Home > News Update > पूरग्रस्तांचा खराखुरा हिरो..

पूरग्रस्तांचा खराखुरा हिरो..

पूरग्रस्तांचा खराखुरा हिरो..
X

कृष्णा नदीकाठी महापुराने थैमान घालत असताना आपला जीव धोक्यात घालून दुधोंडी पासून पश्चिमेकडील सुमारे तीन किलोमीटरवरील माळी वस्ती,सती आई मंदिर परिसर व जुने घोगाव अशा भागातील पूर बाधित सुमारे पाचशे पेक्षा जास्त नागरिकांना आपल्या छोट्याशा कायलीतून सतत चार दिवस तीनशे फेऱ्या मारून पुरातून सुरक्षितपणे बाहेर काढणारा हा पंचावन्न वर्षाचा अवलिया म्हणजे रामदास उमाजी मदने...

आपल्याला आश्चर्य वाटणारी ही बाब खरंच फक्त सांगली जिल्ह्यालाच नव्हे तर पूर्ण महाराष्ट्राला अभिमानास्पद ठरावी अशी कामगिरी या एका 55 वर्षाच्या साठीकडे झुकलेल्या या माणसाने केली आहे. दुधोंडी तालुका पलुस जिल्हा सांगली येथे राहणारा हा माणूस नदीकडच्या घरात राहूनही, सध्या पूरबाधित असूनही माणुसकी बद्दल अपार प्रेम असणारा आम्हाला दिसला.

या माणसाचं घर जमिनीपासून दहा फूट उंचीवर असून सुद्धा घरात चार फूट पुराचे पाणी घुसले होते या माणसाने आपले कुटूंब इतरत्र हलवले परंतु महापुराच्या पाण्यात आपण मात्र स्वतः दिवसभर छोट्याशा काहिली द्वारे आपलं काम सुरू ठेवून 500 नागरिकांना पुरातून बाहेर काढण्याचे काम सलग चार दिवस तीनशे फेऱ्यातून केले आहे.शिवाय रात्र झाली तरी हा माणूस आपल्या पुराच्या पाण्यातील घराच्या वर झोपत होता व त्याचा पुतण्या विजय मदने हा वेगवेगळ्या इमारतीवरून त्यांच्यापर्यंत येऊन अन्नपाणी पोहोचवत होता .असा हा निस्वार्थी माणूस आपल्याला कुठे शोधून ही सापडेल का?

आज जेव्हा आद्य क्रांतिवीर राजे उमाजी नाईक ब्रिगेडच्या राज्य पदाधिकाऱ्यांनी त्याची भेट घेतली तेव्हा या माणसाने अक्षरशः आम्हाला सुद्धा पुराच्या पाण्यातून काहिलीत बसवून ज्या ठिकाणाहून माणसं बाहेर काढली तो भाग फिरून दाखवला. या माणसाचं एवढं मोठं काम असूनही प्रशासनाने अथवा कोणत्याही शासकीय अधिकाऱ्यांने मात्र त्याची साधी दखल सुद्धा घेतली नाही.

रामदास मदने म्हणतात की "फक्त कुंडल पोलीस स्टेशनच्या फौजदार मॅडम आपल्या चार पोलिसांसह याठिकाणी आल्या. ते सर्वजण माझ्या काहिलीत बसले व जवळच्या माळीवस्तीवर आम्ही जाऊन तेथील लोकांना पाणी वाढायला लागले आहे लवकर बाहेर पडा एवढेच मॅडमनी आव्हान केले आणि परत त्यांना काठाजवळ सोडले. तेव्हा जाताना त्या फक्त म्हणाल्या की बाबा तुम्ही छान काम करता. या पलिकडे मला कोणत्याही प्रकारची शाब्बासकीची थाप अथवा कोणतीही मदत मिळाली नाही."

अशा एका पूरबाधित माणसाच्या कुटुंबाला आणि आपला स्वतःचा जीव धोक्यात घालून सतत चार दिवस आपल्या छोट्याशा कायलीतून पुराच्या पाण्यातून तीनशे फेऱ्या मारत पाचशेपेक्षा जास्त नागरिकांना बाहेर काढणाऱ्या माणसाला खऱ्या अर्थाने मदत करणं, पूरग्रस्त म्हणून त्याला जे देता येईल ते देणे हे समाजाचे आद्य कर्तव्य ठरते. ते या क्षेत्रातील प्रत्येक संवेदनशील माणसाने बजवायला हवे तरच अशा व्यक्ती समाजाला किमान माहीत तरी होतील. रामदास उमाजी मदने या अवलियाच्या कार्याला आमचा लाख लाख सलाम.

- बापूसाहेब दगडे पाटील

Updated : 12 Aug 2019 9:39 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top