Home > News Update > सावधान! तुमचा फोन तुमच्यावर लक्ष ठेऊन आहे

सावधान! तुमचा फोन तुमच्यावर लक्ष ठेऊन आहे

सावधान! तुमचा फोन तुमच्यावर लक्ष ठेऊन आहे
X

अन्न, वस्त्र, निवारा आणि त्यासोबत आता मोबाईल आणि इंटरनेट आपल्या जगण्याचा अविभाज्य भाग झाला आहे. आजकाल आपल्या दिवसाची सुरूवात आणि दिवसाचा शेवट हा मोबाईलसोबतच होतोय´. आपण दिवसभर काय करतोय, कुठे आहोत, कुठल्या मनःस्थितीत आहोत हे आपल्या कुटुंबापेक्षा, मित्र-मैत्रिणींपेक्षा आपला मोबाईल जास्त चांगलं सांगू शकतो. सोशल मीडियावर त्याबद्दलचं एक MEME ही आहे, की आपला मालक कसा आहे हे फक्त त्याच्या मोबाईलला माहितंय. पण खरंच, आपण कसे आहोत हे फक्त आपल्या मोबाईललाच माहितंय का? की त्याने आणखी कोणाला सांगितलंय? हो. हा प्रश्न पडतोय. त्याला कारणंही तसंच गंभीर आहे. जगातल्या सर्वात मोठ्या आणि प्रतिष्ठीत मोबाईल कंपनी आयफोनच्याबाबतीत तसं घडलंय. ऍपलच्या व्हर्च्युअल असिस्टंट असलेल्या सिरी सिस्टीममधून आयफोन युझर्सचा पर्सनल डेटा रेकॉर्ड होत असल्याचं समोर आलंय आणि त्यात आयफोन युजर्सचं सेक्स करतानाचंही रेकॉर्डींग आहे.

आयर्लंडमधल्या कॉर्क शहरात असलेल्या ग्लोबटेक कंपनीकडे सिरीच्या रेकॉर्डींग्ज ऐकण्याचं आणि त्यांचं वर्गीकरण करण्याचं काम होतं. याठिकाणी कामाच्या प्रत्येक शिफ्टमध्ये सिरीच्या जवळपास १ हजार रेरकॉर्डींग्ज ऐकल्या जात होत्या. यामध्ये ड्रग डील्स, काही संवेदनशील व्यावसायिक सौदे एवढंच नाही तर आयफोन युझर्सचे सेक्सचे रेकॉर्डींगही होतं. ही सगळी माहिती याच कंपनीच्या एका माजी कर्मचाऱ्याने दिली.

संबंधित बातमी : Apple Siri recorded people having sex: Report

यावरुन आपण हे लक्षात घेतलं पाहिजे की आपला फोन आता आपला राहीलेला नाही. आपण त्याला जगाची माहिती घेण्यासाठी वापरत होतो पण तो आता आपली माहिती जगापर्यंत पोहोचवतोय. आपण इंटरनेटच्या माध्यमातून त्याला जगासाठी सहज एक्सेसेबल केलंय.आपण दिवसभर काय करतोय, कोणाशी बोलतोय, काय खातोय, कुठे खातोय, कोणासोबत खातोय, फेसबुक, व्हॉट्सअपवर कोणाशी बोलतोय, इंटरनेटवर काय सर्च करतोय, हे आणि यासारखं आणखी बरंच काही. या सर्व घटनांमध्ये मोबाईल फोन हा आपला साक्षीदार आहे. त्याच्या माध्यमातूनच या सगळ्या गोष्टी होतायत. त्यानं आपलं सगळं स्वतःमध्ये सामावून घेतलंय. आणि इंटरनेटनं या सर्व माहितीला जगासाठी वाट करुन दिलीय.

कसंकाय एखाद्या व्यक्तीचा फोन नंबर नव्याने सेव्ह केल्यावर तो फेसबुकच्या ‘पीपल यु मे नो’ मध्ये दिसतो? कसंकाय फेसबुकवर एका तिसऱ्या व्यक्तीने टाकलेल्या ग्रुपफोटोत आपण असल्यावर लगेचच ‘हे महाशय तुम्हीच आहात का’ असं विचारणारं नोटीफिकेशन येतं? कसंकाय एखादी गोष्ट ब्राऊझरमध्ये सर्च केल्यानंतर त्याविषयासंबंधिच्या लिंक्स, जाहिराती सगळीकडे दिसायला लागतात?

अशी अनेक उदाहरणं देता येतील. आपल्या फोनची ब्राऊझिंग हिस्ट्री जगजाहीर झालेली आहे. आपण फोनमध्ये सेव्ह केलेले कॉन्टॅक्ट्स तर केव्हाच अशा यंत्रणांकडे गेले आहेत. या डिजीटल डेटाच्या बाबतीत अनेकदा चर्चा होत असतात. मात्र, यावर गांभीर्याने मंथन होणं गरजेचं आहे.

इतके दिवस हा डेटा व्यावसायिक आणि राजकीय गोष्टींसाठी वापरली जात होता. आता या घटनेवरुन हे प्रकरण अगदी बेडरुमपर्यंत आल्याचं दिसतंय. याचा शेवट काय असेल किंवा हे सगळं कधी थांबेल हे सांगता येत नाही. तंत्रज्ञान याप्रकारच्या डेटाचोरीला थांबवू शकेल की नाही हे ही माहित नाही. पण आपलं वैयक्तीक आयुष्य सार्वजनिक होऊ द्यायचं नसेल तर तोपर्यंत आपण सावध रहाणं हाच मार्ग आहे.

Updated : 28 Aug 2019 4:33 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top