोटो बनवून तुमच्या मुलाचे अपहरण झाले आहे अशा आशयाचा फोन करतात किंवा मेसेज पाठवतात .

या मेसेजमध्ये त्यांना सोडवण्यासाठी काही ठराविक खंडणी मागितली जाते व पालक घाबरून ती खंडणी भामट्याने सांगितलेल्या बँक खात्यात जमादेखील करतात . इथे सर्वात महत्त्वाचे म्हणजे प्रत्यक्षात अपहरण झाले नसले तरी पालकांना तंत्रज्ञानाचा उपयोग करून फसवले जाते. अपहरणाचा आभास निर्माण केला जातो. ज्यामुळे घाबरून पालक खंडणी देतात. यामध्ये खंडणी कमी वेळात बँक खात्यात ट्रान्सफर करण्यास सांगितलेले असते .पालक घाबरून जाऊन पाल्याच्या सुरक्षिततेच्या भीतीने व काळजीपोटी सारासार विचार न करता खंडणी भरून मोकळे होतात.

वरील नमूद प्रकार हे परदेशात जास्त होत असले तरी , आपण इथे सतर्क राहणे जरुरीचे आहे. तुम्ही तुमच्या मुलांकडे शक्यतो एकदम साधा फोन द्या. ज्यामुळे आपले पाल्य आपल्या नकळत सोशल मीडियावर जास्त वावरणार नाही व सायबर भामट्यांचा संपर्कात येण्याची शक्यता कमी होईल.

पालकांनीसुद्धा सोशल मीडियावर वावरताना आपली काय माहिती सोशल मीडियावर प्रसारित करायची याचे तारतम्य बाळगले पाहिजे. अशा प्रकारचा अनोळखी मेसेज आला तर शक्यतो त्या अपहरणकर्त्याचा फोनवर संपर्क होतो आहे का याची खात्री करा. अशा प्रकारचे मेसेज आल्यावर आपले पाल्य कुठे आहे किंवा असू शकेल याचा आधी शोध घ्या. आपल्या पाल्याशी सतत संपर्कात राहा. तसंच अशा प्रकारचे मेसेज आल्यावर घाबरून न जाता त्याची तक्रार नजीकच्या स्थानिक पोलीस स्टेशनमध्ये नोंदवा. असे आवाहनही करण्यात आले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here